सांगेचे संयुक्त मामलेदार अनिश प्रभुदेसाईला अटक वॉरंट

0
236

कोलवा येथील एका रेस्टॉरंटमध्ये दंगामस्ती केलेले सांगेचे संयुक्त मामलेदार अनिश प्रभुदेसाई याला काल उपन्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल अटक वॉरंट जारी केला आहे. उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी हा वॉरंट जारी केला.दि. २५ मार्च रोजी अनिश प्रभुदेसाई, मिंगेल फर्नांडिस व मॅल्कम डिसोझा तसेच अन्य दोन मित्रांसमवेत कोलवा येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. या रेस्टॉरंटमध्ये नावेली येथील डॉमनिक फुर्तादोही जेवायला गेले होते. पहाटे अडीच वाजता प्रभुदेसाई आणि त्याच्या मित्रांचे फुर्तादो यांच्याशी शुल्लक कारणावरून भांडण झाले. एकमेकांना शिव्या हासडल्या व प्रकरण हातघाईवर जाऊन त्यात जखमी झालेल्या फुर्तादो याने कोलवा पोलीस स्टेशनवर तक्रार करताच अनिश प्रभूदेसाई, मिंगेल फर्नांडिस व मॅल्कम डिसोझा या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. मागाहून मडगावचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी सरकारी नोकर असल्याने त्याची २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली होती. काल कोर्टात हजर राहण्याचा आदेश त्याला दिला होता; पण तो हजर न राहिल्याने अटक वॉरंट बजावण्यात आले. या अगोदर अनिश प्रभुदेसाई याची पदावनती करून त्याला अव्वल कारकून केले होते. काही दिवसांपूर्वी ती कारवाई मागे घेऊन सांगे येथे संयुक्त मामलेदारपदी नियुक्त केली होती. काही वर्षाअगोदर मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांनी पत्त्याचा जुगार खेळताना त्याला पकडले होते.