साई प्रणिथ १५व्या स्थानी

0
86

>> महिला एकेरीत गोव्याची अनुरा प्रभुदेसाई १४४ वी

सिंगापूर ओपन सुपर सीरिज विजेत्या बी. साई प्रणिथ याने काल गुरुवारी जाहीर झालेल्या साप्ताहिक बॅडमिंटन क्रमवारीत एका स्थानाची प्रगती करताना पंधरावे स्थान मिळविले आहे. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चौदाव्या स्थानाची बरोबरी करण्यासाठी त्याला अजून एका स्थानाने वर सरकावे लागणार आहे. जून महिन्यात त्याने सदर स्थान मिळविले होते. महिला एकेरीत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईने दोन क्रमांकांनी वर सरकताना १०,२३० गुणांसह १४४वा क्रमांक मिळविला आहे.

प्रणिथ सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असून मागील चार सुपर सीरिज स्पर्धांमध्ये त्याला दुसर्‍या फेरीपलीकडे मजल मारणे शक्य झाले नव्हते. नुकत्याच संपलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याला आपल्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या शुभंकर डे याच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत तीन गेममध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

दुसरीकडे दोनवेळच्या राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्मा याला १६ स्थानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची ५७व्या स्थानी घसरण झाली आहे. कोपराच्या दुखापतीतून वेळेत सावरू न शकल्याने त्याला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला मुकावे लागले होते. आपल्या कारकिर्दीत तिसाव्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या वर्माला सप्टेंबर महिन्यात झालेल्या जपान ओपन सुपर सीरिज स्पर्धेसाठी हैदराबादमध्ये सराव करताना दुखापत झाली होती.

सौरभचा कनिष्ठ बंधू समीर वर्मादेखील दोन क्रमांकांनी घसरताना विसाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सौरभप्रमाणे समीरही दुखापतीतून सावरत असून याच कारणास्तव त्याला डेन्मार्क ओपन व फ्रेंच ओपनला मुकावे लागले होते. किदांबी श्रीकांत व एचएस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या खेळाडूंच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. श्रीकांत दुसर्‍या तर प्रणॉय ११व्या स्थानी कायम आहे. चीन ओपन व हॉंगकॉंग ओपनमधून माघार घेतलेल्या अजय जयराम २२व्या स्थानी जैसे थे आहे. राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपने ४४वे स्थान मिळविले आहे. दोन स्थानांचा तोटा सहन करावा लागल्याने शुभंकर डे ६९व्या स्थानी आहे.

दुहेरीत रंकीरेड्डी-चिराग शेट्टीची भरारी
सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी बॅडमिंटन क्रमवारीत या द्वयीने पुरुष दुहेरीत कारकिर्दीतील सर्वोत्तम २७वे स्थान मिळविले आहे. मनू अत्री व सुमिथ रेड्डी ३३व्या तर श्‍लोक रामचंद्रन व अर्जुन एमआर जोडी ३७व्या स्थानी आहे.
महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डीच्या २५व्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. मिश्र दुहेरीतील भारताची सर्वोत्तम जोडी रेड्डी व प्रणव जेरी चोप्रा १६व्या स्थानी स्थिर आहे.

सायना, सिंधूचे स्थान अबाधित
राष्ट्रीय विजेती सायना नेहवाल व उपविजेती पी.व्ही. सिंधू यांच्या स्थानात वर्तमान आठवड्यात कोणताही बदल झालेला नाही. सिंधूने आपले दुसरे स्थान अबाधित राखले आहे तर ११व्या स्थानावरील सायना ‘टॉप १०’ प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. २०१६ची राष्ट्रीय विजेती रितुपर्ण दास ५१व्या स्थानी घसरली आहे. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा विजेती रुत्विका शिवानी गड्डेला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. १८ स्थाने खाली सरकताना ती १०१व्या स्थानी पोहोचली आहे.