सरकारी शिमगोत्सव ३ मार्चपासून

0
135

राज्यातील सरकारी पातळीवरील शिमगोत्सव ३ ते १७ मार्च २०१८ दरम्यान साजरा केला जाणार आहे. शिमगोत्सव मिरवणुकीत स्पर्धात सहभागी होणार्‍या पथकांनी प्रवेश अर्ज ८ दिवस पूर्वी आयोजक समितीकडे सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शिमगोत्सव मिरवणुकीचा कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील सरकारी पातळीवरील शिमगोत्सवाच्या आयोजनावर चर्चा करण्यासाठी पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल, सरकारी अधिकारी, पोलीस, वाहतूक पोलीस प्रतिनिधी, नगरपालिका मंडळाचे प्रतिनिधी याची उपस्थिती होती. शिमगोत्सवाची मिरवणूक वेळेवर सुरू होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत चालत असल्याने नागरिकांना शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे शिमगोत्सवाच्या रोमटामेळ मिरवणुकीला संध्याकाळी ४ वाजता प्रारंभ केला पाहिजे.

तसेच संध्याकाळी ६ वाजल्यापासून चित्ररथ मिरवणुकीला सुरूवात करून रात्री १० वाजेपर्यत मिरवणूकीचा कार्यक्रम पूर्ण करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. शिमगोत्सवाचे नियोजन योग्य पध्दतीने करण्यासाठी शिमगोत्सव मिरवणकीतील रोमटामेळ, चित्ररथ व इतर स्पर्धात सहभागी होणार्‍यांनी ८ दिवस पूर्वी संबंधित आयोजक समितीकडे अर्ज सादर करावेत. शिमगोत्सव मिरवणुकीच्या स्पर्धांच्या बक्षीसांच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिमगोत्सव यशस्वी करण्यासाठी स्थानिक समितीनी योग्य नियोजन करावे, अशी सूचना पर्यटन मंत्री आजगावकर यांनी केली.

राज्यातील शिमगोत्सव मिरवणुकीला ३ रोजी फोंड्यातून प्रारंभ होणार आहे. ४ रोजी मडगाव, ५ रोजी वास्को, ६ रोजी सांगे, ७ रोजी साखळी, ८ रोजी वाळपईस ९ रोजी डिचोली, १० रोजी पणजी, ११ रोजी म्हापसा, १२ रोजी पेडणे, १३ रोजी काणकोण, १४ रोजी केपे, १५ रोजी कुडचडे, १६ रोजी कुंकळ्ळी, १७ रोजी धारबांदोडा येथे मिरवणूक होणार आहे.