सरळ झाडच वाचावे!

0
203
  • मीना समुद्र

स्वप्नांचे, कल्पनांचे, श्रद्धेचे, भावनेचे, संवेदनशीलतेचे जग पुस्तकांप्रमाणेच झाडेही शांतपणे, मूकपणे आपल्यासमोर साकार करतात. पुस्तक वाचनाने मिळणारा ब्रह्मानंदसदृश्य आनंद झाडांच्या वाचनाने मिळेल याची खात्री श्री. वसंत डहाके यांना वाटत असावी म्हणून त्यांनी झाड वाचण्याचा सल्ला दिला असावा.

झाड तोडायचे, कापायचे
लगदा करायचा, कागद बनवायचा
त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे
एवढा खटाटोप कशासाठी?
सरळ झाडच वाचावे!
श्री. वसंत आबाजी डहाके यांच्या या ओळी वाचल्या आणि मनात आले, खरंच! झाडच वाचायला हवे! त्याच्या रूपांतरात, संवर्धनात माणसाचे कष्ट असले तरी आजकाल सर्रास वृक्षकटाई चालली आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आहे. निसर्गाचा समतोल ढळतो आहे. सृष्टीचे सारे सौंदर्य नष्ट होत आहे. यासाठी हे सारे एका समीक्षक, लेखक-कवीने आपली मानवी स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून नैसर्गिकता किंवा स्वाभाविकता जपणे किती आवश्यक आहे हे मोठ्या खुबीने सांगितले आहे असे वाटते. यात थोडासा चिमटा घेत एक सत्यही मांडले आहे. पण हे झाड वाचावे कसे?
झाड कापून, लगदा वाळवून त्यापासून मिळणारा कागद पुस्तकांसाठी वापरला जातो. पुस्तकवाचन, ग्रंथवाचन हे माणसाला खूप काही शिकवतं, ते त्याला घडवतं. झाडांच्या व्यवस्थित वाढीसाठी काटछाट आवश्यक असली तरी सरसकट अविचाराने, बेपर्वाईने किंवा स्वार्थी वृत्तीने कापलेली झाडे म्हणजे माणसाच्या हातून घडणारा घोर अपराधच आहे. पुस्तकांसाठी- कागदासाठी झाडे कापण्याचे कारण पुढे केले गेले तरी त्यापेक्षा निसर्गवाचन, अरण्यवाचन करावे असे कवीला वाटते. कारण झाडे असतात प्राणिसृष्टी, मानवीसृष्टीमधला दुवा. ऋतुचक्राचा महत्त्वाचा सांधा. हे ओळखणार्‍या आपल्या तुकारामांनी त्यांना ‘सोयरे’ मानले. कबीरांनी ‘सरवर तरवर संत जन चौथा बरसे मेह’ म्हणत परमार्थकारणास्तव या जलाशयांनी, वृक्षांनी, संतजन आणि मेघांनी देह धारण केला आहे असे म्हटले आहे.

आपल्या पूर्वजांनी, साधूसंतांनी हे ओळखले होते. कारण त्यांचा अधिवास रानावनात, वृक्ष सान्निध्यातच असे. त्यांनी या वृक्षवल्लरींचे वाचन केले होते, निरीक्षण केले होते, परीक्षण केले होते. त्यांचे रेशिमबंध त्यांच्याशी जडले होते. त्यांना त्यांनी जाणले होते- अंतर्दृष्टीने आणि बहिर्दृष्टीनेही.

ही सारी आपली साथी-सोबती आहेत, एवढेच नव्हे तर आपले सारे जीवनच या तरूवेलींवर अवलंबून आहे हे त्यांनी जाणले होते. त्यांनी झाडे वाचूनच अनुमाने काढलेली होती जी सदासर्वकाळ मानव कल्याणार्थ, त्याच्या हितार्थ होती आणि आहेत. अवतीभवतीच्या झाडांचा संदर्भ त्यांच्या जगण्यातल्या हरएक क्रियेला होता.

जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांचीच हिरवी चैतन्यमय सतत साथ. झाडांनी सूर्याच्या तेजोमय किरणांपासून तयार केलेले अन्न आणि स्वतः माणसासाठी तयार केलेले अन्न खातच माणसाचा श्‍वास चालू राहतो. त्याच्या पंचप्राणांशी झाडाची संगतसोबत. वस्त्रही त्यानेच दिलेले आणि निवाराही त्याच्याच सहाय्याने तयार झालेला. सावलीही त्यानेच दिलेली आणि प्रसंगी मूक आधारही. त्याच्याखाली बसून अन्नाची शिदोरी खावी, सुख-दुःखाची गाठोडीही मोकळी करावीत, शिळोप्याच्या गप्पा कराव्यात आणि निःभ्रांत पहुडावे. झाड आपल्याला सतत आसरा देते, पाठीराखे होते हे माणसांनी अनुभवले. कधीतरी होणार्‍या अस्वास्थ्यात मदतीला येते हेही पाहिले. प्राणिमात्रांच्या अन्नासाठी पाऊस आणणारीही तीच आणि होरपळीत विंझणवारा करणारीही तीच, हे त्यांनी हेरले. मातीशी ईमान ठेवून आभाळाशी दोस्ती करणारी, तेजाच्या ओढीने वरवर जाणारी, सदैव फांद्यांचे हात पसरून प्रार्थनागीत गाणारी आणि शरीरमनाला तुष्टीपुष्टी मनःशांती देणारी झाडे म्हणजे माणसाचे संगीसाथी तसेच खरेखुरे हितचिंतक!
वड, पिंपळ, औदुंबर, कदंब यांनी विस्ताराच्या, उंचीच्या, जपणुकीच्या, प्रीतीच्या कथा सांगितल्या. कडुनिंब, आवळा, तुळससारख्या औषधी वनस्पतींनी माणसाला सतेज, निरामय, प्रसन्न ठेवले.

