सर्जिकल स्ट्राईकची वर्षपूर्ती ः काय साधले?

0
122
  • शैलेंद्र देवळाणकर

उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला एक जोरदार तडाखा दिला. या कारवाईला नुकतेच एक वर्ष झाले; मात्र या वर्षभरात दहशतवादी हल्ले, त्यामध्ये शहीद होणार्‍या जवानांची संख्या, घुसखोरीच्या घटना यांमध्ये वाढच झाल्याचे दिसत आहे. यावरुन हे पाऊल असङ्गल ठरले असा सूर उमटत आहे. तो कितपत खरा आहे?

२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराच्या ७० सैनिकांनी ताबारेषा पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला आणि पाकिस्तानच्या भूभागावरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला त्यामागे उरीवरील हल्ला हे तात्कालिक कारण होते. उरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळात प्रवेश करून १९ जवानांची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यामुळे भारतीय जनमत प्रक्षोभक झाले होते. त्यापूर्वीही असे हल्ले लष्करी तळांवर आणि सीमेवर होतच होते. भारतीय लष्कर, नागरिक यांच्यावर सातत्याने होणार्‍या या दहशतवादी हल्ल्यांबाबत भारताची प्रतिक्रिया काय आहे, लष्कर प्रत्युत्तरासाठी खरेच तयार आहे का की निमूटपणे भारत हल्ले सहन करत आहे, पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे की नाही असे प्रश्‍न सर्वत्र उपस्थित होऊ लागले होते.

थोडक्यात, भारताच्या लष्करी आणि राजनैतिक क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या भूमीत शिरून अशा दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो, तसेच प्रतिहल्ला करू शकतो हे भारतीय जनतेला सांगणे गरजेचे बनले होते. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक हा एक प्रकारे भारतीय जनमानसाच्या मनातील क्षोभाचे प्रतिनिधित्व करणारा होता. आम्ही बचावात्मक प्रतिकाराबरोबर (डिङ्गेन्सिव्ह रिस्पॉंड) हल्लाही (ऑङ्गेन्सिव्ह ऍटॅक) करू शकतो, हे भारताने सर्जिकल स्ट्राईकमधून पाकिस्तानला दाखवून दिले. यामुळे सर्जिकल स्ट्राईक केल्यास भारताला प्रत्युत्तर देऊ या गणितालाही छेद गेला. त्यामुळेच सर्जिकल स्ट्राईक झाला हे पाकिस्तानने मान्यच केले नाही, कारण मान्य केले असते तर पाकिस्तानला मागील काळात दिलेल्या धमक्यांनुसार अण्वस्त्र हल्ला अथवा प्रतिहल्ला करावा लागला असता.

सर्जिकल स्ट्राईककडे आपण प्रतिरोधनाचे साधन म्हणून पाहतो, हे पाकिस्तानला सांगायचे होते. इन्स्ट्रुमेंट ऑङ्ग डेटर म्हणजे या स्ट्राईकमधून पाकिस्तानने धडा घ्यावा आणि भारतावर पुन्हा अशा प्रकारचा सर्जिकल अटॅक करण्याची वेळ आणू नये, हा यामागील सर्वांत महत्त्वाचा उद्देश होता. पण सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष झाल्यानंतर प्रत्यक्षात हा उद्देश सङ्गल झाला आहे का? याबाबत आकडेवारी काय सांगते? साऊथ एशिया टेररिझम पोर्टल या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर एक वर्षात दहशतवादी हिंसाचाराच्या ३५० घटना घडल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईकपूर्वीच्या वर्षभरामध्ये ३८ भारतीय जवान शहीद झाले होते; पण नंतरच्या एक वर्षात ६८ जवान मृत्युमुखी पडले.

