सरकारी इस्पितळात आजपासून परप्रांतियांना शुल्क लागू होणार

0
158

>> स्थानिकांना आरोग्य कार्डची सक्ती

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल (गोमेकॉ), म्हापसा आणि मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटल आणि फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटल या चार सरकारी हॉस्पिटलमध्ये सोमवार १ जानेवारी २०१८ पासून स्थानिकांना आरोग्य कार्ड बंधनकारक करण्यात आले असून परप्रांतीय रूग्णांना शुल्क लागू होणार आहे. स्थानिकांना कार्ड नसल्यास उपचारांसाठी अन्य पुरावा सादर करावा लागणार आहे.
सरकारने सरकारी प्रमुख हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना आरोग्य खात्याचे संचालक संजीव दळवी यांनी जारी केली आहे. सरकारने गतवर्षीपासून नागरिकांसाठी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. या योजनेखाली नोंदणी करणार्‍या आरोग्य कार्ड दिले जात आहे.

आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ उपचार आणि गरीब असलेल्या परराज्यातील रूग्णांला मोफत सेवा दिली जाईल. परंतु, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हॉस्पिटल अधीक्षक आणि आरोग्य खात्याच्या संचालकांना देण्यात आला आहे.
बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये स्थानिकांबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, सिंधुदुर्ग, कारवार व इतर भागातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेतात. बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये रूग्णांची संख्या जास्त होत असल्याने ताण सहन करावा लागत आहे. स्थानिकापेक्षा परराज्यातील रूग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत असल्याचे आढळून आले आहे. आता परराज्यातून वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना माफक शुल्क भरावे लागणार आहे.

गोमेकॉमध्ये स्थानिकांना आरोग्य कार्ड सादर करावे लागणार आहे. कार्ड नसल्यास अन्य पुरावा सादर करावा लागणार आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य कार्ड तयार करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या १८१ सेवांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे रूग्णांकडून माफक शुल्क आकारले जाणार आहे.

दरम्यान, आरोग्य कार्ड तयार करून घेण्यासाठी नागरिकांची जीईएलच्या आरोग्य कार्ड केंद्रात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. राज्यात १७ ठिकाणी आरोग्य कार्ड तयार करून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकारने दीन दयाळ योजनेखाली पहिल्या वर्षात ८२.८१ कोटी रूपयांचा भरणा विमा कंपनीकडे केला. विमा कंपनीने सरकारी हॉस्पिटलना रूग्णांच्या उपचारासाठी १७.२३ कोटी रूपये आणि खासगी हॉस्पिटलना रूग्णांच्या उपचारापोटी ३३.२२ कोटी रूपये दिले आहेत. बांबोळी येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. परंतु, आरोग्य कार्डचा वापर न झाल्याने रूग्णांचा उपचारासाठी विमा कंपनीकडून जास्त प्रमाणात निधी मिळू शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.