तुळशीसारख्या साध्या रोपट्यांनी शीतल आल्हादाची पेरणी माणसावर जीवनभर केली. हे सारे आपल्या पूर्वजांनी वाचले आणि त्यांनी त्या झाडांना पूज्य मानले, त्यांना पावित्र्याची मूर्ती मानले, त्यांच्यात ईश्‍वरत्व पाहिले आणि त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग मानवहितार्थ, मानवकल्याणार्थ होतो हे त्यांच्या लक्षात आले आणि पुस्तक वाचनाने जसा माणूस सुधारतो तसा तो सुधारला. अधिक सुजाण अधिक सज्ञान बनला. पुस्तके आपण आपल्या आवडीनुसार निवडतो, कथा, कादंबर्‍या, नाटक, काव्य आणि असंख्य प्रकारची पुस्तकं आपापल्या आवडीप्रमाणे निवडून सवडीप्रमाणे माणूस वाचतो. झाड हे तर खुल्या पुस्तकासारखेच! बीज रुजून, अंकुर प्रस्फुटित झाल्यानंतर कोंब, रोप असे वाढत वाढत बुंध्याला फुटणार्‍या फांद्या, डहाळ्या; त्यावर लगडणारी पानांची हिरवीजर्द माया, ऋतुमानानुसार फुलणारी फुले, रंगीबेरंगी फुलातून जन्मणारी फळे; झाडांचे मोहर, फुलांचे बहर, त्यावर झेपावणारी असंख्य पाखरे, त्यामुळे निनादणारे नांदत्या-गाजत्या वाड्यासारखे प्रशस्त झाड, त्यावरची पक्ष्यांची कोटरे, घरटी, ढोली; झाडांचे वय सांगणारा वलयांकित बुंधा; मातीशी घट्ट जखडलेली मुळे आणि आकाशाशी नाते सांगणारा उन्नत माथा- किती किती वाचावे झाडांना! फुलांचे रंग, सौंदर्य, सुगंध त्यांची नजाकत; फळांची रसमयता; पानांची हरितसंपन्नता हे सारे फक्त देण्यासाठी. झाडांचा श्‍वास, त्यांचा भास, आभास, त्यांचे विकसन, प्रसरण, सारे सारे फक्त देण्यासाठी. नद्या स्वतःचे पाणी स्वतः पीत नाहीत, ‘स्वयं न खादानी फलानि वृक्षाः’- वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाहीत. एवढेच नव्हे तर फलभाराने ती उन्मत्त न होता नम्र होतात. हे सारे आपल्या वनवासी, रानवासीयांनीही पाहिले, वाचले, अनुभवले, स्वीकारले, वाखाणले. त्याच्याखाली, त्याच्यात आणि त्याच्यावर वास्तव्य केले. त्यांचे संरक्षण घेतले. गारवा, ऊब घेतली. सुख-दुःख हे चक्रनेमिक्रमेण येते. आज पानगळ होऊन शुष्क होणारी झाडे पुन्हा वसंतात हिरवा तजेला धारण करतात हेही पाहून वाचून माणूस निराश न होता रात्रीच्या गर्भात दडलेल्या उद्याच्या उषःकालाची वाट मोठ्या आशेने आणि आतुरतेने पाहायला शिकला. हा हिरवा दिलासा सतत लाभलेले ना. धो. महानोर म्हणून तर म्हणतात, ‘मी रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द जहालो’ आणि रवींद्रनाथ टागोर मुलांची शाळाच वृक्षाखाली, झाडाखाली भरवतात. बालतरूची पालखी मिरवत वृक्षारोपणाचे बीज छोट्यांच्या मनी ठसवतात. स्त्रियांची व्रतवैकल्ये, सणवार झाडं-पानं-फुलां-फळांशिवाय साजरे होत नाहीत. स्वप्नांचे, कल्पनांचे, श्रद्धेचे, भावनेचे, संवेदनशीलतेचे जग पुस्तकांप्रमाणेच झाडेही शांतपणे, मूकपणे आपल्यासमोर साकार करतात. पुस्तक वाचनाने मिळणारा ब्रह्मानंदसदृश्य आनंद झाडांच्या वाचनाने मिळेल याची खात्री श्री. वसंत डहाके यांना वाटत असावी म्हणून त्यांनी झाड वाचण्याचा सल्ला दिला असावा.