साखळीतील दत्तमंदिर चोरट्यांनी फोडले

0
86

>> अडीच लाखांचा ऐवज लंपास

साखळी येथील प्रसिद्ध दत्तमंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दरवाजा तोडून मंदिरातील सुमारे २.५० लाख रुपये किमतीचे सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री एकच्या नंतर ही चोरी केल्याचा अंदाज आहे. यामुळे साखळी भागात एखादी टोळी कार्यरत असल्याचे सिद्ध होत असून पोलीस गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.

डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मंदिराचा मुख्य डावा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीची प्रभावळ व इतर सामान पळवले. याबाबत मंदिर समितीचे सदस्य सुदत्त मांद्रेकर यांनी डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. डिचोली पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी धाव घेतली व पंचनामा केला.

श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. तसेच ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी आणून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताही सुगावा लागलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पाठमोरा दिसत असल्याचे संजय दळवी यांनी सांगितले.

या प्रकरणी डिचोली पोलिसांनी भा. दं. सं. कलम ३८० व ४५७ खाली अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.