सरकार अंगणवाडी, के. जी.च्या शिक्षकांना खाण प्रशिक्षण देणार

0
96

>> शिक्षण संचालक गजानन भट यांची माहिती

शिक्षण खात्यातर्फे राज्यातील बालवाडी, अंगणवाडी, खासगी संस्थांच्या शिशूवाटिकांतील (के. जी.) शिक्षणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षकांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल दिली.

शिक्षण खात्यातर्फे दहावीचा उत्कृष्ट निकाल लागलेल्या सरकारी विद्यालयांच्या सन्मान सोहळ्यात शिक्षण संचालक भट बोलत होते. यावेळी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत, गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. राज्यातील बालवाडी, अंगणवाड्यांमधील शिक्षणाबाबत कोणताही अभ्यासक्रम निश्‍चित केलेला नसल्याने लहान मुलांना मर्जीनुसार शिकविले जात आहे. बालवाडी स्तरावर शिक्षणात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारी आणि खासगी बालवाडीच्या शिक्षकांना मुलांना शिकविण्याबाबत खास प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही संचालक भट यांनी सांगितले.

नववीत नापास करणार्‍यांना इशारा
राज्यात नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना नापास करणार्‍या विद्यालयांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा संचालक भट यांनी दिला. दहावीचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी नववीच्या वर्गात मुलांना नापास केले जात आहे. नववीमध्ये मुलांना थोपवून धरण्याचे खासगी शिक्षण संस्थांकडून प्रयत्न केले जात आहे. या प्रकाराची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली आहे, असेही भट यांनी सांगितले.
शिक्षण खात्याने शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी विद्यालयांतील शिक्षकांना बढत्या दिल्या आहेत. नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.