सरकारी इस्पितळांत परप्रांतियांना माफक शुल्क

0
129

परराज्यांतून गोव्यातील सरकारी इस्पितळात येणार्‍या रुग्णांना येत्या डिसेंबर महिन्यापासून उपचारासाठी शुल्क द्यावे लागणार असले तरी ते माफक असेल व अगदीच गरीब परप्रांतीय रुग्णांना पूर्वीप्रमाणे मोफत उपचार मिळतील. मात्र, सरकार सगळ्याच परप्रांतीय रुग्णांना मोफत उपचार देणे शक्य नाही. गोव्यातील सरकारी इस्पितळे ही गोव्यातील लोकांसाठी आहेत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

आमच्या इस्पितळांवर अन्य राज्यातून येणार्‍या रुग्णांमुळे प्रचंड ताण पडतो आहे. त्यामुळे नाईलाजाने वरील पाऊल उचलावे लागले असल्याचे ते म्हणाले.
बंद पडलेले अर्भकांचे स्क्रिनिंग आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. नव्या ११ रुग्णवाहिका येत्या १९ डिसेंबरपर्यंत आणल्या जाणार असून एक व्हीआयपीसाठीची रुग्णवाहिकाही आणली जाणार असल्याचे ते म्हणाले. सीएसआर योजनेखाली एका खासगी कंपनीकडून त्यासाठी निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण फक्त गोमेकॉतच
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया फक्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच करण्यात येणार असून त्यासाठी कुठल्याही खासगी इस्पितळाशी हातमिळवणी करण्यात येणार नसलयाचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोमेकॉत उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या विनाविलंब रक्त किंवा अन्य चाचण्या करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन दोन खासगी निदान केंद्रांशी (पॅथलॅब्स) हात मिळवणी करण्यात येईल. चाचण्या करून घेण्यासाठीचे शुल्क सरकार भरेल, असे ते म्हणाले.