साखरे बद्दलचे समज/गैरसमज

0
256
  •  डॉ. स्वाती हे.अणवेकर
    (म्हापसा)

जी व्यक्ती भरपूर साखर खाते त्या व्यक्तीला वारंवार हायपोग्लायसेमिया होतो. अर्थात ही त्या व्यक्तीची प्रि-डायबिटीक स्टेज असते. ह्यात त्या व्यक्तीची साखर खाण्याची इच्छा प्रबळ होत जाते. ती व्यक्ती चिडचिडी होते. चिंता, नैराश्य आणि अतिक्रियाशीलता ह्या तक्रारी सुरु होतात.

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना असे वाटते की आपल्या आहारात साखर घेणे खूप आवश्यक आहे कारण ते शरीराला ग्लुकोजचा पुरवठा करते. तर आपण ह्या लेखामध्ये हे जाणून घेणार आहोत की खरोखरच आपल्या शरीराला बाहेरून साखर घेण्याची गरज आहे का? आणि साखरेचा शरीरावर काय परिणाम होतो तेदेखील आपण ह्या लेखामधून पाहणार आहोत.
तसे पाहता आपल्या शरीराला बाहेरून साखर घेण्याची काहीच गरज नसते, कारण आपण आपल्या आहारात बर्‍याच खाद्यपदार्थामधून नैसर्गिक साखर घेत असतो… जी आपल्या शरीराला उर्जा देण्यासाठी पुरेशी असते.

कसे ते आपण पाहूया :-
१) धान्यामध्ये साखर स्टार्च ह्या स्वरुपात असते.
२) दुध व दुग्धजन्य पदार्थात साखर लॅक्टोजच्या स्वरुपात असते.
३) फळात ती फ्रुक्टोजच्या स्वरुपात असते.
४) भाज्यामध्ये ती सेल्युलोजच्या स्वरुपात असते.
५) कोंब काढलेल्या कडधान्यात ती माल्टोजच्या स्वरुपात असते.
आता रक्तामध्ये साखर ग्लुकोजच्या स्वरुपात असते. शरीरात साखर ग्लायकोजनच्या स्वरुपात साठवून ठेवली जाते.
तर पांढरी साखर ही कृत्रिम असून त्यात सुक्रोज ही साखर असते. तसेच द्रव ग्लुकॉज व हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हे कृत्रिम साखरेचे अजून दोन प्रकार आहेत.

आपल्याला नैसर्गिकरित्या अन्नामधून मिळणारी साखर ही आरोग्यासाठी उपयुक्त असते तर आपण आहारात बाहेरून घेत असलेली कृत्रिम साखर ही आपल्या शरीराला मुळीच आवश्यक नसते कारण त्याने आपले आरोग्य नक्कीच बिघडते कारण ती बरीच रसायने वापरून तयार केली जाते व साखर हे पांढरे किवा गोड विषच आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

ही अशी साखर खाल्ल्याने खालील आरोग्याचे धोके तुम्हाला खुणावू शकतात :
१) स्थौल्य
२) उच्चरक्तदाब
३) हाय ट्रायग्लिसराइड्‌स
४) मधुमेह
५) हृदयविकार
६) तसेच कर्करोग पेशी ह्या देखील साखरेवर पोसल्या जातात.
तसे पाहता ह्या बाहेरच्या साखरेची आपल्या शरीराला काहीच आवश्यकता नसते कारण आपण आहारामधून घेतो ती साखर आपल्या शरीराला पुरते. तसेच आपण आहारात घेत असलेले स्निग्ध पदार्थ किंवा फॅट व प्रोटीन्स ह्यांचे चयापचय होऊनदेखील त्याचे रुपांतर गरज पडल्यास ग्लुकोजमध्ये शरीरही करू शकते.
बाहेरून कृत्रिम साखर शरीरात घेत राहिल्यास शरीरातील इन्सुलिन हा संप्रेरक विचित्र वागू लागतो.

