सर्व विद्यालयांच्या अनुदानाचा विषय १५ दिवसांत निकालात

0
131

शिक्षण खात्याने राज्यातील अनुदानित विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली असून येत्या पंधरा दिवसांत सर्व विद्यालयांच्या अनुदानाचा विषय निकालात काढला जाणार आहे. मागील दोन दिवसात सुमारे एक कोटी रुपयांचे विद्यालय व्यवस्थापन अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांनी काल दिली.

राज्यातील अनुदानित माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयांना दरवर्षी व्यवस्थापन अनुदान दिले जाते. शिक्षण खात्याकडून हे अनुदान दोन भागातून वितरित केले जाते. व्यवस्थापन अनुदानाचा पहिला हप्ता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात दिला जातो. तर, दुसरा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जातो. या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र पूर्ण होऊन दुसर्‍या सत्राला प्रारंभ झाला तरी, विद्यालयांच्या व्यवस्थापन अनुदानाचे वितरण न झाल्याने शाळा व्यवस्थापनांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडण्यात आल्यानंतर अनुदानावर तातडीने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अनुदानाचे वितरण दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात सर्व विद्यालयांचे प्रस्ताव निकालात काढले जाणार आहेत. त्याच बरोबर अनुदानित प्राथमिक शाळांना प्रति विद्यार्थी ४०० रुपये अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

१५३ नवीन प्राथमिक
शिक्षकांना नियुक्तीपत्रे
शिक्षण खात्याने १५३ नवीन प्राथमिक शिक्षकांना नियुक्तिपत्रे काल दिली. शिक्षण खात्याने १५३ नवीन प्राथमिक शिक्षकांना मागील महिन्यात ऑफर पत्रे दिली होती. या नवीन शिक्षकांची विविध प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांतील कमी असलेली शिक्षकांची संख्या भरून काढण्यास आता थोडी मदत होणार आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.