सर एव्हर्टन विक्स यांचे निधन

0
178

>> कॅरेबियन क्रिकेटचे पितामह म्हणून ओळख

>> ठोकली होती सलग पाच शतके

वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज फलंदाज सर एव्हर्टन विक्स यांचे बुधवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. विक्स यांनी क्लाइड वॉलकोट आणि फ्रँक वॉरेलसह १९५० च्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला वर्चस्व मिळवून दिले होते. या त्रिकुटाला वेस्ट इंडिजचे ‘द थ्री डब्ल्यू’ म्हणून ओळखले जायचे. विक्स यांना कॅरेबियन क्रिकेटचे पितामह म्हटले जाते.

विक्स, वॉलकोट आणि वॉरेल या तिघांचा जन्म ऑगस्ट १९२१ ते जानेवारी १९२६ या १८ महिन्याच्या कालावधीत झाला होता. पुढे या तिघांनी १९४८साली तीन आठवड्यांत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉरेल यांचे १९६७ साली तर वॉलकोट यांचे २००६ साली निधन झाले. ब्रिजटाऊनमधील राष्ट्रीय स्टेडियम या तिघांच्या ‘थ्री डब्ल्यूज ओव्हल’ या नावाने ओळखले जाते.

विक्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामने खेळले असून यात त्यांनी ५८.६१ च्या सरासरीने १५ शतके आणि १९ अर्धशतकांसह ४४५५ धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १५२ सामन्यांत ५५.३४ च्या सरासरीने १२०१० धावा केल्या आहेत. ते वेस्ट इंडीजच्या महान फलंदाजांपैकी एक होते. १९४८ ला वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी इंग्लंड विरुद्ध ब्रिजटाऊन येथे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आपल्या चौथ्या सामन्यात त्यांनी इंग्लंड विरुद्ध १४१ धावांची खेळी केली. त्यानंतर पुढील सलग ४ डावातही त्यांनी शतके केली होती. ही ४ शतके त्यांनी भारताविरुद्ध भारतात केली होती. त्यांनी दिल्ली (१२८ धावा), मुंबई (१९४ धावा) कसोटीत प्रत्येकी १ आणि कोलकाता (१६२ व १०१ धावा) कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यामुळे ते सलग ५ कसोटी डावात शतके करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते.

हा विश्‍वविक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. मांडीच्या दुखापतीमुळे त्यांना केवळ ४८ सामने खेळल्यानंतर ३३ व्या वर्षीच निवृत्ती घ्यावी लागली. त्यांनी निवृत्तीनंतर १९७९ च्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळलेल्या कॅनडा संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले होते. १९९४ नंतर त्यांनी आयसीसी सामनाधिकारी म्हणूनही काम पाहिले. १९९५ मध्ये त्यांना ‘सर’ ही मानाची पदवी देण्यात आली होती.