‘समुपदेशना’त दडलंय काय?…

0
1244
  •  प्रा. प्रदीप मसुरकर
    (मुख्याध्यापक, गिरी सरकारी हायस्कूल)

वेळेत मुलांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन न झाल्यास बर्‍याच वर्तनसमस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडते. त्यांना आता समजून घेतले न गेल्यास व मार्गदर्शन न मिळाल्यास हुशार असूनसुद्धा ती मागे पडतात. त्यांच्या आरोग्याची व मनाची अवस्था व समस्या जाणून घेण्यासाठी ‘कौन्सिलर’ म्हणजेच ‘समुपदेशका’ची गरज असते.

आजच्या प्रगतशील जीवनामध्ये आम्ही वावरत आहोत. दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, कृषीक्षेत्रात, विज्ञानक्षेत्रात व इतर सर्व क्षेत्रात प्रगती होते आहे, त्याचबरोबर आमची जीवनशैलीही बदलते आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीबरोबर आव्हानेही तितकीच समोर उभी आहेत. या प्रगतयुगात ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर साधनेही उपलब्ध आहेत.

आजच्या पालकवर्गाला मोठी समस्या (काळजी) ती आपल्या मुलांच्या भवितव्याची. तसेच पालकांच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षाही असतात. प्रत्येक पालकाला वाटते आपले मूल जास्त शिकावे, प्रत्येकच क्षेत्रात पुढे यावे, हे साहजिकच आहे. पण अनेकदा पालकांच्या अपेक्षा व वास्तवता यामध्ये तफावत दिसते व मुलामध्ये व पालकांमध्ये तणाव निर्माण होतात. त्यामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता असते.

प्रत्येक मूल हे इतर मुलांपेक्षा वेगळे असते – वैयक्तिक तफावत (इंडिव्हिज्युअल डिफरन्स). त्यांची आवड, क्षमता, व्यक्तिमत्त्व, रूप, रंग, बुद्धिमत्ता, क्रियाशीलता… अशा सर्व बाबतीत बदल दिसून येतो. याचे कारण आनुवंशिकता व वातावरण हे होय. तेव्हा मुलाला एकाच दृष्टिकोनातून पाहणे किंवा तोलणे योग्य नाही.
पालकाच्या अपेक्षा व मुलांची क्षमता, आवड यामध्ये समन्वय न घडल्यामुळे समस्येला सामोरे जावे लागते. येथे सारखी रस्सीखेच सुरू होते. पालक आपल्या अपेक्षेप्रमाणे पुढे जातात व प्रयत्न करतात. व मुलांची आवड व क्षमता न बघता त्यांच्याकडून जास्त अपेक्षा बाळगतात आणि त्या पूर्ण करू न शकल्यामुळे मग मुलांच्या वर्तनसमस्येला त्यांना तोंड द्यावे लागते. मुलांशी संवाद कमी होतो. उलट उत्तरं देणे, राग-राग करणे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि याचा परिणाम मुलांच्या भावनिक, शारीरिक बाबींवर होतो. घरातील वातावरण बिघडते. याची तीव्रता अधिक झाल्यास पालकांना यातून कसे बाहेर यावे ते कळत नाही.

परिक्षेत कमी गुण मिळाले, मुलांच्या अपेक्षांप्रमाणे निकाल न लागल्यास काही मुलं अबोल होतात. नको ते विचार मनात येतात. अति जिवावर बेतणारेही विचार मनात येतात. वर्तनात काही चुकीच्या गोष्टी दिसून येतात. काही मुले वाईट सवयी वा संगतीला लागतात.