आता शरीरात ही कृत्रिम साखर गेल्यावर शरीरावर ती कसा आघात करते ते आपण पाहूया :
१) आपण शरीरात कृत्रिम साखर घेतली की ती शरीरातील पोटॅशियम, कॅल्शियम व विटामिन-डी नष्ट करते व त्याची निर्मिती कमी व्हायला लागते.

२) जेव्हा शरीरात पोटॅशियम कंमी होते तेव्हा शरीरात सोडियम हे रक्तात वाढू लागते. त्यामुळे शरीरात वॉटर रिटेन्शन होते व त्या व्यक्तीचे वजन वाढू लागते.

३) सतत जास्त साखर असणारे पदार्थ खाल्ल्याने तुमची साखर खाण्याची चटक वाढत जाते कारण ही साखर म्हणजे एम्टी नॉन-न्युट्रिशियस कॅलरीज असतात.

४) जी व्यक्ती भरपूर साखर खाते त्या व्यक्तीला वारंवार हायपोग्लायसेमिया होतो. हे सुरुवातीच्या काळात होऊ लागते. अर्थात ही त्या व्यक्तीची प्रि-डायबिटीक स्टेज असते. ह्यात त्या व्यक्तीची साखर खाण्याची जी इच्छा असते ती प्रबळ होत जाते, ती व्यक्ती चिडचिडी होते. चिंता, नैराश्य आणि अतिक्रियाशीलता ह्या तक्रारी सुरु होतात.

५) जेव्हा व्यक्ती भरपूर साखर खाते तेव्हा शरीरातील इन्स्युलीन ती साखर शरीरातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. कारण ती साखर शरीराला विष आहे असे ते समजते. त्यामुळे ती साखर शरीरातील पेशीमध्ये ते जाऊ देत नाही. आणि मग ही साखर आपल्या शरीरात फॅट, ट्रायग्लिसराईड व कोलेस्ट्रॉल ह्या स्वरुपात साठवून ठेवली जाते.

६) हळूहळू काही काळाने जेव्हा शरीरातील इन्सुलिन काम करणे बंद करते तेव्हा मग रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढू लागते ज्याला हायपरग्लायसेमिया असे म्हणतात किवा हाय ब्लड शुुगर लेव्हल असे म्हणतात ज्यात थकवा, संथपणा व अन्य तक्रारी सुरु होऊन ह्याचे रुपांतर पुढे मधुमेहामध्ये होते.

आता ह्या साखरेचे व्यसन आपल्याला कसे लागते ते शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घेऊयात :-
हे दोन प्रकारे घडते. पहिल्या प्रकारात जेव्हा व्यक्ती साखर खाते तेव्हा तिच्या शरीरात इन्सुलिन निर्माण होते जे रक्तामधील साखर कमी करायला मदत करते. पण ह्याच वेळी रक्तातील काही संवेदनशील घटक हे मेंदूपर्यंत जातात आणि तिथे संदेश देतात त्यामुळे त्या व्यक्तीला साखर खाण्याची चटक लागते.
आता दुसरा प्रकार पाहूया. आपण जेव्हा साखर किंवा एखाद्या गोड पदार्थाबद्दल विचार करतो त्यावेळी आपल्या शरीरात डोपामिन नावाचा संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन निर्माण होतो ह्याला ‘फिल गुड हॉर्मोन’ असेही म्हणतात. त्यामुळे जेव्हा आपण खरोखर भरपूर साखरयुक्त पदार्थ खातो तेव्हा हा डोपामिन बर्‍याच प्रमाणात तयार होतो.

आता ह्या डोपामिनचे खरे कार्य हे आनंद देणे, शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे, चालना देणे, सतर्कता व भुकेची जाणीव करून देणे ही आहेत. तर जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपले शरीर भरपूर प्रमाणात हे डोपामिन तयार करते जे आपल्या शरीराच्या पेशींमध्ये जाते व आपल्याला एक आनंदाची संवेदना देते. पण कालांतराने जेव्हा आपण सतत गोड व साखरयुक्त पदार्थ जास्त खाऊ लागतो तेव्हा हे डोपामिन नीट कार्य करत नाही. अर्थात ते रेझिस्टंट म्हणजे प्रतिरोधक होऊन जाते. त्यामुळे योग्य प्रमाणात ते पेशीमध्ये जात नाही व त्यामुळे आपल्याला भरपूर साखर खाऊनदेखील तो पूर्वीचा आनंद मिळत नाही आणि हाच आनंद मिळवायला मग आपण अधिकाधिक साखर खाऊ लागतो आणि ही साखर आपण आनंदासाठी नाही तर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी खात असतो हे ध्यानात ठेवावे.

