सरकारकडून कोणतेच उल्लेखनीय कार्य नाही : आम आदमी पार्टी

0
112

भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने ३६५ दिवसांच्या कारभारात आम आदमीच्या हितार्थ कोणतेही उल्लेखनीय कार्य केले नाही. केवळ खास आदमीच्या सोयीसाठी पावले उचलली जात आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात भाजप आघाडी सरकारला यश प्राप्त झाले नाही. भाजप आघाडी सरकारच्या एक वर्षाचा काळाचा आढावा घेतल्यास खाण, प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई, टॅक्सी मीटर, विना परवाना वृक्षतोड या सारख्या गंभीर प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमीला रस्त्यावर उतरावे लागले आहे. राज्यातील विरोधी कॉंग्रेस पक्ष सुध्दा कुचकामी ठरला आहे, असा आरोप गोम्स यांनी केला. आघाडी सरकारमधील विविध पक्ष आपली वैयक्तिक ओळख विसरले आहेत. समान किमान कार्यक्रम सुध्दा केवळ कागदावरच आहे.

सीएसी, जी-३ या सारखे शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रश्‍नावर तोडगा काढता येत नाही. दिल्ल्लीश्वरांकडे प्रश्‍न सोडविण्याचा सल्ला मागितला जात आहे, अशी टिका गोम्स यांनी केली. राज्यात विविध भागात डोंगर कापणीचे काम सुरू आहे. यासंबंधी तक्रार करणार्‍याला धमक्या दिल्या जातात. भाजप आघाडी सरकारने मागील वर्षभरात लोकहितार्थ केलेले कार्य जाहीर करावे, असे आव्हान गोम्स यांनी दिले.