शाळेमध्ये पौगंडावस्थेतील मुले असतात. या वयात त्यांच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात, जे त्यांनाही नवीनच असतात. काही सुशिक्षित पालक आपल्या मुलामुलींना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात पण काही पालकांना परिस्थितीमुळे मुलांकडे योग्यप्रकारे लक्ष देणे जमत नाही. त्या वयामध्ये मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक बदलही होत असतो. ते भावनाशील असतात. या अनपेक्षित बदलांमुळे काही वर्तन समस्या निर्माण होतात. या अवस्थेत मुले व मुलींमध्ये नैसर्गिकरीत्या आकर्षण निर्माण होत असते व ती एकमेकांकडे आकर्षित होतात. याच वेळेस त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन न झाल्यास बर्‍याच वर्तनसमस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडते. त्यांना आता समजून घेतले न गेल्यास व मार्गदर्शन न मिळाल्यास हुशार असूनसुद्धा ती मागे पडतात. त्यांच्या आरोग्याची व मनाची अवस्था व समस्या जाणून घेण्यासाठी ‘कौन्सिलर’ म्हणजेच ‘समुपदेशका’ची गरज असते.
आम्ही थंडी ताप आल्यास डॉक्टरकडे जातो, पण मनाची चंचलता… त्यापासून निर्माण झालेली वर्तनसमस्या व त्यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते व मार्गदर्शनाची गरज असते.
यातूनच कौन्सिलिंग – ‘समुपदेशन’ ही संकल्पना पुढे आली. १९६५ मध्ये मूळ अमेरिकन असलेल्या कॉर्ल रोजर याने ही अमलात आणली.
आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी दुसर्‍या महायुद्धात नंतर याची खरी सुरुवात केली. १९४० – १९५० मध्ये व्हेटरन्स प्रशासन म्हणजेच समुपदेशन मानसशास्त्राची निर्मिती केली. सध्या मुलांच्या व व्यक्तीच्या वर्तनसमस्या निराकरणासाठी ‘समुपदेशन’- कौन्सिलिंग हा चांगला व्यवसाय म्हणून पाहिला जातो.
मनात प्रश्‍न पडतो ‘मार्गदर्शन म्हणजेच गायडन्स’ आणि ‘समुपदेशन म्हणजे कौन्सिलिंग’ यात फरक काय?
साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शनची व्याख्या – एका गरजु व्यक्तीला त्याच्या क्षमता जाणून त्याच्या कार्यात त्यास समस्या सोडवण्यास व समायोजन करण्यास मदत करणे, मार्ग दाखवणे, सल्ला देणे. कोणताही व्यवसाय निवडण्यासाठीसुद्धा सल्ला-मार्गदर्शन दिले जाते.

घरातील मोठी मंडळी आपल्या अनुभवावरून दुसर्‍या व्यक्तीस मार्गदर्शन करतात. सल्ला देतात. हा सल्ला आम्ही काही वेळेस पाळतो व काही वेळेस पाळत नाही. येथे मार्गदर्शनामध्ये बांधिलकी नाही. यातसुद्धा काही वेळेस तज्ज्ञ व्यक्तीकडून व्यावसायिक व शैक्षणिक व इतर मार्गदर्शन दिले जाते.
मग समुपदेशनात दडलंय काय?…
येथे मुख्यत्वे ‘वर्तन-समस्या’ म्हणजे बिहेव्हियरल प्रॉब्लेम्स वर भर् दिला जातो. जी व्यक्ती समुपदेशन करते त्या व्यक्तीस कौन्सिलर किंवा समुपदेशक म्हणतात. हा तज्ज्ञ संबंधित विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र व इतर विषयांमध्ये पारंगत असतो. या समुपदेशनामध्ये वर्तन समस्या निराकरणासाठी येणारी व्यक्ती ग्राहक किंवा क्लाएंट किंवा पालक वा विद्यार्थी असू शकतो, त्यास कौन्सिली म्हणतात व समुपदेशन प्रक्रियेस कौन्सिलिंग असे म्हणतात. येथेही तसेच प्रकार दिसून येतात.

