सरकारी परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री

0
75

इस्पितळातील विविध विभागांत काम करण्यासाठी सरकारी परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत संस्थांशी हातमिळवणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सध्या सर्व परिचारिका सर्व विभागात काम करतात, मात्र, आता अतिदक्षता विभाग, बालरोग विभाग अशा वेगवेगळ्या विभागांत काम करण्यासाठी परिचारीकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

परिचारिकांच्या भरतीसाठी नवे धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रशिक्षित भारतीय परिचारिका संघटनेच्या गोवा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सृजन सांज’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. परिचारिका हा एक पवित्र व्यवसाय आहे. त्यांना सगळ्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात. परिणामी रुग्णांनाही चांगली सेवा व सृश्रृषा मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये आवश्यक ती सुधारणा व वाढ करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटचाही यावेळी आरोग्य मंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच यावर्षी निवृत्त झालेल्या परिचारिकांचाही राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नंतर संध्याकाळी सृजन सांज हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
गणवेशातही बदल

गोव्यात सरकारी परिचारिकांचा गणवेश बदलण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी यावेळी दिली. पूर्वीच्या गणवेशात पँट नव्हती. आता परिचारिकांच्या गणवेशात पँटचा समावेश करण्यात आलेला असून हा गणवेश आकर्षक असेल, असे राणे यांनी सांगितले.