सर्व शिक्षा अभियान शिक्षकांचे धरणे आंदोलन

0
210

>> पगारवाढीची मागणी

>> सीएमओ कार्यालयाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित

पर्वरी येथे सचिवालयाबाहेर सर्व शिक्षा अभियानाच्या ६९ शिक्षकांनी कंत्राटाचे नूतनीकरण आणि पगारवाढीच्या मागणीसाठी काल धरणे धरले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकार्‍याने याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या कंत्राटाचे अद्याप नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ६९ शिक्षकांची विविध माध्यमिक शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या कंत्राटाचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात न आल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दरवर्षी या कंत्राटी शिक्षकांना महिना साधारण १५ ते १६ हजार रुपये पगार दिला जात होता. केंद्र सरकारने या वर्षी सर्व शिक्षा अभियानाच्या शिक्षकांच्या पगारात कपात करून महिना ७ हजार रुपयांवर आणला आहे. या शिक्षकांना १६ हजार रुपये पगार देण्यासाठी राज्य सरकारकडून उर्वरित निधी मिळावा म्हणून एक प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी, शिक्षण खात्यात नवीन डी. एड. शिक्षकांच्या भरतीच्या मागणीसाठी राज्यातील बेकार डी. एड. शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आता सर्व शिक्षा अभियानाच्या शिक्षकांना कंत्राटाचे नूतनीकरण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.

या शिक्षकांच्या कंत्राटाच्या नूतनीकरणासाठी दरवर्षी उशीर केला जातो. त्यामुळे गतवर्षी एक निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर करून अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. परंतु, अद्यापपर्यंत सर्व शिक्षा अभियानाच्या शिक्षकांच्या समस्या कायम आहेत. मागील दीड महिना सर्व शिक्षा अभियानाचे शिक्षक बेकार आहेत. कंत्राटाचे नूतनीकरण व अन्याय दूर व्हावा म्हणून रस्त्यावर यावे लागले आहे, अशी माहिती गंगाराम लांबोर यांनी दिली.