समुपदेशनाचा मुख्य उद्देश –
१) समुपदेशी ग्राहकामध्ये योग्य तो वर्तनबदल घडवून आणणे व मार्गदर्शन करणे
२) येथे समुपदेशक व समुपदेशी यामध्ये लिखित असा नाही पण करार (ऍग्रीमेंट) दिसून येतो. समस्याग्रस्त व्यक्ती समुपदेशकाकडे वर्तन समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मदत मागते.
३) समुपदेशन प्रक्रिया (कौन्सिलिंग प्रोसेस) ही एकदम होत नाही. त्याला वेळ लागतो. दोघांच्या सोयीनुसार वेळ व बैठका होतात.
४) आत्मविश्‍वास निर्माण करणे व वर्तनव्यवस्थेतून पुन्हा पुनर्वसन करणे हापण उद्देश असतो.

समुपदेशकाची पात्रता किंवा क्षमता…
१. समुपदेशन करणार्‍या व्यक्तीचे भाषा कौशल्य उत्तम असावयास पाहिजे.
२. तो ‘तज्ज्ञ’ असावयास हवा.
३. समस्या ऐकून घेण्याची त्याची क्षमता, सहनशीलता असावयास हवी.
४. त्याची निरीक्षण क्षमता योग्य असावयास हवी.
ग्राहक/विद्यार्थीच्या समस्या समजून घेताना शारीरिक हालचालींवरून (बॉडी लँग्वेज) बरेचसे निदान केले जाऊ शकते.
५. समुपदेशक हा विद्यार्थ्याच्या/ग्राहकाच्या भावना समजून घेणारा असावा.
६. वेळेचे बंधन पाळणारा असावा.
७. आपल्या ग्राहक म्हणजेच विद्यार्थी याच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह ठेवू नये किंवा पाहता क्षणीच निर्णय देण्यात किंवा अनुमान काढण्यास उतावीळ होऊ नये.
८. वेळेचे योग्य नियोजन करणारा असावा.
९. समुपदेशनामध्ये घडणारी चर्चा व त्यासंबंधी माहिती गुप्त ठेवणारा असावा.
समुपदेशनामध्ये वापरण्यात येणारी कौशल्ये…
१) अवधान देणे (अटेन्डिंग) – ज्या वेळेस एखादा विद्यार्थी (ग्राहक) समुपदेशन प्रक्रियेत येतो त्या वेळेस समुपदेशन देणार्‍याचे पूर्ण लक्ष त्याच्याकडे असावे.
२) पूर्णपणे शांतता (सायलेन्स) – ग्राहक किंवा विद्यार्थी बोलत असताना अवधानपूर्ण ऐकणे.
३) ऐकून घेतलेली माहिती पुन्हा थोडक्यात सांगणे, जेणे करून विद्यार्थ्यास समुपदेशन करणार्‍याचे ऐकून घेतल्याचे पूर्ण समाधान मिळेल.
४) प्रश्‍न विचारणेसुद्धा कौशल्याने व्हायला पाहिजे. प्रश्‍नांचा भडीमार करू नये. आवश्यकतेनुसार प्रश्‍न विचारावे.
५) केंद्रीकरण (फोकसिंग) – ग्राहकाच्या वर्तनसमस्येवर पूर्णपणे अवधान केंद्रित करणे, नको असलेली माहिती दूर सारणे.
६) योग्य वातावरण निर्मिती कौशल्ये – समुपदेशकाने समुपदेशन प्रक्रियेत योग्य वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. धीर देणे, बोलके करणे, सांगण्यासाठी अभय देणे, आत्मविश्‍वास वाढवणे इत्यादी.
७) संक्षिप्त माहिती – या प्रक्रियेत मिळालेली माहिती संक्षिप्तपणे मांडणे.
समुपदेशनाचे प्रकार –
१. डायरेक्टिव्ह कौन्सिलिंग (कौन्सिलर ओरिएन्टेड)-
येथे पूर्ण नियोजन समुपदेशक करतो. समुपदेशक सांगेल त्याप्रमाणे ग्राहकास ऐकणे भाग पडते.
२. नॉन-डायरेक्टिव्ह कौ. (क्लाएन्ट सेंटर्ड)-
समुपदेशक आपल्या ग्राहकाची क्षमता जाणून समस्येवर मात करण्यास शिकवतो व येथे जास्तीत जास्त भर विद्यार्थ्याच्या कृतीवर दिला जातो.
३. डायरेक्टिव्ह व नॉन-डायरेक्टिव्ह –
येथे वरील दोन्ही पद्धतींचा वापर समुपदेशक करतो.
समुपदेशक प्रक्रिया ः ज्या वेळेस क्लाएन्ट किंवा विद्यार्थी समुपदेशी समुपदेशकाकडे जातो त्या वेळेस कोणताही पूर्वग्रह न ठेवता तो त्याचे स्वागत करतो. योग्य ती वातावरणनिर्मिती करतो. समुपदेशीस बोलतं करण्यासाठी, समस्या मांडण्यासाठी काही मोजकेच प्रश्‍न विचारतो व संभाषण सुरवात करण्यास प्रोत्साहन देतो. समुपदेशीचे बोलणे चालू झाले की त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे अवधान देऊन त्याच्या हालचालींवरही बारकाईने नकळत निरीक्षण करतो व मनात अनुमान काढतो. तसेच क्लाएन्टच्या चांगल्या क्षमतांची नोंद घेतो. थोड्या वेळानंतर – आज आपण इथेच थांबू… असे म्हणून पुन्हा त्यांना दुसरी वेळ देतो.
वरीलपैकी कोणत्याही एका प्रकाराने किंवा तिन्ही प्रकारे आपले ठरावीक क्षेत्र वापरून समुपदेशीस मदत करतो. थोड्याच दिवसात पूर्वीच्या वर्तनाच्या (समस्येच्या) खुणा पुसल्या जातात का हे पाहतो व समुपदेशीचा आत्मविश्‍वास कित्‌पत् वाढला याकडे लक्ष देतो.