आता जर आपण काही दिवस अर्थात सलग १४ दिवस साखर सोडली तर शरीरात काय काय बदल होतील ते आपण जाणून घेऊया :-
१) आपली साखर खाण्याची इच्छा आपोआप कमी होऊ लागेल. प्रत्येक वेळी जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपली रक्तातील शुगर कमी होऊ लागते आणि त्यामुळे आपण हायपोग्लायसेमियाच्या अवस्थेत जातो आणि ज्यामुळे आपली साखर खाण्याची इच्छा वाढत जाते. आपण जेव्हा साखर खाणे सोडतो तेव्हा हायपोग्लायसेमिया कमी होतो व साखर खाण्याची इच्छा आपोआप नष्ट होते.

२) आपल्याला परत परत भूक लागणे बंद होते :-
रक्तातील साखर नियंत्रणात येते जेव्हा आपण बाहेरून साखर घेणे थांबवतो. जेव्हा एखादी व्यक्ती साखर खाते तेव्हा त्याचे शरीर ती साखर बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते ह्यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात कारण शरीराला हे माहीत असते की ही साखर त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करून शरीर साखरेला पेशीमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवते.
जेव्हा आपण साखर खाणे थांबवतो तेव्हा शरीरात इन्सुलिन नीट कार्य करू लागते आणि त्यामुळे शरीरातील पेशी अन्य पोषक घटक जसे जीवनसत्वे, क्षार इ. उत्तम प्रकारे शोषून घेऊ लागतात.

३) मेंदू थकतो ः- जेव्हा एखादी व्यक्ती अतिप्रमाणात साखर खाते तेव्हा त्यामुळे मेंदू थकतो कारण त्याला ही अतिरेकी साखर सहन होत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती साखर खाणे थांबवते तेव्हा शरीरातील पेशी शरीरात आहारातून जाणारी नैसर्गिक साखर व अन्य पोषक घटक उत्तम प्रकारे शोषून घेऊ शकतात कारण रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित असते. त्यामुळे मग आपला मेंदू थकत नाही आणि आपल्याला ताजेतवाने व भरपूर ऊर्जायुक्त वाटते.

४) शरीरातील अतिरिक्त पाणी आणि चरबी कमी होते :-
एखादी व्यक्ती जेव्हा साखर खाणे बंद करते तेव्हा पहिल्या आठवड्यात तिच्या शरीरातील साठून राहिलेले पाणी आणि थोडीशी चरबी नष्ट व्हायला मदत होते, आणि त्यानंतर मात्र शरीरातील चरबी भरपूर प्रमाणात नष्ट होऊ लागते. कारण साखर खाल्ल्याने शरीरात पाणी साठून राहते ज्यामुळे वजन वाढू लागते आणि हे वजन प्रामुख्याने त्या व्यक्तीच्या पोटावर वाढू लागते आणि कंबरेवर वाढते. जेव्हा ती व्यक्ती साखर खाणे बंद करते तेव्हा तो भाग बारीक व्हायला मदत होते आणि त्याभागावर कपडे सैल होऊ लागतात. थोडक्यात काय – तर अति साखर खाल्ल्याने पोट फुगू लागते आणि साखर खाणे बंद केले की पोट कमी होते.

५) मूड चांगला राहतो :-
साखर खाणे कमी केलेल्या व्यक्ती ह्या शांत व मृदू भाषी असतात आणि त्यांचे लक्ष एखाद्या गोष्टीवर चांगल्या प्रकारे केंद्रित राहते व त्या चांगल्या स्थिर बनतात. थोडक्यात काय तर साखर सोडलेल्या व्यक्ती ह्या जास्त गोड स्वभावाच्या बनतात.

