सरकारने आदर्श गोव्याचे ध्येय बाळगावे

0
116

– विश्‍वास मधुकर पेडणेकर, पेडणे
दि. २२ डिसेंबरच्या नवप्रभेच्या अंकात, ‘वाचकीय’ सदरात सौ. सपना नाईक, चिंबल यांचे ‘यालाच स्वातंत्र्य म्हणतात का रे भाऊ’ या शिर्षकाखालील पत्र वाचनात आले. पत्रात त्यांनी पूर्वीचा गोवा कसा सुरक्षित, सुंदर, शांत होता व तेथे गुण्यागोविंदाने नांदणारी माणसे कशी होती याचे वर्णन केले आहे, तर आताचा गोवा पूर्वीच्या तुलनेत कसा विपरित झाला आहे याची खंत व्यक्त केली आहे. सौ. सपना नाईक यांच्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे व त्यांनी पत्रात व्यक्त केलेली समस्या किंवा भविष्यात होणार्‍या राज्याच्या अपरिमित हानीची भीतीही रास्तच आहे.खरोखरच गोव्यात आज परप्रांतीय किंवा परदेशी माणसांचा भरणा दिसून येतो. त्यांना येथे शिधापत्रिका, घरदार बांधण्याची मुभा, त्यांच्या मुलाबाळांना येथे शिक्षण किंवा येथेच त्यांना मिळत असलेली मोठ्या हुद्द्याची नोकरी किंवा खासगी कार्यालयांत मिळणारी नोकरी या गोष्टी सहज त्यांना आमच्या राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे मिळत असतात, कारण या राजकारण्यांनी विविध जातींच्या लोकांना मतांच्या आशेमुळे त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणूनच तर त्यांची गोव्यात मुजोरी दिसून येते.
आज तुम्ही बाजारात जाऊन बघा. जाताना बसमध्ये चढलात तर बसचा वाहक व चालक परप्रांतीयच असणार. बसमधून उतरून बाजारात गेलात तर तेथेही मासळी किंवा भाजीपाला विकणारा परप्रांतीयच असणार. भूक लागली म्हणून हॉटेलात गेलात तर वेटर परप्रांतीयच असणार. जिकडे जाल तिकडे परप्रांतीयांचाच धंदा असणार, हे कोणामुळे सर्व घडत आहे? त्यांना केवळ राज्यकर्तेच जबाबदार आहेत का? थोड्या अंशाने आम्हीही त्यास जबाबदार नाहीत का?
आम्ही या परप्रांतीयांना घरेदारे भाड्याने देतो की नाही? समुद्रकिनारी असणारे लोक विदेशी लोकांना जास्त भाडे मिळते म्हणून आपली घरेदारे भाड्याने देतात व स्वतः झोपड्यात राहतात. त्याचप्रमाणे या परदेशी लोकांना मादक द्रव्यांचा धंदा करता येतो. या विदेशी लोकांमुळे आज तरुण पिढी बरबाद झाली आहे. ती विदेशी बाईंच्या नादी लागून, त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात व त्यामुळे आमचे येथील तरुण एड्‌ससारख्या रोगालाही बळी पडत आहेत. हे तरुण कामधंदा नसल्यामुळे मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये काम करतात व त्यामुळे बिघडतात, हे सरकारला किंवा राजकर्त्यांना दिसत नाही. तरीही सरकार पर्यटन खात्याचा महसूल वाढावा म्हणून कॅसिनो सारखा जुगार, नृत्यरजनी आदींचे पालन पोषण करीत आहे. भले तरुण पिढी बिघडली तरी चालेल, पण हे गैरव्यवसाय बंद करण्याची सरकारची इच्छाही दिसत नाही, कारण महसूल किंवा हप्ता प्राप्त कसा होणार? आणि या मिळणार्‍या महसुलामुळे सरकार एकेक योजना मार्गी लावणार. गैरमार्गातून किंवा वाममार्गातून मिळणार्‍या पैशाने सरकार जनतेची सेवा करू इच्छिते. आणखी काही मार्गच नाही!
