सरकारमधील घटक पक्षांचा भाजपला पाठिंबा : मुख्यमंत्री

0
119

भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांचा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एनडीएच्या पत्रकार परिषदेत बोलताना काल केला. यावेळी महसूल मंत्री रोहन खंवटे, आरडीए मंत्री जयेश साळगावकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती होती.

कॉँग्रेस पक्षाला पराभव दिसू लागल्याने वैफल्यग्रस्त बनली आहे. कॉंग्रेस पक्ष गोव्याच्या बाबतीत गंभीर नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी एकही राष्ट्रीय नेता गोव्यात आलेला नाही. भाजप राज्याचा विकास आणि स्थिर सरकार देऊ शकते. येत्या तीन वर्षांत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्वप्ने साकारण्यावर भर दिला जाणार आहे. साधनसुविधा आणि मनुष्यबळ विकासावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पर्वरी मतदारसंघात आघाडी मिळवून देण्यासाठी प्रचारावर भर देण्यात आला आहे. सरपंच, पंच, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन योग्य सूचना देण्यात आली आहे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
गोव्याच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना निवडून आणण्याची गरज आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. साळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीपाद यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले जाणार आहे, असे मंत्री साळगावकर यांनी सांगितले.

खाण प्रश्‍नावर सहा
महिन्यांत तोडगा
राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर येत्या सहा महिन्यात तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एनडीएच्या पत्रकार परिषदेनंतर निवडक पत्रकारांशी बोलताना दिली. आपण खाण पट्‌ट्यातील असून खाण बंदीच्या समस्येची पूर्ण जाणीव आहे. लोकांमध्ये आपण खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढेन, असा विश्‍वास असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.