समुद्राला उधाण आल्याने व्यावसायिकांना लाखोंचा फटका

0
172

>> खवळलेल्या समुद्राचे पाणी जोरात घुसले शॅकमध्ये

>> ओखी चक्रीवादळाचा गोव्यातही परिणाम

तामिळनाडू व केरळमधील ओखी चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप उत्तर व दक्षिण गोव्यातही समुद्राच्या पाण्याची पातळी शनिवारी रात्री अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने विविध किनार्‍यांवरील शॅकमधील मालमत्तेचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. किनार्‍यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसल्याने आतील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किमती फर्निचर अशा मालाचे नुकसान झाले. या प्रकारामुळे जीवितहानी झाली नसली तरी पाळोळे किनार्‍यावर काल सकाळी चालत जाणार्‍या काही पर्यटकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते वाहून जात होते. मात्र जीवरक्षकांनी त्यांना वाचवले. बायणा किनार्‍यावरही पाण्याची पातळी वाढली. मात्र नुकसानीचे वृत्त नाही.

उत्तर गोव्यात कळंगुट, मोरजी, मांद्रे, हरमल, केरी येथे समुद्रकिनार्‍यावरील शॅकचे नुकसान झाले. तर दक्षिण गोव्यात बेतुल, उतोर्डा, कासावली ते मोबोरपर्यंत समुद्राच्या पाण्याला उधाण आल्याने व्यावसायिकांना मोठे नुकसान झाले. बेतुल, कुटबण येथील मच्छिमारी ट्रॉलर्स काल किनार्‍यावर बांधून ठेवण्यात आले.
पेडणे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार मोरजी, मांद्रे, हरमल किनार्‍यावर पाणी वाढल्याने शॅक व्यावसायिकांचे ५० लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. रविवारी सकळी ९ वाजल्यापासून पाणी शॅकमध्ये घुसण्यास सुरुवात झाली. या भागातील सरकारी जागेत पर्यटन खात्याने ३५ पेक्षा जास्त शॅक उभारण्यास परवानगी दिली होती. त्यापैकी बहुतेक शॅकना पाण्याचा फटका बसला. या भागांतील जीवरक्षकांनी पर्यटक तसेच स्थानिकांना पाण्यात उतरण्यास मज्जाव केला.
सकाळी ९ वाजल्यापासून समुद्राला अचानक उधाण आले. त्यात किनारी भागातील होड्याना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला. केरी भागातील विलास आरोलकर , समीर हरजी, अमर तळकर, सुजित कलंगुटकर, योगेश तळकर, बबन तळकर, हरमलमधील दशरथ कोचरेकर, गोडविन, संताना डिसौझा, जॉनी मोंतेरो, सुहास प्रभू व इतर तीन मिळून हरमल येथील आठ शॅकचे नुकसान किमान १० लाख, केरी किमान ७ लाख, मांडरे किमान १० लाख व मोरजी किमान १५ लाख रुपयांचे नुकसान झाले .

मोरजीत मोठा तडाखा
मोरजी किनारी भागात तेम्बवाडा येथे सहा तर विठ्ठलदास किनारी २ मिळून आठ शॅक ना धोका निर्माण झाला. त्यात संदीप मोरजे, निवृत्ती मोरजे, नंदकिशोर मोरजे, श्री. देसौजा तर विठ्ठलदास येथील गाब्रीयाल फर्नांडीस व श्री. वाल्येन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किनार्‍यावर जायला मार्गही नव्हता एवढे पाणी किनार्‍यावर साचले होते. दरम्यान आमदार दयानंद सोपटे यांनी नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाईसाठी आपण सरकारदरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पाळोळेत वाहून जाणार्‍या पर्यटकांना वाचवले
पैंगीण ः अरबी समुद्रात घोंगावणार्‍या ओखी चक्रीवादळाचा काणकोण तालुक्याला फटका बसला नसला तरी पाळोळे समुद्र किनार्‍यावर पाण्याची पातळी वाढल्याने काल सकाळी किनार्‍यावरून चालत जाणारे सहा विदेशी पर्यटक पायाखालची वाळू वाहून गेल्याने घसरले व पाण्यात वाहून गेले.
किनार्‍यावर असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना तत्काळ समुद्रातून वर काढले. शनिवारी रात्री अचानक समुद्राची पातळी वाढल्याने पाळोळे किनार्‍यावर उभारण्यात आलेल्या काही शॅकांमध्ये पाणी शिरले. मात्र कोणत्याच प्रकारची नुकसानी झाली नाही. अशी माहिती पाळोळे वॉडचे नगरसेवक दयानंद पागी यांनी दिली. पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी होड्या किनार्‍यावर आणून ठेवण्यात आल्या.