सर्वांत ‘पुढे’ आहे..ऽऽ!

0
117

– प्रा. किरण पाठक, डिचोली
‘‘सर्वांत पुढे आहे ऽ हा महाराष्ट्र माझा ऽ…’’ ही जाहिरात रोज टीव्हीवर ऐकू येते आणि कान अगदी तृप्त होतात. तशा टीव्हीवर अनेक अफलातून जाहिराती पाहायला मिळतात. पण त्यातले ‘सत्य’ आपण गृहित धरलेले असते. उदा. काही साबणांनी लिंबाचा ताजेपणा अनेक वर्षें धारण केला होता. लिंबू या नैसर्गिक, स्वादवर्धक, रसमय, औषधी फळाचा वापर अनेक उत्पादनांत इतका केला गेला आहे की स्वतः लिंबूच आश्चर्यचकित होईल!
या गोष्टींकडे आपण जरा सकारात्मकतेने पाहूया- ‘जगातल्या अनेक सुंदर गोष्टींचा आणि व्यक्तींचा उपयोग आपल्या जाहिरातीत करणे म्हणजे एक सृजनशीलता’ म्हणून पाहायला आमच्यासारख्यांनी शिकायला हवे. किंवा ‘जाहिरात ही केवळ जाहिरातच असते’ एवढे साधे सत्य आमच्या सारख्यांना का पचू नये? जाऊ दे. ‘आता सर्वांत पुढे आहे’ म्हणजे काय असावे… याचा विचार करुया.
एखादे राष्ट्र सर्वांत पुढे आहे असे दाखवताना- भरपूर जलसंपत्ती, कामगारांना काम, अद्ययावत शिक्षण, तंत्रज्ञानाची प्रगती, स्वच्छ कारभार, पारदर्शक व्यवहार इत्यादी इत्यादी जे काही जगात आहे, त्या सर्वांत हे महाराष्ट्र पुढे आहे- म्हणून तेथे राहणार्‍या लोकांनी आपण मुळातच ‘सर्वांत पुढे’ आहोत याची जाणीव बाळगून उगीच सरकारचे उणेदुणे काढीत बसू नये व आहे त्यात धन्यता मानावी असा एक अर्थ होतो.
यावर थोडा विचार केला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. महाराष्ट्र सोडून इतरत्र विविध पक्ष कार्यरत आहेत, त्यांना सत्ता मिळाली आहे त्यात काही ‘नवखे’ आहेत. त्यांना तर राजकारणाचा अनुभवच नाही व जे पक्ष अगदी मुरलेले आहेत ते सत्ता भोगून भोगून सुस्त वगैरे झालेले असावेत. अशा परिस्थितीत इतरांचे गुण घेणे किंवा त्यांच्यातील चांगल्या गोष्टी उचलणे याची आपल्याला मुळीच गरज लागणार नाही.
कदाचित ‘सर्वांत पुढे..’ म्हणजे सर्व जगात पुढे असा जर लोकांचा समज झाला तर त्यात काही गैर नाही. तसे हे महाराष्ट्र तर इतिहासातील वीरांनी, संत-महंतांनी बरेच मोठे केले आहे हे निर्विवाद आहे. इतिहासात नोंद असलेले व नसलेले ही अनेक शूर इथे अगदी घराघरांत सापडतात. पण त्या काळात कमतरता होती ती टीव्हीची! म्हणूनच महान व्यक्ती लोकांच्या नजरेत येण्यास मोठाच कालावधी लागत असे.
पुस्तके, वृत्तपत्रे, आकाशवाणी, जाहीर सभा इ. माध्यमातून खूप माहिती लोकांपर्यंत पोहोचत असे. पण त्या काळाची आणि आजची तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा तर आपण सर्वचजण पारतंत्र्यात होतो. तेव्हाचे वीर देशाला परसत्तेच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व जाचक गुलामगिरीचा विरोध करण्यासाठी लढत होते.
आजचे वीर खरेच शूर आहेत. म्हणूनच की काय त्यांना भेटणे किती मुश्कील झाले आहे! त्यांच्या पुढे-मागे किती लवाजमा! गाड्यांचा ताफा अन् सिक्युरिटी. कित्ती कित्ती शूर! अहो पण शौर्य दाखवणार तरी कुठे? काय आपल्याच लोकांविरुद्ध लढायचे का असते? अहो ते लढत आहेत गरिबीविरुद्ध! जुन्या नेत्यांनी दिलेली वचने आज हे पाळत आहेत. फार फार अवघड कार्य आहे हे. कदाचित त्या पूर्वीच्या नेत्यांना पुढचा काही अंदाजच नव्हता. जाहीर करून बसले- ‘गरिबी हटाव!’ आणि यांच्या डोक्यावर सगळी जबाबदारी येऊन पडली(?). अहो एवढी मोठी लोकसंख्या तेव्हा कुठे होती? गरिबी हटवताना काही तत्त्वांचे प्रश्‍न मध्ये येतात. सरकार सर्वांचे प्रश्‍न सोडवीत आहे. घाबरू नका- आम्ही मूळचेच शूर आहोत. सर्वांत पुढे येणारे आम्हीच नव्हे तो आमचा हक्कच आहे.
