समीकरण सवयीचे

0
224
  • प्रदीप मसुरकर
    (मुख्याध्यापक, गिरी स.मा.शा.)

चांगल्या सवयीमुळे यश मिळते, वेळ वाचतो, पैसे वाचतात, लौकिक मिळतो.
म्हणून आपण सर्वजण ‘चांगल्या सवयी लावून घेऊया. त्यासाठी काय आहे समीकरण?- कल्पना+ दृढ निश्‍चय+ सराव= कृती= सवय= ध्येय= यशप्राप्ती.

‘‘दिवसभर हातात मोबाइल घेऊन बसते, घरकामात अजिबात लक्ष नाही, मदत तर नाहीच.. काय होणार पुढे कोण जाणे, उद्या लग्न झाल्यावर कसे होणार? तुम्हीच सांगा आता..’’, राधिकाची आई आपल्या शेजारणीकडे आपल्या मुलीबद्दल तक्रार करीत होती.
‘‘आमचा राजू नुसता फेसबुकवर व वॉट्‌ऍपवर असतो. साध्या जेवणाकडे पण लक्ष नाही. जेवतानासुद्धा मेसेजेस पाठवत असतो. काय सांगायचे या मुलांना? गेल्या वर्षी ११वीत नापास झाला. आता पुढे काय करणार कोण जाणे? तुम्हीच सांगा राधाताई, या मुलांचे भवितव्य काय?’’
…. असे बरेचसे संवाद प्रत्येक घरातून ऐकायला येतात. स्मार्ट फोनमुळे तर दैनंदिन जीवनात आपली बरीचशी कामे चुटकीसरशी होतात पण त्याचा योग्य प्रकारे वापर न केल्याने बर्‍याचशा नको असलेल्या सवयी अंगवळणी पडतात. त्यातून बाहेर येणे खूप कठीण असते.

प्रत्येक व्यक्तीसमोर एक ठरावीक ध्येय असायला हवे. मग त्यासाठी आपल्याकडून विशिष्ट हालचाल, पावले उचलणे गरजेचे असते. विशिष्ट सवयी अंगवळणी पडायला हव्यात, जसे टीव्हीवर आम्ही क्रिकेट मॅच बघतो. त्यातल्या त्यात एखाद्या दिवशी मॅच फारच रोमांचक असते व सरते शेवटी एक जिंकण्याचे समीकरण पुढे येते. त्याचप्रमाणे प्रत्येकासमोर एक ‘सवयीचे समीकरण’ असायला पाहिजे.

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट रचनेत वागत असलेली दिसून येते. काही व्यक्तींच्या हालचाली, हावभाव, काम करण्याची ढब, वागण्याची-बोलण्याची तर्‍हा, दिसण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, बसण्याची रीत… सर्वकाही एका विशिष्ट प्रकारच्या सवयीमध्ये दिसून येते.

