सलाम सफल युद्धाभ्यासाला!

0
129
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

‘ऑपरेशन गगन शक्ती २०१८’ हा भारतीय वायुसेनेचा मागील तीन दशकांमधला सर्वांत मोठा युद्धाभ्यास होता. माध्यमांनी याकडे ङ्गारसे लक्ष दिलेले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीमध्ये चीनी राष्ट्रपती शी जिनपिंगनी त्यांना दिलेली शाही वागणूक या युद्धाभ्यासाचा परिपाक होती असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

१०ते २३ एप्रिल,२०१८ दरम्यान संपन्न झालेले ‘ऑपरेशन गगनशक्ती २०१८’ हा भारतीय वायुसेनेचा मागील तीन दशकांमधला सर्वात मोठा युद्धाभ्यास होता. यापूर्वी १९८७ मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर झालेला ‘ऑपरेशन ब्रास टॅक्स’ हा युद्धाभ्यास, केवळ स्थलसेना संसाधनांच्या युद्धजन्य जमवाजमवीसाठी करण्यात आला. २०१८ च्या नव्या युद्धाभ्यासात संरक्षण दलांच्या दृष्टीकोनातून, चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील संभाव्य युद्धजन्य परिस्थती व प्रत्यक्ष युद्धाचा सराव केला गेला. सामरिक शिष्टाचारानुरूप, चीन व पाकिस्तानला या युद्धाभ्यासाची पूर्वकल्पना देण्यात आली.

या द्विचरणीय युद्धाभ्यासाचा पहिला भाग जमीन, आकाश व समुद्रमार्गे झालेले आकस्मिक पाकिस्तानी आक्रमण विफल करण्यासाठी अरब सागर आणि पश्‍चिमी सीमेवर संपन्न झाला. यामध्ये वेस्टर्न (दिल्ली), साऊथ वेस्टर्न (गांधीनगर) आणि सदर्न (बंगलुरू) एअर कमांडस्‌नी भाग घेतला. केवळ ४८ तासांनंतर युद्धाभ्यासाच्या दुसर्‍या चरणात पाकिस्तानवरील सामरिक दबाव कमी करण्यासाठी चीनने जमिनी व समुद्रीमार्गे केलेल्या मदती आक्रमणाला तोंड देण्यासाठी युद्धाची दिशा दक्षिण व उत्तर पूर्वेकडे आणि हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीकडे वळली. यामध्ये वेस्टर्न, सेंट्रल (अलाहाबाद), इस्टर्न (शिलांग) आणि सदर्न एयर कमांडस्‌नी भाग घेतला. युद्धाभ्यासाच्या दोन्ही चरणांमध्ये स्थलसेना व नौसेनेचा आवश्यक तो सहभाग होता. विमान व निगडीत संसाधन देखभालीची जबाबदारी नागपूर स्थित मेंटेनन्स कमांडची होती.

ऑपरेशन गगन शक्ती, इंडियन ओशन रिजनवरील भारतीय वायुसेनेच्या वर्चस्वाची खातरजमा करण्यासाठी केला गेला. या युद्धाभ्यासात ः –
अ) ३५० वैमानिक, ५४० साहाय्यक तंत्रज्ञ व १६५० वायुसैनिक आणि सैनिक, ११२० फायटर, ट्रान्सपोर्ट विमाने आणि हेलिकॉप्टरे आणि स्थलसेनेच्या ९,००० सैनिकांनी सक्रिय योगदान दिले.
ब) राजस्थान व गुजरातचे वाळवंट, हिमालयाची उन्नत पर्वतराजी, पूर्वोत्तर राज्यांमधील जंगले याच बरोबर बंगालची खाडी,अरब सागर व हिंद महासागरामधल्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष विवक्षित युद्धांमध्ये स्थलसेना आणि नौसेनेला वायुसेनेकडून सुदूर व सक्षम सामरिक मदत देण्याचा सराव करण्यात आला.

क) शत्रू विमानांशी आकाशी चकमक, स्थलसेना व नौसेनेच्या जमीन व सागरी युद्धातील आकाशी मार्‍याची मदत, त्रिधारी सैनिकांना हल्ल्यासाठी, विमाने किंवा हेलिकॉप्टरद्वारे विवक्षित ठिकाणी नेणे- उतरवणे आणि जखमी सैनिकांच्या निकासीचा सामरिक सराव करण्यात आला.
ड) वायुसेना व नौसेनेच्या विमानांनी १०,७०० तासांच्या अवकाश भरारींसाठी ४३ विमानतळ आणि विमानवाहू जहाजांवरून ९,००० वर उड्डाण केली.
पश्‍चिमेतील पाकिस्तानविरोधी युद्धात वायुसेनेच्या ब्राम्होस क्षेपणास्त्रसज्ज सुकॉय ३० एमकेआय, आकाश क्षेपणास्त्रसज्ज मिराज २००० व एमआयजी २९के फायटर/बांबर्स आणि समुद्री जहाजविरोधी हार्पून अँटी शिप मिसाइल्स सज्ज, जग्वार लढाऊ विमानांनी, स्थलसेना आणि नौसेनेला हवी तेव्हा हवी ती मदत दिली. ४८ तासांनी पूर्वोत्तर राज्यांच्या चीन निगडीत सीमा या युद्धाभ्यासाच्या आवाक्यात आल्यानंतर वायुसेनेने हिंद महासागरावरील वर्चस्वासाठी आवश्यक हवाई दरारा हासील करणे व नौसेनेला त्या अनुषंगाने मदत करण्यासाठी अंदमान निकोबार द्वीपसमूहामधून ऑपरेशन्स सुरू केली.

