समुपदेशन गीतेतून – स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य…

0
176

– प्रा. रमेश सप्रे

सारी माणसं – वस्तू ही ईश्‍वराचीच चालती बोलती रुपं समजून त्यांची पूजाअर्चा केली पाहिजे. ही भावना सर्वव्यापी ईश्‍वराच्या अस्तित्वाची नित्य जाणीव करून देते. आजकाल देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांडं यांनाच महत्त्व प्राप्त झालंय. गीतेत भगवंताचं समुपदेशन इतकं स्पष्ट असूनही त्याप्रमाणे व्यवहार करण्याची मानसिकता दिसून येत नाही.

‘अखेरचं भाषण (द लास्ट लेक्चर)’ नावाचं एक पुस्तक आहे. रँडी पॉश यांचं. खरं तर हे एक व्यासपीठ आहे. निरनिराळ्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणार्‍यांना त्यांच्या जीवनाच्या अंतिम पर्वात आमंत्रित केलं जातं. नि त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान, त्यांचं कार्य, जीवनानुभव इ.संबंधी सार्‍या मानवजातीला प्रेरणा व संदेश देणारं व्याख्यान त्यांनी द्यावं अशी अपेक्षा असते. फार चांगली कल्पना आहे ही!

याला ‘निर्वाणीचा संदेश’ असंही म्हणता येईल. जीवनाच्या शेवटी.. ‘सारं सांगून झालं आता…’ अशा आशयाचं सर्वांना महत्त्वाचं, उपयुक्त असं हितगूज अन् तेही महान व्यक्तींकडून ऐकणं.. वाचणं.. त्यावर मंथन-मनन-चिंतन करणं आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणं हा प्रमुख उद्देश अशा उपक्रमांचा असतो. भगवंतानं असाच निर्वाणीचा संदेश अर्जुनाच्या निमित्तानं व माध्यमातून अखिल मानवजातीला दिला आहे. (म्हणूनच अखेरच्या अठराव्या अध्यायाला गीतेचा कळस किंवा कलशाध्याय म्हणतात.)
देव-देवता-धर्म-कर्म-मुक्ती याविषयी अगदी जीवनाला समोर ठेवून, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला उपयोगी पडेल असं समुपदेशन भगवंत करताहेत. मुख्य म्हणजे हे सर्व मानवजातीसाठी सर्व काळासाठी म्हणून आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त आहे. भगवंताचे अमर शब्द आहेत-

स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः |
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदति तत् शृणु॥

अर्थ स्पष्ट आहे- आपापली कर्मे (स्वे स्वे कर्मणि) करण्यात रमून गेलेला (अभिरतः) मनुष्य (नर) परमात्मप्राप्ती किंवा जीवनमुक्ती (मनःशांती-संसिद्धिम्) प्राप्त करून घेतो. असा आपलं (कर्तव्य)कर्म मनापासून करणारा आत्मप्राप्ती किंवा अखंड आनंद (सिद्धि) कसा प्राप्त करतो ते मी सांगतो (तत् शृणु) – असं भगवंत अर्जुनाला सांगताहेत
हे जीवनविषयक तत्त्वज्ञान व त्याचा व्यवहार (थिअरी व प्रॅक्टिकल) आपल्याला सर्वांत चांगला दिसून येतो तो संतांच्या जीवनात. निरनिराळ्या जातीजमातीत जन्मलेल्या, विविध कामं-व्यवसाय करणार्‍या अगदी सामान्य व्यक्तींनी कामातच राम नि घामातच श्याम (कृष्ण) पाहिला नि आनंदात काम करता करता जीवनमुक्तीचा अनुभव घेतला.
* आपल्याला माहीत आहे की एकदाही प्रत्यक्ष पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन सावता माळ्यानं घेतलं नाही. वास्तविक त्याचं अरणी हे गाव पंढरपूरपासून अगदी जवळ होतं. एवढंच नव्हे तर त्याच्या मळ्याजवळूनच आषाढी-कार्तिकी वारीची वाट होती. सावता आदरपूर्वक दिंड्या-पालख्या आपल्या मळ्यासमोर थांबवून सार्‍या यात्रेकरुंचं आदरातिथ्य करीत असे. पंढरीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या पायावर डोकं ठेवून भावगद्गद् स्वरात डोळे पाणावलेल्या अवस्थेत सावता विनवणी करायचा, ‘मायबाप, पंढरीहून येताना माझ्या मळ्याला अवश्य या. तिथल्या संतमंडळींची पायधूळ लागलेले तुमचे पाय माझ्या मळ्याच्या मातीत झाडा. मी ते भक्तीनं धुवीन.. न चुकता यायचं बरं!’ .. इतक्या आर्जवानं सांगितल्यावर कोण येणार नाही? …एरवी आपल्या मळ्यातील भाजीपाल्यात त्याला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन व्हायचं. तो प्रेमानं उद्गारायचा – गायचा –

‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी|’

अन् या सार्‍या एकनिष्ठेनं केलेल्या भक्तीचं फळ म्हणून विठ्ठलानं स्वतः अरणीला मळ्यात येऊन सावत्याला आपलं सगुण साक्षात् चिन्मय दर्शन दिलं.
‘स्वे स्वे कर्मणि अभिरतः’ म्हणतात ते यालाच. जे काही भजन-पूजन-गायन-वादन करायचं ते मळा शिंपीतच नि भाजी वाढवतच. भगवंताचा हा आवडता कर्मयोगी भक्त आहे.
* दादू नावाचा एक शवपेटिका (कॉफिन्) बनवणारा सुतार होता. तो अगदी मन लावून भजनं गात आपलं शवपेटिका बनवण्याचं काम करत असे. बाहेरून नाजूक नक्षीही तो त्या पेटीवर करायचा. एकदा एका तरुणानं त्याला आपल्या कामात मग्न (अभिरत आणि स्वकर्मरत) पाहून विचारलं – ‘तुम्ही इतकं मन लावून अशा कलात्मक शवपेट्या का बनवता? जमीनीखाली पुरल्या जाऊन शेवटी त्यांची मातीच होणार ना? अन् ही शवपेटिका कुणासाठी बनवता आहात?’ दादू काही बोलणार इतक्यात एक जण आला नि त्याच्या कानात काहीतरी सांगून निघून गेला. दादू शांतपणे हसला. त्यानं त्या शवपेटिकेवर शेवटचा खिळा ठोकला व त्या तरुणाकडे पाहून म्हणाला, ‘गेलं पाहिजे आता’. ‘कुठं?’ यावर तितक्याच शांतपणे दादू उद्गारला, ‘आत्ताच समजलं की माझा तरुण मुलगा गिर्यारोहणाला गेला असताना दरीत कोसळून मेला. त्याचं प्रेत घरी आणलंय. ही शवपेटिका न्यायला मंडळी येतील मलाही कल्पना नव्हती की ही शवपेटिका कुणासाठी बनवली जातेय? आता कळलं ना तुला? .. दादूची इतकी अप्रिय घटना आकस्मिकपणे कळूनही न ढळलेली मनःशांती हीच त्याला प्राप्त झालेली ‘संसिद्धि’ होती. तो आपलं काम हीच ईश्‍वराची पूजा समजत होता. ते जितकं मनोभावे करता येईल तेवढीच आपल्याकडून ईश्‍वराची पूजा अर्चना मनोभावे केली जाईल. ‘स्वकर्म निरतः’ आपल्या कामात मग्न होऊन जाणं, देहभान विसरून आत्मभान जागं करून बेभान होऊन कर्म करणं हीच मुक्तीची गुरुकिल्ली!
भगवंताचा हा उपदेश प्रत्यक्ष जगून दाखवण्यानं सामान्य माणूसही संतपदाला पोचू शकतो. याची जिवंत उदाहरणं म्हणजे जनाबाईसारखी दासी. तिला ईश्‍वर (विठ्ठल) कामात मदत करायचा म्हणजेच ‘न थकता, कमी वेळात अप्रतिम काम करत राहणं नि स्वतःचं संपल्यानंतर इतरांचंही नकळत, सहजतेनं करणं यासाठी शक्ती व स्फूर्ती द्यायचा अखंड आनंदाचा अनुभव हीच ईश्‍वरप्राप्ती. भगवंत स्वतः याचं रहस्य सांगताहेत…

यतः प्रवृत्तिः भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः॥

अर्थ – जेथून सारी भूतं म्हणजेच सृष्टी, जीव निर्माण होतात अन् चराचरात जे व्याप्त आहे (येन सर्वं इदं ततम्) त्याची पूजाअर्चना (तम् अभ्यर्च्य) स्वतःच्या कर्मातून करणार्‍या मनुष्याला मुक्ती – परमात्मप्राप्ती (सिद्धिम्) मिळते.