स्ट्राईकपूर्वी जवळपास सीमापार गोळीबाराच्या ३०० घटना घडल्या होत्या तर सर्जिकल स्ट्राईक नंतर त्यामध्ये वाढ होऊन हा आकडा ४५०वर पोहोचला. सीमापार घुसखोरीचे प्रमाण दुप्पट झाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये ३५० घुसखोरीच्या घटना घडल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे दहशतवादी पुन्हा भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याचाच अर्थ, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने धडा तर घेतला नाहीच उलट घुसखोरीत वाढच झालेली दिसते. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे पाऊल असङ्गल ठरले असे मत व्यक्त होत आहे. पण प्रत्यक्षात तसे म्हणता येणार नाही. वास्तविक सर्जिकल स्ट्राईकनंतर जे डावपेच आखणे आवश्यक होते ते आखले गेले नाहीत. त्यामुळे दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली. दहशतवाद्यांच्याबरोबरच्या लष्करी चकमकी वाढत गेल्या. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरी वाढत गेली. त्यांच्या बंदोबस्तासाठी प्रतिहल्ला करताना जवान प्राणाशी मुकले. मात्र याचाच दुसरा अर्थ दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी आपण अधिक आक्रमक झालेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे सर्जिकल स्ट्राईकमागची दोन प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पहिले उद्दिष्ट पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडणे हे होते.

यामध्ये आपण बर्‍यापैकी यशस्वी झालो आहोत. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक बांगलादेश आणि अङ्गगाणिस्तान या दोन मुस्लिम राष्ट्रांनी उघडपणे केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार्‍या सार्क परिषदेत सहभागी होण्यास सदस्य देशांनी नकार दर्शवला. त्यामुळे ती रद्द करण्यात आली. दुसरीकडे ब्रिक्स परिषदेतही पाकिस्तानवर उघड टीका करण्यात आली. पाकिस्तानातील लष्करे तैय्यबा आणि जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनांचा निषेध ब्रिक्सच्या जाहीरनाम्यातून करण्यात आला. त्यापूर्वी अमेरिकेकडून अङ्गगाणिस्तान आणि पाकिस्तानसंदर्भातील धोरण घोषित केले गेले. यामध्ये पाकिस्तानातून दहशतवादाची जगभर निर्यात होते हे मान्य करण्यात आले आणि ते थांबवण्यासाठी पाकिस्तानला इशाराही देण्यात आला. अलीकडेच पाकिस्तानला देण्यात येणार्‍या मदतीलाही ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. या सर्वांचा सारांश असा की, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडण्यात भारताला यश मिळाले. अङ्गगाणिस्तान असो किंवा भारत; जगात जिथेही इस्लामी दहशतवाद सुरु आहे त्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आहेत ही भारताची भूमिका आता जगभरातील देश मान्य करू लागले आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतरचे हे खूप मोठे यश आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

सर्जिकल स्ट्राईकचे दुसरे उद्दिष्ट होते लष्कराचे मनोबल वाढवणे. सर्जिकल स्ट्राईक जरी लष्करी कारवाई असली तरीही त्याला सरकारची – राजकीय नेतृत्वाची – परवानगी गरजेची होती. ती मिळाल्यामुळे आणि भारताने यशस्वी कारवाई केल्यामुळे लष्कराचे मनोबल वाढले. लष्कराचे मनोबल वाढल्याचा परिणाम गेल्या वर्षभरात दिसून आला आहे. सर्जिकल स्ट्राईक आधीच्या वर्षभरात ७० दहशतवादी मारले गेले होते; मात्र एक वर्षानंतर १९९ दहशतवादी मारले गेले आहेत. सैन्याचे मनोबल वाढल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानचे घुसखोरीचे सर्वच प्रयत्न आपण निष्ङ्गळ ठरवत आहोत. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकी वाढत आहेत, त्यांना पैसे पुरवण्यार्‍यांना सक्तवसुली संचालनायाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, दहशतवाद्यांना पकडून मारले जात आहे. थोडक्यात भारतीय लष्कर आक्रमक झाले आहे.

आता शेवटचा मुद्दा उरतो तो पाकिस्तानने यातून धडा का घेतला नाही? इतर सर्व लक्ष्ये आपण पूर्ण केली आहेत; पण पाकिस्तानने धडा घ्यावा हे लक्ष्य कसे साध्य करायचे हा आता कळीचा प्रश्‍न शिल्लक आहे. गेल्या ३० वर्षांपासून भारताविरोधात पाकिस्तान प्रॉक्सी वॉर म्हणजे दहशतवादाच्या माध्यमातून हल्ले करत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी भारताने पाकिस्तानबाबत एक राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखणे आवश्यक आहे. आज ह्या धोरणाचाच अभाव आहे.