सरदेसाई विरोधातील तक्रार नोंद न केल्याने पोलिसांना नोटीस

0
83

>> आयरिश रॉड्रिगीस यांची याचिका

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याविरुद्ध फातोर्डा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची याचिका ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली. त्यावेळी त्वरित न्यायालयाने दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस व फातोर्डाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांना नोटीस पाठविली असून, त्यांना आपले म्हणणे न्यायालयात मांडण्याचा आदेश दिला आहे.
ऍड. आयरिश यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील खुल्या जागेचे रूपांतर भूखंडात करून ते मनोहर पर्रीकर आणि माजी आमदार दामू नाईक यांना देऊन भ्रष्टाचार केल्याचा दावा करून तक्रार केली होती. या प्रकरणात मंत्री सरदेसाई यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी काशिनाथ शेट्ये यांच्यावर दबाव आणला होता अशी तक्रार केली होती. फातोर्डा पोलिसांनी ही तक्रार नोंदवून न घेण्यामागे राजकीय दबाव असल्याचा संशय आयरिश यांनी न्यायालयात व्यक्त केला. फातोर्डा पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने नंतर त्यांनी दक्षिण गोव्याच्या अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली होती.