स्वतःचं नेहमीचं काम करणं हीच परमेश्‍वरप्राप्तीची उपासना मानायची. दैनंदिन जीवनातली कर्मं हाच देव नि श्रम हीच लक्ष्मी मानून कर्म करत राहणं हीच खरी आनंदसाधना. यासाठी मूर्तीची किंवा प्रतीकांची, चिन्हांची पूजा करण्यापेक्षा सर्वव्यापी ब्रह्माची, सर्वत्र पसरलेल्या चैतन्याची उपासना अधिक महत्त्वाची. यातला भाव ‘कणकण में भगवान’ हाच असायला हवा. कारण परमेश्‍वरानंच सारी सृष्टी स्वतःतून निर्माण केली; म्हणून सर्व चेतन-अचेतन (सजीव-निर्जीव) प्राण्यात किंवा पदार्थात परमेश्वर ओतप्रोत भरून राहिलेला असतो. संपूर्ण जीवनभर सदासर्वदासर्वत्र हा ईश्‍वरभाव जागा ठेवून कर्मं करत राहिलो तरी आनंदप्राप्ती सहज शक्य आहे…
भगवंतांना हे सांगताना परमेश्वराचं रूप नुसतं सुचवायचं नाहीये तर ठामपणे सांगायचंय किंवा एका अर्थानं दाखवून द्यायचंय (विश्‍वरूपदर्शनासारखं). नुसते मूर्त आकार (मूर्ती), प्रतीकं-चिन्हं यांचीच पूजा करून नाही आत्मप्राप्ती होणार किंवा मनःशांती लाभणार.
‘अथर्वशीर्ष’ या स्तोत्रात श्रीगणेशाच्या मूर्त रुपाचं तसंच अमूर्त स्वरूपाचं असं दोन्ही अंगांनी वर्णन आहे. सोंड, शूर्पकर्ण, मोठं पोट इ. वर्णन स्थूल रुपाचं आहे. आपण याची मूर्ती तयार करून नित्यपूजा, उत्सव साजरे करतो, या रुपाची तीर्थक्षेत्रं निर्माण करून त्यांची यात्रा करणं, तेथे यज्ञ-तप-दान आदी पुण्यकर्मं करणं ही उपासनेची एक बाहेरची बाजू झाली. बहिरंग उपासना, पण याहीपेक्षा सूक्ष्म अशी अमूर्त शक्तीची- चैतन्याची पूजाअर्चा (तम् अभ्यर्च्य) भगवंत आग्रहानं सांगताहेत.
सारं विश्‍व ज्याच्यापासून निर्माण झालं; ज्याच्यात ते आज अस्तित्वात आहे; ज्याच्यात सर्व सृष्टीचा लय होणार आहे. एवढंच नव्हे तर या सार्‍याचा प्रत्यय आपल्याला ज्या तत्त्वामुळे मिळतोय ते गणेशाचं खरं, सूक्ष्म स्वरूप आहे. अशा परमईश्‍वराची (परमेश्‍वराची) पूजा करण्यासाठी अष्टविनायक किंवा अकरा मारुती किंवा बारा ज्योतिर्लिंगं अशा देहानं करायच्या यात्रा पुरेशा नहीत. तर हवी अंतरंगीची उपासना.
सगळीकडे ओतप्रोत भरून, ओसंडून उसळत असलेल्या दिव्य चैतन्याची प्राप्ती कशी करायची? मौन-ध्यान-नाम-चिंतन अशा आतल्या साधनांनी! अशी साधना सामान्य प्रापंचिकांना कशी शक्य होणार? यावर भगवंत अमोघ असा रामबाण मार्ग सांगताहेत. कर्म करताना सेवाभाव – सेवाभावातून अलिप्तता – फलासक्तीची आस नाही. यासाठी समर्पणवृत्ती व शरणागती आवश्यक.
मोठमोठ्या मंदिरात उपचार-विधी यांनी भव्य पूजा केली जाते. पण तिथली व्यवस्था, स्वच्छता वरच्या दर्जाची असेलच असे नाही उलट साधुसंतांच्या समाधिस्थानी अत्यंत चोख व्यवस्था, स्वच्छता, कार्यक्षमता आढळून येते. मंदिरात सेवेकरी असतात जे मोबदल्याच्या अपेक्षेनं काम करतात. असं काम चांगलं असतंच असं नाही.
उलट साईबाबा, श्रीगजाननमहाराज, श्री गोंदवलेकर महाराज, श्रीस्वामी समर्थ अशा स्थानी सेवेकर्‍यांशिवाय अनेक सेवकही असतात. त्यांची सेवा हीच ईश्‍वर किंवा गुरुभक्ती असते. ‘मैं गुलाम और तू मालिक’ या भूमिकेतून अशा स्थानांची व्यवस्था – पावित्र्य व स्वच्छता राखली जाते. ‘सेवा हीच साधना’ बनते. सारी माणसं- वस्तू ही ईश्‍वराचीच चालती बोलती रुपं समजून त्यांची पूजाअर्चा केली पाहिजे. ही भावना सर्वव्यापी ईश्‍वराच्या अस्तित्वाची नित्य जाणीव करून देते.
आजकाल देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांडं यांनाच महत्त्व प्राप्त झालंय. गीतेत भगवंताचं समुपदेशन इतकं स्पष्ट असूनही त्याप्रमाणे व्यवहार करण्याची मानसिकता दिसून येत नाही. या दृष्टीनं संतांची वाणी अत्यंत स्पष्ट आहे.