नौसेनेच्या एमआयजी २९ एफ या फायटर बॉम्बर आणि पी ८ आय या समुद्री टेहाळणी विमानांच्या जोडीला वायुसेनेच्या सुकॉय ३०, एमआयजी २९ आणि जग्वार लढाऊ विमानांनी, समुद्री लक्ष्य विरोधी आक्रमक आणि रक्षणात्मक हालचालींचा सराव केला. या अभ्यासात वायुसेना व नौसेनेला हिंद महासागरावर उड्डाण भरत/समुद्री कारवाया करत शत्रूंच्या सर्व प्रकारच्या दु:साहसाला खरमरीत उत्तर देण्याची संधी मिळाली.

द्विचरणीय युद्धासाठी आवश्यक असणार्‍या किमान ४२ एयर स्क्वाड्रन (एक स्क्वॉड्रनमधे १८ विमान) ऐवजी केवळ ३० स्क्वॉड्रन उपलब्ध असतानाही भारतीय वायुसेनेने आपली जबाबदारी लक्षणीयरीत्या पार पाडली, हे कौतुकास्पद आहे. मात्र, ही कमतरता लवकरात लवकर भरून काढणे अत्यावश्यक आहे. युद्धात सामील होण्यासाठी वायुसेनाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर, केवळ ३६ तासांमध्ये वायुसेनेच्या विमानांनी अवकाशात भरारी भरली आणि पुढचे १४ दिवस स्थलसेना आणि नौसेनेच्या मदतीसाठी दिवसरात्र लढा दिला. या युद्धाभ्यासात सुकॉय, एमआयजी आणि जग्वार बरोबर पहिल्यांदाच भारतनिर्मित तेजस लढाऊ विमान आणि मिग २९ एफ विमानांनी सक्रीय भाग घेतला. देशाच्या चहूबाजूंना सर्व जमिनी व समुद्री क्षेत्रांमधे सुरू झालेल्या आक्रमक आणि रक्षणात्मक युद्धात वायुसेनेने आपले पाणी दाखवले.
ऑपरेशन गगन शक्तीच्या यशाची वाखाणणी भारतात फक्त संरक्षणमंत्र्यांनी केली असली तरी चीनने मात्र याची गंभीर दखल घेतली आहे. भारताने या युद्धाभ्यासासाठी खरोखरच ११०० विमान वापरली असतील तर ते विश्‍वासार्ह आहे. आजपर्यंत केवळ तीन महाशक्तींकडेच ही क्षमता होती. आता आम्हाला भारताच्या युद्धसज्जतेेबद्दल पुनर्विचार करावा लागेल. भारताने शेकडो सुखॉय ३०, एमआयजी २१, जग्वार,एमआयजी २९, एमआयजी २९ के, तेजस ही फायटर/बॉंबर्स, पी ८ आय मेरी टाईम रिकॉनिसन्स विमान, अनेक प्रकारची ट्रांसपोर्ट विमान वहेलिकॉप्टर्स आणि एयर टू एयर रिफ्युएलिंग सिस्टीम्स, ज्या कुशलतेने या युद्धाभ्यासात वापरण्यात आली त्यामुळे मागील काही वर्षांत त्यांनी केलेल्या सामरिक संसाधन प्रगतीची दखल घेणे अनिवार्य आहे. या युद्धाभ्यासामुळे भारतीय सैन्याच्या सक्षम व निर्दोष देखभाल आणि पुरवठा प्रणालीचा प्रत्यय येतो’ असे प्रतिपादन चीनच्या सरकार समर्थित वृत्तसंस्थेने केले आहे.

‘‘नभ: स्पृशं दीप्तम् (टच द स्काय विथ ग्लोरी)’’ हे भारतीय वायुसेनेचे ब्रिदवाक्य महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अजुर्नाला उपदेश देतांना सांगितलेल्या गीता प्रवचनाच्या अकराव्या अध्यायातून घेतले आहे. त्यानुरूपच वायुसेनेने ‘ऑपरेशन गगन शक्ती’ या चौदा दिवसांच्या युद्धाभ्यासाचा सराव केला. मात्र देशात मागील काही दिवसांपासून भोंदूबाबांचे कारनामे, रूपेरी तार्‍यांच्या कोर्ट केसेस, स्त्रियांवरील बलात्कार, त्यांच्यासाठी झालेली निदर्शने व त्यावरील अध्यादेश आणि कर्नाटक निवडणुकांच्या अनुषंगाने होणार्‍या राजकीय दोषारोपांंमध्ये व्यस्त असलेल्या माध्यमांना या युद्धाभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीमध्ये चीनी राष्ट्रपती शी जिनपिंगनी त्यांना दिलेली शाही वागणूक या युद्धाभ्यासाचा परिपाक होती असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. कारण ‘सामर्थ्याचा सर्वत्र आदर होतो’ हे आर्य चाणक्यांचे वचन आहे. शत्रूने देखील गौरवलेल्या या सफल युद्धाभ्यासासाठी भारतीय वायुसेनेला या निवृत्त सेनाधिकार्‍याचा सलाम.