सरकारी नारळ विक्री आजपासून टप्प्याटप्प्याने

0
702

>> आल्तिनो-पणजी व फातोर्ड्यात शुभारंभ

सरकारच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीला आज गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या टप्प्यात आल्तिनो-पणजी आणि फातोर्डा येथील गोवा फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रावर नारळ विक्रीला सुरूवात केली जाणार आहे. साधारण पंधरा दिवसात महामंडळाच्या सर्व भाजी विक्री केंद्रावरून नारळ विक्रीला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रादो यांनी काल दिली.

कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बोलताना माफक दरात नारळ विक्री करण्याची घोषणा केली आहे. शेतकी खात्याने गोवा फलोत्पादन महामंडळाच्या माध्यमातून २० रूपये दराने नारळ विक्रीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. अल्प कालावधीत सर्व ठिकाणी नारळ विक्री शक्य नसल्याने पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी नारळ विक्री केली जाणार आहे, असे संचालक फिग्रादो यांनी सांगितले.

नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे सवलतीच्या दरात नारळ विक्रीला प्रारंभ केला जात आहे. फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रावर २० रूपये दराने नारळाची विक्री होणार आहे. गोवा बागायतदार संस्थेकडून विविध आकाराच्या नारळाची विक्री केली जात आहे, असे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.
राज्यात नारळाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा फलोत्पादन महामंडळाने काही महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर नारळ विक्री सुरू केली होती.

सरकारने १० रु. नी
नारळ द्यावा ः कॉंग्रेस
सरकारने नारळ विक्री १० रूपये दराने करावी, अशी मागणी गोवा प्रदेश महिला कॉँग्रेसने काल कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
महिला कॉँग्रेसने राज्यात नारळाच्या वाढलेल्या दराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी माफक दरात नारळ विक्री केली. महिला कॉँग्रेसच्या या निषेध आंदोलनाची दखल घेऊन कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी सरकारतर्फे नागरिकांना ३० नारळांची प्रत्येकी २० रूपये दराने विक्री करण्याची घोषणा नुकतीच केली.

सरकारकडून नागरिकांना कशा पध्दतीने नारळ उपलब्ध करून दिला जाणार आहे याचे निरीक्षण महिला कॉँग्रेसकडून केले जाणार आहे. सरकारने नारळासाठी जाहीर केलेला २० रूपये दर जास्त असून १० रूपये दराने नारळाची विक्री करावी, अशी मागणी प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. महिला कॉँग्रेसचे नारळ विक्री आंदोलन केवळ प्रसिध्दीचा स्टंट असल्याचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या आरोपाचा कुतिन्हो यांनी इन्कार केला आहे. नारळाच्या वाढलेल्या दरामुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत होता. या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदी असताना विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कॅसिनो, माध्यम प्रश्‍नासाठी केलेले आंदोलन हा प्रसिध्दीची स्टंट होता का ? असा प्रतिप्रश्‍न ऍड. कुतिन्हो यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने राज्यातील युवतींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या उपलब्ध करून द्यावेत. सॅनिटरी नॅपकिनचा विषय गाजत आहे. महाराष्ट्र सरकारने सवलतीच्या दरात नॅपकिन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची राज्य सरकारने दखल घेऊन त्वरीत निर्णय घ्यावा. अन्यथा, या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी महिला कॉंग्रेसला आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशारा दक्षिण गोवा अध्यक्ष सावित्री कवळेकर यांनी दिला.