समुपदेशन काळाची गरज ः केतकी परोब

0
2220

– मुलाखत ः  विजयसिंह आजगावकर

मानसशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या केतकी परोब गडेकर या मूळ डिचोलीच्या. समुपदेशनाचे रीतसर ज्ञान व माहिती प्राप्त के ल्यानंतर त्यांनी डायोसीझन स्कूलमध्ये समुपदेशक म्हणून काम केले. सध्या त्या विविध क्षेत्रात काम करताना उद्भवणार्‍या समस्यांवर समुपदेशन करतात. त्यांच्याशी केलेला वार्तालाप…

१. समुपदेशन म्हणजे नक्की काय?
उत्तर – समुपदेशन म्हणजे फक्त सल्ला किंवा मार्गदर्शन नव्हे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात उद्भवणार्‍या मानसशास्त्रीय वा अन्य समस्यांची उकल करण्यात त्या व्यक्तीला साहाय्य वा मार्गदर्शन करणे ही समुपदेशकाची प्रमुख भूमिका. थोडक्यात आपलाच गुंता आपणच सोडविण्यासाठी समुपदेशक साहाय्य करतात.

२. समुपदेशक व्हावे असे आपल्याला का वाटले?
उत्तर – माझ्यासाठी मानसशास्त्र हा विषय अभ्यासापुरताच मर्यादित नव्हता, तर अक्षरशः या विषयाचे मला वेड लागले होते, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण मानसशास्त्र शिकताना.. भरकटलेल्या व्यक्तीला समुपदेशनाद्वारे आपण योग्य दिशा देऊ शकतो हे मला जाणवले. अन् समुपदेशनाबद्दल मला अधिकच आवड निर्माण झाली. खरे सांगायचे तर उच्च शिक्षण घेताना ‘मानसशास्त्र’ हा विषय घेण्याबाबत माझ्या आईने मला सुचवले होते आणि म्हणूनच आज एक सर्जनशील व प्रयोगशील समुपदेशक म्हणून मी स्वतःचे नाव करू शकले.

३. समुपदेशनाची पहिली सुरुवात कोठून झाली?
उत्तर – मानसशास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यावर लगेचच डायोसिझन स्कूलमध्ये मला समुपदेशकाची नोकरी मिळाली. या निमित्ताने दर आठवड्याला मी पाच शाळांमध्ये जाऊन समुपदेशनाचे काम करीत होते. सुरुवातीला मला हे थोडेसे आव्हानात्मक वाटायचे. पण हळूहळू सवय झाली. लोकांना समुपदेशनाचे महत्त्व नि किंमत पटवून देण्यात माझा सुरुवातीला बराच वेळ जायचा पण आता लोकांना हळूहळू समुपदेशनाचे महत्त्व पटू लागलेय.

४. समुपदेशन ठरावीक वयोगटापर्यंतच असते का?
उत्तर – नाही, तसे मुळीच नाही. समुपदेशनाला कोणतीही वयोमर्यादा नाही. बालकांपासून प्रौढ तसेच वृद्धांपर्यंत कुणालाही समुपदेशनाची गरज भासू शकते. फक्त वयोमानापरत्वे समुपदेशन करण्याची पद्धत बदलावी लागते.

५. वयोमानापरत्वे समुपदेशन करताना कोणकोणत्या अडचणी येतात?
उत्तर – समुपदेशन करताना प्रत्येक पायरीगणिक नवनवी आव्हाने स्वीकारावी लागतात. बालकांमध्ये निर्णयक्षमता खूपच कमी असते. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा याचे योग्य ज्ञान त्यांना नसते. अशा वेळी समुपदेशन करताना त्यांच्या मनात समुचित विचारांची पेरणी करावी लागते. यामुळे त्यांना आपण काय करीत आहोत, ते कशाप्रकारे करायला हवे.. याची जाणीव होते.

६. सकारात्मकता वाढविण्यास समुपदेशन खरेच मदत करते? आपला अनुभव ऐकायला आवडेल.
उत्तर – आपण बर्‍याच वेळा नकारात्मक विचार करत असतो. समजा दहा गोष्टी चांगल्या घडल्या अन् एक मनाविरुद्ध घडली तर आपण त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचेच सारखे चिंतन करीत बसतो. नैराश्यच चघळत बसतो. अशा व्यक्तींत समुपदेशनाने बराच फरक पडतो. नैराश्य आलेली व्यक्तीदेखील सकारात्मक विचार करू लागते. तिचा आत्मविश्‍वास वाढतो.
या ठिकाणी मी समुपदेशन केलेली एक घटना मला आठवते. उच्च माध्यमिकच्या मुलांसाठी गीतगायन स्पर्धा होती. अकरावीची एक विद्यार्थिनी गीत सादर करण्यासाठी गेली अन् प्रचंड प्रेक्षक पाहून गीताचे काही बोल विसरली. तिला त्यावेळी पूर्णपणे अपयश आले. तिने जेव्हा माझ्याशी संपर्क साधला तेव्हा तिला मी सर्वप्रथम आत्मविश्‍वास कसा वाढवायचा याबाबत मार्गदर्शन केले. तिने तेव्हापासून मी सांगितलेल्या मुद्यांचे अचूक पालन केले. अन् अशाच एका गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