काहींच्या वागण्यात कृत्रिमता दिसून येते तर काहींच्या वागण्यात नैसर्गिकता दिसते. येथे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या सवयी जडलेल्या असतात. त्या सवयी कदाचित त्या व्यक्तीच्या फायद्याच्याही असतील किंवा दुष्परिणाम घडवून आणणार्‍याही असतील. परिस्थिती तीच असते तर आपल्या प्रतिक्रिया विशिष्ट स्वरूपाच्या असतात. त्या यांत्रिक होतात, तर प्रश्‍न पडतो- सवय म्हणजे काय?
चेतक व प्रतिक्रिया यांच्या सहज, यांत्रिक संबंधालाच सवय म्हणतात. मॉर्गन अँड गिलिलँड याने म्हटले आहे – ‘‘आमच्या वर्तनातील सर्व बदल अनुभवाने होत असतात. याला सवय म्हणतात. अध्ययन क्रियेत हे बदल दिसून येतात.’’
जेम्सच्या मते- ‘सवयी’ म्हणजे दुसरा निसर्ग.
गेस्टॉल्टच्या मते- सवयी या विशिष्ट प्रकारच्या हावभाव व कृती असतात. कालांतरानंतर त्यांच्यात सत्यता दिसून येते.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास – एखादी गोष्ट नव्याने करायची असेल तर प्रयत्न करावा लागतो. पण तीच वारंवार केली तर ती अगदी सहजपणे होऊ शकते. शिवाय कार्यही सफाईपणे होते. ते अधिक रेखीव होते. कार्य पुन्हा पुन्हा केले तर त्याची सवय जडते.
प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे ठरावीक गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे सवयीचेही गुणधर्म असतात.
१) सुविधा व सोईस्कर – ज्या कृती सहजपणे करता येतात, त्यांची लगेच सवय लागते. सोईस्करपणा व सुविधा असतील तर त्या सवयी जडण्यासाठी उत्कृष्ट ठरतात.
२) आवड (इंटरेस्ट) – एखाद्या कृतीतून आनंद मिळत असेल तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते व त्याचे रुपांतर सवयीत होते. उदा. वाचन, लिहिणे, पोहणे, गाडी चालवणे, अभ्यास इत्यादी.
सध्याच्या युवा पिढीची आवड व्हॉट्‌सऍप, फेसबुक, गाडी चालवणे यात जास्त दिसून येते. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याकडे त्यांचा कल असतो व त्याची सवय जडते. ती चांगली की वाईट हे आम्ही ठरवू शकत नाही. पण कोणत्याही गोष्टींचा किंवा कृतीचा अतिरेक झाल्यास तिचे दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवर, शरीरावर, रक्ताभिसरणावर दिसून येतात.
३) कार्यतत्परता – जेव्हा आपण एखादी कृती सोपेपणाने व जलदपणे करतो. त्यांची लगेच सवय जडते.
४) जलद प्रतिसाद – सवयी जडलेल्या कृतीमध्ये जलद प्रतिसाद दिसून येतो.
५) सवयी बदलणे अवघड – एकदा का आपल्याला वाईट सवयी जडल्या तर त्या बदलणे अवघड असते. उदा. टूथब्रश-पेस्ट जागेवर न ठेवणे व मग दुसर्‍या दिवशी शोधत बसणे, चष्मा एका जागेवर न ठेवणे व तो शोधण्यासाठी दररोज अर्धा तास घालवणे. गाडीची चावी शोधण्यासाठी दररोज अर्धा तास फुकट घालवणे इत्यादी.
६) यांत्रिक हालचाल – एकदा सवय जडल्यावर काही क्रिया यांत्रिकपणे होतात. कार चालवणे, शिवणकाम, मोटारसायकल चालवणे इत्यादी.

सवयींचे प्रकार –
काही सवयी कौशल्य वाढवतात व त्या जीवन सुसह्य करतात. त्याला उन्नत करतात. या चांगल्या सवयी आहेत. माणसाच्या जीवनात त्या उपयोगी ठरतात. नियमितपणा, प्रातःकाळचा व्यायाम, वाचन, लेखन करणे या चांगल्या सवयी आहेत. परंतु काही सवयी आरोग्य विघातक असतात. त्या माणसाच्या अधःपाताला कारणीभूत ठरतात. त्यांना आपण ‘व्यसन’ म्हणतो. या वाईट सवयी आहेत. दारू पिणे, धूम्रपान, चोरी करणे इत्यादी सवयी विघातक असतात. समाजातील स्वीकृत नीतिनियमांना अनुसरून सवयींचे वर्गीकरण केले जाते.
मानसशास्त्राच्या दृष्टीने सवयीचे दोन प्रकार पडतात – १) शारीरिक सवय,
२) मानसिक सवय.
सकाळी उठल्याबरोबर चहा घेणे ही शारीरिक सवय आहे. पण पूजा केल्याशिवाय चैन न पडणे ही मानसिक सवय आहे. काही अयोग्य वर्तनप्रकार निर्माण होतात. उदा. खांदे उडविणे, डोळे सतत मिचकावणे, तेच तेच शब्द विनाकारण वापरणे.

