सरकारी योजना, प्रत्येकासाठी!!

0
107

नागेश सरदेसाई (वास्को)

‘सबका साथ, सबका विकास’ याने मागील ३६ महिन्यांत बरेच लाभ मिळवून दिलेले आहेत. आज अनेक नावीन्यपूर्ण योजना जनतेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत- मग ती स्त्री असो, तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, पण इथे प्रत्येक नागरिकासाठी योजना आहे.

नुकतीच आपण स्वातंत्र्याची ७०वी वर्षगाठ साजरी केली, हीच वेळ आहे की आपण या काळात काय प्रगती केली याचा आढावा घेण्याची! जगाने हा गारुड्याचा खेळ समजून आपल्याला उपभोगण्याच्या खूप कमी संधी दिल्या, पण शेवटी आपण त्यांना खोटं ठरवून एक अखंड राष्ट्र म्हणून उभे ठाकलो. ‘विविधतेत एकता’ या तत्त्वामुळेच आपण आज एकत्र आहोत. आपली प्राचीन संकल्पना – ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘हे विश्‍वची माझे घर’ हाच मंत्र प्रत्येक भारतीयाचा, मग तो कोणत्याही जातिधर्माचा असो!
शिक्षण आणि आरोग्य सेवा ही भारताला सोडाच पण कोणत्याही देशाच्या आर्थिक संपन्नतेची पार्श्‍वभूमी असते. साक्षरता, जी स्वातंत्र्याच्या काळात अत्यल्प होती, तिने आज ७० टक्क्यांची पातळी पार केलेली आहे. आरोग्याच्या निर्देशांकांमध्येही झपाट्याने सुधारणा झालेली दिसून येते आहे. वैद्यकीय विज्ञानातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे आणि ‘‘स्वास्थ सर्वांसाठी’’ ही फक्त घोषणा राहिलेली नाही. स्वातंत्र्याच्या वेळी जो भारत मागासलेला होता त्याने उद्योगामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. बर्‍याच महत्त्वाच्या भागात औद्योगिक क्रांतीने प्रगती साधली आहे. स्पेस सायन्स आणि ऍटोमिक एनर्जी यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे केंद्र प्रस्थापित करून प्रगतीची कवाडे उघडी केली असून आर्यभट्ट, रोहिणी व आजची इन्सॅट सिरीज सॅटेलाईट्‌स लॉंच करून भारत आज जगात स्पेस रिसर्चमध्ये नेतृत्व करीत आहे. ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ या पोखरणमधील परमाणू विस्फोटाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयींनी दिलेल्या घोषणेने भारताला न्यूक्लिअर क्लबचे सदस्यत्व बहाल केले आहे. पण भारत हा शांततेसाठी परमाणू ऊर्जेचा वापर करणारा देश आहे.
आंतरराष्ट्रीय वर्तुळातही देशाची प्रगती वाखाणण्यासारखी आहे मग ती नॉन-अलाइड मूव्हमेंट असो किंवा ब्रिक्स असो. देशांशी बंधुत्वाचे संबंध राखण्यात भारत आज अग्रेसर असून युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलची कायम सदस्यता मिळविण्याच्या यादीत प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे. आमच्या देशातील तरुणांची प्रगती कौतुकास्पद असून त्यांनी ऑलिम्पिक, एशियन आणि जागतिक चॅम्पियनशिपच्या खेळांमध्ये अनेक पदकं मिळवलेली आहेत. अभिनव बिंद्रा ते कर्नल राजवर्धन राठोड, या सगळ्यांनी सुपरस्टार्सच्या समूहात स्थान मिळवून भारताची मान गर्वाने उंच केली आहे. तसेच आपल्या किशोरी किंवा तरुणींबद्दलही आपल्याला गर्व वाटावा अशीच कामगिरी त्यांनी केली आहे – पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दिपा कर्माकर आणि पॅरालिम्पिक ऍथलिट्‌सनी सुद्धा आपल्याला आनंद मिळवून दिला आहे व त्यांच्या स्मृती पुन्हा पुन्हा आपण जागवत राहिले पाहिजे.
२०१४ पासून भारताची नवी पहाट झालेली आहे. तीन दशकांमध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. भारताचे नवीन युग आता सुरू झाले असून त्यामध्ये ‘कमीत कमी सरकार अधिक शासन’ आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ याने मागील ३६ महिन्यांत बरेच लाभ मिळवून दिलेले आहेत. आज अनेक नावीन्यपूर्ण योजना जनतेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत- मग ती स्त्री असो, तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, पण इथे प्रत्येक नागरिकासाठी योजना आहे. ‘जन धन योजने’मुळे आज खेडोपाड्यात लक्षावधी खाते बँकांमध्ये उघडले गेलेत. डिजिटल इंडियानेही देशात क्रांती घडवून आणलेली आहे.
८ नोव्हें २०१६ रोजी केलेल्या नोटबंदीमुळे क्षणार्धात देशाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली. ‘उज्ज्वला’ योजनेच्या अंतर्गत महिलांना एलपीजी सिलिंडर्स दिल्यामुळे अश्रू ढाळणार्‍या महिलांना थोडा आनंद मिळाला. ‘नयी मंजिल योजनेमुळे’ अल्पसंख्याकांना आता मानाने जगण्याची संधी मिळाली. भारताचे नवीन युग आता खरंच सुरू झालं असून उदात्त ध्येय आणि स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना २०२२ पर्यंत दुप्पट लाभ मिळण्याची तरतूद केली असून त्यांना घरे देण्याचीही सरकारची योजना आहे. जसे आपण राष्ट्रपिता म. गांधीची १५० वी जयंती मनविण्याकडे वळत आहोत, आपल्याला ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण व चिंतन करण्याची गरज असून आपल्या देशाला स्वावलंबी व स्वयंसिद्ध बनविण्यासाठी मोठी पावले उचलण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’ योजना, तसेच ‘मुद्रा योजना’ नुकत्याच लागू केल्या आहेत. ‘डिजिटल भारत’ ही ‘थेट लाभ हस्तांतरण योजने’सोबत टाकलेले सरकारचे एक पाऊल आहे ज्याच्या अंतर्गत सरकारतर्फे विविध सबसिडी अनेक भारतीयांच्या दारापर्यंत पोहोचतील ज्यांचे आधार कार्ड व व्यक्तिगत माहिती थेट जोडली जाईल. त्यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही व सरकारच्या योजनांचा लोकांना थेट लाभ मिळू शकेल. तसेच जीएसटी लागू केल्यामुळे देशामध्ये एक सरसकट करप्रणाली निर्माण झाली असून ‘एक देश एक कर’चा मार्ग पक्का बनवला जाईल. अशा प्रकारच्या सर्व योजनांच्या द्वारे सरकार गरजू व गरिबांच्या दारात पोहोचणार आहे व ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ हा मंत्र फार पुढे रेटून देशाची प्रगती साधणार आहे यात शंका नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालेले असताना हा क्षण देशातील जनतेने व स्त्रियांनी खरोखर आनंद मनविण्याचा आहे.