जे जे भेटे भूत| ते जाणिजे भगवंत|
हा भक्तियोग निश्चित| जाण माझा॥

या शब्दात ज्ञानोबा माऊली भक्तियोगाचं निराळंच दर्शन घडवते. ‘सर्वाभूती भगवंत’ हा संतांचा सिद्धांत जर जीवनात उतरला तर आज घडणारी हिंसा, गुन्हेगारी, व्यभिचार सारे कमी होतील. अशा भक्तीचं एक गोड रूप म्हणजे भक्ताच्या अंगी असलेली नम्रता, लीनता, भक्ती आणि गर्व, अहंकार, उद्धटपणा एकत्र राहूच शकत नाहीत. तुकोबाचं मार्गदर्शन गीतेनुसारच आहे.
नम्र झाला भूतां| तेणें कोंडिले अनंता॥

किंवा – वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे|

असं जर आपल्या उपासनेचं स्वरूप बनलं तरच आपण खर्‍या अर्थानं ‘माणूस’ बनू शकू – माणुसकी असलेला माणूस!
सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या, विश्‍वाच्या कणाकणात ओतप्रोत भरून राहिलेल्या परमेश्‍वराची स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, सर्व प्रकारच्या कर्मातून पूजा करा एवढंच भगवंत सांगत नाहीत, तर ‘तम् स्वकर्मणा अभ्यर्च्य’ असं म्हणताना त्या परमेश्‍वराचं स्वरुपही सांगतात.
हातपायतोंडं असलेला परमेश्‍वर म्हणजे आजुबाजूची सर्व प्राणीसृष्टी व निर्जीव जगत्, एरवी परमेश्‍वर हा निर्गुण, निराकार शक्तीचं किंवा चैतन्याचं स्वरूप आहे. यात सारे ज्ञान-कर्म-भक्ती हे योग समाविष्ट आहेत. गीतेचा हा कळसाचा संदेश आहे. भगवंताचे हे गीतेतले निर्वाणीचे विचार आहेत यातच त्या विचारांचं खरं महत्त्व आहे. अन् मुख्य म्हणजे हा संदेश सार्‍या ‘नरा-मानवांसाठी’ म्हणजे अवघ्या मानवजातीसाठी आहे. यामुळेच गीता हा विश्‍वग्रंथ आहे मानवता धर्म शिकवणारा.