वाईट सवयी व त्याची कारणे….
१. खोटे बोलणे – आनुवंशिक दोष, वातावरण, परिस्थिती
२. चोरी करणे – घरगुती वातावरण
३. कामाकडे दुर्लक्ष – पालकांचे दुर्लक्ष
४. शाळेला दांडी मारणे – घरचे वातावरण- शालेय वातावरण- पालकांचा दुर्लक्षपणा
५. उशिरा उठणे – कठोर शिक्षा, कामाचा ताण जास्त, मनाविरुद्ध घटना घडणे.
६. भांडण करणे – सिनेमा, दूरदर्शन, घरचे वातावरण, आर्थिक परिस्थिती
७. धूम्रपान – इतरांचे अनुकरण करून, सिनेमा इत्यादी.
८. त्रागा करणे – मार्गदर्शनाचा अभाव, मनाविरुद्ध घटना घडल्यास.
९. लैंगिक सवयी – मानसिक, भावनिक, शारीरिक विकासाचा असमतोल.
वाईट सवयी कशा घालवायच्या?
१. वाईट सवयींपासून मुक्त होण्यासाठी पर्यायी सवयींचा समावेश करणे. उदा. दारू पिण्याची सवय असलेल्या व्यक्तीने दारू पिण्याची तल्लफ आल्यास सोडा किंवा थंड पेय घेणे. पण यासाठी ती सवय घालवण्याच्या इच्छाशक्तीची व समुपदेशनाची गरज आहे.
२. वातावरण बदल – वातावरणात योग्य तो बदल घडवून आणल्यास व योग्य प्रकारे समुपदेशन झाल्यास व्यक्तीला वाईट सवयीपासून परावृत्त करता येते. उदा. मुलाला लागलेली सिगरेट ओढण्याची सवय. तसेच शाळेला उशिरा येणे, शाळेला दांडी मारणे, चोरी करणे इत्यादी सवयींपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करता येते.
३. स्वतःलाच सूचना देणे ः या पद्धतीत या मुलांना पुन्हा पुन्हा स्वतःस सूचना देण्यास सांगणे. इच्छाशक्ती व दृढ संकल्प, निश्‍चय यानेसुद्धा वाईट सवयींपासून सुटका होते.
४) प्रोत्साहन व शिक्षा – चांगल्या कार्यास प्रोत्साहन किंवा बक्षिसे देणे. शिक्षा अशी असावी की न बोलणे, दुर्लक्ष करणे, मौन बाळगणे जेणेकरून तो विद्यार्थी विचार करण्यास प्रवृत्त होईल.

शैक्षणिक महत्त्व ः-
चांगल्या सवयी यश मिळवून देतात. नीती विकास, चारित्र्य संवर्धन यांच्या दृष्टीने चांगल्या सवयी रुजविणे महत्त्वाचे आहे.
क्रिया-कौशल्ये विकसीत करण्याच्या कामी सवयींचा फार उपयोग होतो.
कठीण विषयाचे अध्ययन योग्य अभ्यासाच्या सवयीमुळे सुकर होते. सवयी दृढ करण्यासाठी सातत्य व पुनरावृत्ती यांची जरुरी असते.
लहान वयात योग्य सवयी जडतात. एकदा सवय दृढ झाली की तिचे निर्मूलन करणे कठीण जाते.
आपण जरी बुद्धिमान नसाल तरी चांगला व योग्य दृढनिश्‍चय करून सवयी लावून घ्याव्यात.
चांगल्या सवयीमुळे – १. यश मिळते. २. वेळ वाचतो. ३. पैसे वाचतात.
४. लौकिक मिळतो.
म्हणून आपण सर्वजण ‘चांगल्या सवयी लावून घेऊया. कल्पना+ दृढ निश्‍चय+ सराव= कृती= सवय= ध्येय= यशप्राप्ती.