‘पुढे’ शब्दावरून अनेक गमती-जमती आठवतात. मोठ्या कार्यक्रमांना पुढच्या खुर्च्या राखीव असतात. शिक्षण क्षेत्रात मात्र हा शब्द निषिद्ध मानला जातो. तिथे ‘राखीव’ हा शब्द तेजीत आहे. असेच एका शैक्षणिक कार्यशाळेत ‘सर्वांत पुढे कोण?’ असा प्रश्‍न मांडण्यात आला होता. खरे तर असले चमत्कारिक प्रश्‍न विचारणे लोकशाहीला (एज्युकेशनल डेमॉक्रसीला) धरून नव्हते. पण किती मजेदार उत्तरे मिळत गेली व शिक्षक शिकत गेले.
— ‘सर्वांत पुढे’ म्हणजे ‘पहिला बाक’ मानला तर त्यावर शक्यतो कोणी बसत नाही. म्हणून तो निर्जीव बाकच सर्वांत पुढे असा निष्कर्ष पुढे आला. तरीपण दुसर्‍या बाकावरील मुलांनी आपणच सर्वांत पुढे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला- उगाच निर्जीव बाकांची आणि आमची तुलनाच कशाला करायची?
पण मागच्या बाकावरील महंतांना हे गैर वाटले. त्यांच्या मते ‘ते’च सर्वांत पुढे होते, कारण ‘पाठीमागून पहिल्या’ बाकावर बसून संपूर्ण वर्गावर नजर ठेवता येते. निरीक्षण स्वातंत्र्य जर आयते मिळत असेल तर हा केवढा मोठा ‘प्लस पॉइंट’! तिरक्या नजरेने खिडकीबाहेर पाहता येणे म्हणजे अधिक सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्राप्तीचा अधिकार. शिवाय कॅन्टीनमध्ये तयार होणार्‍या गरम बटाटेवड्याचा वासास्वाद त्यांनाच प्रथम प्राप्त होतो. घंटेचा पहिला टोल पडला की उडी मारून तेच लोक कँटीनकडे लवकर पोहोचतात.
जो सर्वांत ‘प्रथम’ पोहोचतो तोच सर्वांत पुढे असतो हे समजायला काय बुद्धी वापरावी लागते? खरे तर ‘मागे’ असणार्‍यांना ‘पुढे’ आणण्याची व्यवस्था असणे म्हणजेच निकोप लोकशाही असे म्हटल्यास गैर होणार नाही.
पुढे असणे म्हणजेच ‘पुढारीपण’ असाही एक अर्थ लोकशाहीत अभिप्रेत आहे. आपल्याला नेहमी पुढे राहण्यासाठी खूप सावध, जागरूक राहावे लागते. आपल्याच देशवासीयांना प्रसंगी शत्रूचा दर्जा देऊन- निव्वळ विरोधकांच्या तराजूत जोखायचे असते. किंबहुना विरोधकांनी एखादा चांगला (पुरोगामी) कार्यक्रम राबवलाच तर त्याचे बारा वाजवण्याचे कट-कारस्थान करणे म्हणजेच पक्षहित आणि पक्षहित म्हणजेच देशहित. किती सरळ सरळ व्याख्या आहे ही! कोठेही जा, आमचे धोरण हेच!
ते ‘अमुक’ राष्ट्र जे सर्वांत पुढे आहे त्याचा जगातल्या इतरांनाही काही काही शोध-बोध घ्यावयास हरकत नाही. इथे ‘क्लास डिफरन्स’ औषधालाही नाही. एके काळचे समशेर बहाद्दर आणि तथाकथित खानदानी कुलपती आता मागासवर्गीय झाले आहेत. बरोबर आहे. आपल्या संतांची हीच शिकवण आहे. ‘शरणागत दीनार्त’ वगैरे उक्ती काय दर्शवतात?
‘संत तेणे व्हावे, जग बोलणे सोसावे’ या उक्तीप्रमाणे कोणाच्याही टीकेचा या ‘अमुक अमुक’ राष्ट्रावर कसलाही परिणाम होत नाही. उलट तुमच्या कडवट टीकेचा उपयोग करून घेऊन त्यापासूनही आपल्या फायद्याचा काहीतरी ‘फंडा’ तयार करण्यातच आमची यशस्वितता दडली आहे. खराब धान्यापासून विविध प्रकारचे उत्तम मद्य तयार करता येते हे जगाला दाखवणे व उत्पादकतेच्या क्षेत्रात अनेक घटकांचा एकाच वेळी वापर करणे यासारखे पुढारलेपण दुसरीकडे कुठेच दिसणार नाही. (चरस, गांजा इ. पदार्थ जनसामान्यांना परवडणार नाहीत याचा विचारही इतरांनी केलेला दिसत नाही.) आहोत ना आम्ही सर्वांत पुढे?