७. ‘बुद्धी पूर्वकर्माप्रमाणे संचरते’, असे म्हणतात. मग समुपदेशनाद्वारे विचार कसा काय बदलला जाऊ शकतो?
उत्तर – हो, ते शक्य आहे. एखाद्या व्यक्तीला जीवनाबाबत काहीच आशा न उरल्यास तो आत्महत्येचा विचार करू लागतो. त्या वेळेस त्याला तशी बुद्धी होते, हे खरे आहे. पण योग्य वेळी त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाले वा योग्य तो पाठिंबा मिळाला तर त्याचे मनोबल, मनोधैर्य, आत्मविश्‍वास वाढू शकतो. अन् त्याच्यात सकारात्मक बदल होऊ शकतो. तो आत्महत्येसारखा विचार बदलू शकतो. त्या विशिष्ट क्षणी त्याला योग्य ते मार्गदर्शन करणारा मात्र कुणीतरी भेटला पाहिजे.

८. आपण आत्तापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी समुपदेशन कार्यक्रम राबविलेत?
उत्तर – आत्तापर्यंत मी विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी विविध कृतिसत्र घेतलीत. व्यवसाय समुपदेशन कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास पालकत्व, कुमारावस्थेतील मुलांच्या जीवनातील आव्हाने, किशोरवयीन मुलांच्या समस्या व शिक्षक आदी विषयांवर विविध कार्यशाळा आयोजित केल्या. एवढेच नव्हे तर पोस्टपार्टम डीप्रेशनमध्ये जाणवणारा एकटेपणा, चिडचिडेपणा, रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये येणारे नैराश्य, अस्वस्थता याबाबतही मी समुपदेशन केलेय.

९. किशोरवयीन मुलांना आत्मघातकी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील?
उत्तर – सर्वप्रथम आपण किशोरवयीन मुलांमधील आत्महत्येची लक्षणे जाणून घेतली पाहिजेत. जसे की इतरांच्यात न मिसळणे, अचानक त्यांच्या वर्तनात झालेला बदल, अबोलपणा, जीवन संपविण्याचे त्यांचे विचार, त्यांना एखाद्या बाबतीत आलेले औदासिन्य वगैरे. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास अशा मुलांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा. आपण एकटे नाही आहोत तर आपले कुणीतरी या जगात आहे ही भावना त्यांच्या मनात रुजवायला हवी. त्यांचे मनोबल वाढवायला हवे. अपयश कसे पचवायचे, समस्या कशा हाताळायला हव्यात, निर्णय कसे घ्यायला हवेत हे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना शिकविले पाहिजे. आजच्या युवा पिढीला तर ते खूपच गरजेचे आहे.

१०. हल्ली प्रत्येक शाळेमध्ये सरकारने समुपदेशकाची नेमणूक केलेली आहे. पण विद्यार्थ्यांचा स्वैराचार वाढतोच आहे. याबाबत काय सांगाल?
उत्तर – हो, काही वर्षांपूर्वी गोवा शैक्षणिक विकास महामंडळाने शाळाशाळांमधून समुपदेशक नेमण्याची योजना आखलेली होती. त्यानुसार ही नेमणूक झाली होती. मीदेखील त्याचा एक भाग होते. मुलांसाठी समुपदेशन हे खूपच फायदेशीर आहे असे मला वाटते. मुलांमधील वाढता स्वैराचार ही चिंतनीय बाब आहे. पण त्यासाठी समुपदेशकांना दोष देणे चुकीचे ठरेल. कारण मुलांना योग्य वळण लावण्यासाठी प्रथम त्यांच्यावर बालवयात सुसंस्कार होणे गरजेचे आहे. त्यानंतर मुलांना घडविण्यासाठी समुपदेशक, शिक्षक व पालक यांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे मला वाटते.

११. शालेय समुपदेशनाप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही समुपदेशनाची गरज आहे, असे तुम्हांला वाटते का?
उत्तर – हो, निश्‍चितच!! जवळजवळ सर्वच क्षेत्रात समुपदेशनाची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रात समुपदेशनाची कशी आवश्यकता आहे हे पटवून देण्यासाठी मी सध्या काम करते आहे. मला ‘इंडस्ट्रियल काउंसिलिंग’ हा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. कारण उद्योग म्हटला की माणसांशी संबंध येतो. अन् माणसांना उद्योगाच्या क्षेत्रात काम करत असताना अनेक समस्या भेडसावत असतात. त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे. कारण काही वेळेला कामगारांना होणारा त्रास ते मालकांकडे बोलून दाखवत नाहीत.

१२. एक मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून महिलांना आपण काय सल्ला द्याल?
उत्तर – महिला ही जगातील सुंदर अशी रचना आहे. ती बहुगुणसंपन्न आहे. ती एक मुलगी, बहीण, पत्नी, सून आणि एक माता अशा अनेक जबाबदार्‍या उत्तमपणे पार पाडते. हे सर्व करत असतानाच ती स्वतःचे जीवन मात्र विसरते. मला महिलांना सांगावेसे वाटते की सर्व जबाबदार्‍या निभावताना त्यामध्ये गुरफटून राहू नका. स्वतःची अस्मिता तयार करा अन् आनंदी जीवन जगा. तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी जरूर प्रयत्न करा. त्यातच तुमच्या जीवनाचे खरे समाधान आहे.