याच्यापूर्वी म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना सरकार चालत नव्हते का? तेव्हा जनतेची काळजी घेतली जात नव्हती का? तेव्हा कुठले कॅसिनो, नृत्यरजनी, मसाज सेंटर गोमंतकात होते? आताच्या सरकारला गैरमार्गातून मिळणारा महसूल हवा आहे का? अशाने आदर्श राज्य म्हणून गोव्याचे नाव वर येणार आहे का? तिकीट घोटाळा, स्कार्लेट मृत्यूप्रकरण आदी घटनांनी गोव्याचे नाव देश-विदेशात धुळीस मिळवून दिले. तरीही गोमंतकाची धूळधाण करण्याची राज्यकर्त्यांची इच्छा आहे का? मग का नाही हटविण्यात येत ते कॅसिनो, मसाज सेंटर, नृत्यरजनी, जे रात्री बेरात्री मोरजी, मांद्रे सारख्या गावांना त्रासदायक ठरत असतात. मुलांना अभ्यासात अडथळा निर्माण करत असतात किंवा विदेशी लोकांच्या मुजोरीमुळे त्यांच्या देशाचे झेंडेही फडकविले जातात व आमचे राज्यकर्ते सहनही करतात. यालाच स्वातंत्र्य म्हणायचे का रे भाऊ? हा माझा प्रश्‍न सरकारला आहे!
गोमंतक ही योगभूमी म्हणून जग ओळखत होते. पण उपरोल्लेखित कारणामुळे त्यास आता भोगभूमी म्हणून ओळखले जात आहे. पर्यटक जे येतात ते याच कारणामुळे. ते गोव्याचे सौंदर्य न्याहाळायला येत नाहीत. तसे सौंदर्य आता राहिले कुठे? हा संपूर्ण गोवा पोखरून ठेवला आहे. रानावनांत मोठमोठे टुमदार बंगले बांधून ते विक्रीस ठेवण्यात येत आहेत व परप्रांतीय ते विकतही घेत आहेत. परप्रांतीय कशाला, मोठमोठे नट, राष्ट्रीय खेळाडूही आता गोव्यात बंगले बांधून राहू लागले आहेत. आता गोवेकरांनी राहावे कुठे? हे थांबणार कधी? यावर सरकार उपाय काढेल का?
जर उपाय काढला नाही तर दिल्ली राज्यात निर्भयाकांड घडले किंवा अजूनही घडत आहे त्याप्रमाणे घटना घडणे नाकारता येणार नाही. सध्या परप्रांतीयांमुळे तशा घटना घडून आलेल्या आहेत. वास्को येथे छोट्या मुलीवर अत्याचार घडला, त्याचा अजूनही छडा लागलेला नाही. अशा प्रकारच्या घटना घडतही आहेत, ज्याचा उलगडा होत नाही. फक्त दैनिकांत त्या प्रसिद्ध होतात.
सौ. सपना यांच्यामते पूर्वीच्या म्हणजे १०,१५ वर्षांपूर्वीच्या स्त्रिया किंवा मुली बिनधास्त गळ्यात हातात सोने घालून फिरू शकत होत्या, तसेच निडरपणे प्रवासही करत होत्या. पण आता प्रवास करणे धोकादायक आहे. अबू्रची भीती वाटत असते. एकटीला प्रवास करताना गळ्यातील सोन्याची भीतीही वाटत असते. कारण ते कधी चोर हिसकावून नेईल खात्री नसते. ५,१० वर्षांच्या मुलींनाही सध्याच्या युगात भीतीदायक वातावरणात जगावे लागते. शाळेत किंवा ट्यूशनच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारास बळी पडण्याची संभावना नाकारता येत नाही. मग माणसांनी खास करून स्त्री वर्गाने जगावे कसे? ही स्थिती कोणावरही येऊ शकते. तेथे गरीब किंवा श्रीमंतांचा विचार येत नसतो.
विनयभंग, अब्रू लुटण्यास टपून बसलेले नराधम आहेत. त्यांचा नायनाट कसा होणार? त्यांचे वासनांध विचार, भावना कधी आटोक्यात येईल? सरकार याचा विचार करणार काय? की सरकारला पुढील पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर कसे धोरण आखावे याचा विचार करणार? कारण राजकारणी लोकांचे ध्येय तेच असते की खुर्ची कशी प्राप्त होणार. त्यासाठी डावपेच, धरणे, युक्त्या, प्रयुक्त्या, योजना आदी गोष्टींचा विचार डोक्यात असतो. जनता कशी सुखी होणार हा विचार नसतो. तो विचार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
तेव्हाचे राजकारणी, राष्ट्रपुरूष किंवा नेत्यांचा तो त्यागाचा विचार, समाजासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवण्याचा विचार किंवा परोपकारासाठी बलिदानाचाही विचार आज कालबाह्य झालेला आहे. स्वार्थ सोडून त्यागाचा विचार आताचे राजकारणी अंमलात आणतील तो सुदिन!