६) त्वचा चांगली बनते :-
जेव्हा एखादी स्त्री अतिप्रमाणात साखर खाऊ लागते तेव्हा तिच्या शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात बनते व त्याचप्रमाणेअँड्रोजन संप्रेरकाचे प्रमाण वाढते ज्यामुळे तिच्या तोंडावर मुरूम येऊ लागतात. तर जर एखादा पुरुष असे करू लागला तर त्याच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढून त्याच्या शरीरातील टेस्टेटरॉन हा कमी होऊ लागतो व त्या संबंधीच्या तक्रारी सुरू होऊ लागतात.

७) वेदना व सूज कमी होते ः-
तसेच साखर खाणे बंद केल्याने शरीरात होणारी वेदना कमी होते व जर कुठे सूज आली असेल तर तीदेखील कमी होते.
साखर खाणे बंद केल्यावर शरीराला दुसर्‍या प्रकारे ऊर्जा उत्पन्न करायला अर्थात चरबीपासून ती निर्माण करायला साधारणपणे ३ दिवस लागतात आणि त्यामुळे पहिले ३ दिवस हे साखर खाणे बंद केल्यावर त्या निर्णयावर ठाम राहायला फार महत्त्वाचे असतात. कारण ह्या काळात शरीरामध्ये काही विचित्र संवेदना ज्या आपल्याला त्रासदायक होऊ शकतात त्या बळावू शकतात.
म्हणूनच ह्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या दिवसाच्या आहारातून आपल्याला व्हिटामिन-बी व पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळेल हे पाहावे म्हणजे हा त्रास होणार नाही.
हे असे होते कारण ह्या काळात शरीर असे काही एन्झाइम्स निर्माण करत असते जे आपले शरीर चरबीवर चालवायला साहाय्य करतील.

८) रक्त वाहिन्यांमधील सूज कमी होते जेणेकरून तिथे प्लाक किंवा रक्ताची गाठ होणे टळते ज्यामुळे हृदयाचा झटका किंवा मेंदूचा झटका म्हणजेच स्ट्रोक ह्यापासूनदेखील आपला बचाव होतो.

९) साखर खाणे बंद केल्याने मेंदूमधील पेशी न्यूरॉन्स वाढतात कारण ह्या काळात शरीर हे किटोन्सवर चालते जे मेंदूच्या पेशींची वाढ करायला मदत करते.

१०) साखर खाणे बंद केल्याने यकृत साफ होते कारण यकृतात साठलेली चरबी ही ऊर्जेसाठी वापरली जाते. त्यामुळे ज्या लोकांचे पोट सुटलेलं असेल त्यांना नक्कीच फॅटी लिव्हरचा त्रास असणार ह्यात शंका नाही आणि त्यांनी साखर खाणे बंद केल्यावर यकृतात साठलेली चरबी कमी होऊन त्यांचे सुटलेले पोटदेखील कमी व्हायला मदत होते.

११) तसेच साखर कमी खाल्ल्याने मूत्रपिंडांचे कार्य चांगले चालते.
असे अनेक फायदे साखर कमी खाल्ल्याने आपल्याला मिळतात.
जर तुम्हाला साखरेचे व्यसन कमी करायचे असेल तर आहारात पोटॅशियम भरपूर असणारे खाद्यपदार्थ घ्यावेत. आता हे घटक कोणकोणत्या आहार द्रव्यात असते ते आपण सविस्तर पाहूया :-
१) अवोकॅडो, २) पालक, ३) केळी, ४) टोमॅटो, ५) बटाटा,
६) रताळे, ७) अळशी, ८) कोबी, ९) संत्र, १०) चवळी,
११) राजमा, १२) बदाम, १३) पिस्ता, १४) शेंगदाणे, सुके जर्दाळू,काजू, इत्यादी. तसेच १५) सर्व डाळी
तर मी आशा करते, हा लेख वाचून आपण सर्व नक्कीच आपल्या आहारातील साखर कमी कराल ह्यात शंका नाही.