सर्वाधिक वनक्षेत्र : गोवा देशात ९वा

0
196

गोवा हे एक अत्यंत प्रगतीशील असे राज्य गणले जात असून येथे झपाट्याने विकास होत असला तरी सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांत गोव्याचा देशात ९वा क्रमांक लागत असल्याचे वन खात्यातील सूत्रांनी सांगितले. आकाराने सर्वात छोटे राज्य असलेल्या गोव्याचा ६०.२१ टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली येत असल्याचे इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या ताज्या अहवालात (२०१८) नमूद करण्यात आले असल्याचे वन खात्यातील सूत्रांनी काल स्पष्ट केले.

राज्याचे वनक्षेत्र वाढले
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याचे वनक्षेत्र वाढले असल्याचे वरील अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गोवा सरकारने राज्यातील खासगी वनक्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे खासगी वनक्षेत्रातील वृक्षतोड तुलनेने कमी झालेली आहे. तसेच राज्यातील खारफुटीच्या झाडांचे प्रमाणही वाढतच चालले आहे. ह्या दोन गोष्टींमुळे राज्यातील वनक्षेत्र वाढण्यास मदत झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

वनक्षेत्राच्याबाबतीत देशात पहिला क्रमांक लक्ष्यद्वीप ह्या बेटाचा आहे. केंद्रशासीत प्रदेश असलेल्या लक्ष्यद्वीपमधील ९०.३३ टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली आहे. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक ईशान्येकडील मिझोरम ह्या राज्याचा असून त्यांचा ८६.२७ टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली आहे. त्यानंतर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह (८१.७३), अरूणाचल प्रदेश (७९ टक्के), मणिपूर (७७.६९), मेघालय (७६.४५), नागालॅण्ड (७५.३३) व त्रिपुरा (७३.६८) यांचा क्रम लागतो.
भरपूर प्रगती केलेले गोवा वनक्षेत्राच्याबाबतीत ९व्या क्रमांकावर आहे हे विशेष. इवल्याशा गोव्यात म्हादई, मोले, बोंडला खोतीगाव, नेत्रावळी ही अभयारण्ये व भगवान महावीर राष्ट्रीय उद्याने आहेत. ह्या अभयारण्यांचा राज्यातील वनक्षेत्र अबाधीत राहण्यासाठी मोठा फायदा झाला आहे.