समुपदेशनाचे फायदे ः-
१) गैरव्यसनांपासून सुटका होते
२) अविचारापासून, जिवावर बेतणार्‍या विचारापासून परावृत्त करते
३) योग्य सवयी जडण्यासाठी मदत करते.
४) नवीन आत्मविश्‍वास निर्माण करते.
५) पुनर्वसनासाठी (रिहॅबिलिटेशन) मदत करते.
६) काही वेळेस योग्य त्या मानसशास्त्रीय चाचण्या घेऊन मुलांमधील ‘आवड’ व क्षमता शोधून काढते व योग्य शैक्षणिक क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र निवडण्यासाठी मदत करते.
७) गट समुपदेशन – एकच समस्या इतरांची व गटाची असेल तर समूहाला मार्गदर्शन करते.
८) वन-टू-वन ः एका वेळेस एक विद्यार्थी याप्रमाणेही समुपदेशन केले जाते.
सध्याच्या प्रगतशील युगात ही काळाची गरज आहे.
सध्याच्या प्रगतशील युगात ही काळाची गरज आहे.
१. पालकांसाठी समुपदेशन
२. मुलांसाठी समुपदेशन
३. खेळाडूंसाठी समुपदेशन
४. विवाहोत्सुकांसाठी समुपदेशन
अशा बर्‍याच क्षेत्रात ‘समुपदेशन’ आज होत आहे.
आज समुपदेशक शाळा-शाळांमध्ये, इस्पितळांमध्ये, खाजगी क्लिनिक्समध्येही उपलब्ध असतात. याचा फायदा सर्वांनी म्हणजेच पालकांनी घ्यावा. कोणत्याही प्रकारची भीति बाळगू नये.
जो मनाचा वेध घेतो व समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करतो तोच ‘समुपदेशक’!!