सरदार, देवेंद्रची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

0
88

>> अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूी नावे

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाझरिया यांची प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच अर्जुन पुरस्कारांसाठी एकूण १७ खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
सरदार सिंह याची यापूर्वीही या पुरस्कारसाठी शिफारस झाली होती. सरदार सिंह हा भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक तर वर्ल्ड हॉकी लीगचे कांस्य पदक प्राप्त केले आहे. सरदारच्याच नेतृत्वाखाली भारताने आशियाई खेळांत अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करीत ऑलिम्पिकमध्ये आपला थेट प्रवेश मिळविला होता. सरदारची यापूर्वी २०१५ साली पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली होती. देवेंद्र झाझरिया हा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला पॅरालिम्पीकपटू ठरेल. रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
खेलरत्न पुरस्काराव्यतिरिक्त क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पीकपटू मिरअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया यांच्यासह १७ खेळाडूंची नावे अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.