समाजात फूट पाडण्याचे देशविरोधी षड्‌यंत्र

0
370
  •  दत्ता भि. नाईक

भारतातील जनजातींचा स्वाभिमान व पराक्रमाचे प्रतीक असलेला १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. आणि हाच खर्‍या अर्थाने भारत देशातील जनजातींचा अस्मिता दिन आहे. म्हणूनच देशविरोधात चाललेल्या षड्‌यंत्रापासून संपूर्ण समाजाने सावध राहिले पाहिजे.

९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय मूळ निवासी दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रांकडून जगभर पाळला जातो. सन १९९४ हे वर्ष जागतिक मूळ निवासी वर्ष म्हणून घोषित केले होते व त्यानुसार ज्या-ज्या देशांमध्ये तेथील मूळ निवासींवर अत्याचार केले गेले त्या-त्या देशांमध्ये यासंबंधाने जागृतीचे कार्य करावे, असे संयुक्त राष्ट्रांकडून आवाहन केले गेले होते. हा विषयच मुळी अमेरिका, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या खंडांना व त्यांच्या जवळपास असलेल्या बेटांना लागू पडतो. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारतातील सर्वच्या सर्व जनता ही या देशातील मूळ निवासी असल्याचे त्यावेळी संयुक्त राष्ट्रांना कळवले होते.

युरोपीय लोकांना अमेरिकेचा शोध लागला आणि तेथील मूळ निवासींच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. १६१० साली ९ ऑगस्ट या दिवशी अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या जवळ पोहटन येथे पारपहेध नावाच्या ७५ मूळ निवासींची ब्रिटिश सैनिकांनी गोळ्या घालून निर्ममपणे हत्या केली होती. त्यांनीच करून ठेवलेल्या ‘पराक्रमाच्या’ नोंदीनुसार या दिवसाला मान्यता देऊन १९८२ साली संयुक्त राष्ट्रांनी जगातील मूळ निवासींच्या स्थितीबद्दल अभ्यास करण्यासाठी एका अध्ययन दलाची नियुुक्ती केल्यामुळे हा दिवस महत्त्वपूर्ण ठरत आहे. खरे पाहता पोहटन येथील घटना हे काही एकमेव उदाहरण नव्हे. त्यापूर्वी व त्यानंतर असा नरमेध चालूच राहिला. संयुक्त राष्ट्रांवर आजही अत्याचार करणार्‍यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे असा एखादा दिवस घोषित करणे म्हणजे एका मोठ्या जखमेवर छोटीशी मलमपट्टी करण्यासारखे आहे. जिथे जिथे लोकसंख्या विरळ होती तिथे मूळ निवासींचा संहार व त्यांच्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याच्या कामी युरोपीय राष्ट्रांचे निवासी यशस्वी झाले. आफ्रिका व आशियाई देशांत त्यांना तसे करता आले नाही. आफ्रिकेतील लोकांच्या लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना अमेरिकेतील संस्थानिकांना विकणे हा काही युरोपीय लोकांचा उघडपणे चालणारा व्यवसाय होता.

अमेरिका नव्हे इबियायाला
सन २००७ पासून या विषयात संयुक्त राष्ट्रांकडून विशेष लक्ष घातले जाऊ लागले. मूळ निवासींना ज्या पद्धतीने निर्मम छळाला सामोरे जावे लागले ते पाहता वर उल्लेख केलेल्या पृथ्वीवरील क्षेत्रांमध्ये जे थोडे मूळ निवासी शिल्लक आहेत त्यांना थोडातरी दिलासा देणारा हा निर्णय आहे. अमेरिकेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास या खंडाचे मूळ नाव आहे ‘इबियायाला.’ ख्रिस्तोफर कोलंबसने नवीन क्षेत्राचा शोध लावल्यानंतर अमेरिगो वेस्पुची याने या क्षेत्राचा नकाशा तयार केला व त्यानंतर ‘अमेरिका’ हे नाव प्रचलित केले गेले. तिथे प्रथम गेलेल्या स्पॅनिश लोकांनी तेथील साध्याभोळ्या लोकांना मदतीच्या नावाखाली ‘देवी’चे जंतू असलेल्या कांबळी भेट दिल्या व हा नवीनच रोग असल्यामुळे त्यांच्यात प्रतिकारशक्ती नव्हती. परिणामस्वरूप लाखो मूळ निवासी देवीची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडले. तुमच्यावर देवाचा कोप झालेला आहे, त्याचे आम्ही निवारण करू असे सांगून जिवंत राहिलेल्यांचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवले व कायमचे त्यांच्याशी जखडून टाकले.

ऑस्ट्रेलियामध्ये तर इंग्लंडमधील गुन्हेगारांना व दरोडेखोरांना शिक्षा म्हणून पाठवले जात असे. त्यांनी तर अख्ख्या ऑस्ट्रेलियामध्ये उच्छाद मांडला. इतके करूनही हाती सापडलेल्यांचे धर्मांतर करण्यास मात्र कोणतेही नीती-नियम न पाळणारे हे लोक सदा तत्पर असत. न्यूझिलंडमध्येही हा प्रकार राजरोसपणे चालू होता.

लक्ष्मणानंद सरस्वतींची हत्या
आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनेही १६९ व्या अधिवेशनात या विषयाला महत्त्वाचे स्थान दिले. मूळ निवासींची संस्कृती व जीवनशैली यांना महत्त्व देण्यात यावेळी भर देण्यात आली. अधिवेशनातील ठरावात मूळ निवासींना आपल्या नैसर्गिक संपत्तीवर आधारित विकास करून घेण्याच्या अधिकाराला प्राथमिकता देऊन समाजाचे जीवन चालू राहावे यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्यावर परिणाम करणार्‍या भेदभावावर आधारित व्यवहार दूर करून त्यांच्या जीवनाशी संलग्न असलेल्या सर्व निर्णयप्रक्रियांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

आपल्या देशामध्ये कोणत्याही जनहितकारी निर्णयाचा समाजातील भेदभाव संपवण्याऐवजी खोट्या मानवतेच्या नावाखाली फूट पाडण्यासाठीच प्रयत्न केला जातो. जगातील मूळ निवासींचा संहार करणारे, हीच मूळ निवासींची कल्पना भारतातील जनजाती समाजाला देशाच्या संस्कृतीपासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केले तर त्याचा सर्वप्रथम स्वतःच्या मूळ संस्कृतीशी संबंध तुटतो, त्यामुळे त्याचा स्वतः या देशाचा मूळ निवासी म्हणण्याचा अभिमानच नष्ट होतो व अशा धर्मांतरित लोकांना पुढे करून ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या सहाय्याने युरोप-अमेरिकेतील काही मंडळी आपल्या देशातील समाजामध्ये फूट पाडू पाहात आहेत. ९ ऑगस्ट हा विश्‍व आदिवासी दिवस म्हणून साजरा करून जनजाती समाजाला बहुसंख्य समाजाच्या प्रवाहापासून तोडण्याचे षड्‌यंत्र आपल्या देशात आखले जात आहे. धर्म इत्यादीपासून अलिप्त व उदासीन असलेले कम्युनिस्ट त्यांना साथ देत आहेत. ओडिशामध्ये बळजबरी, कपट व आमिष यांचा वापर करून व त्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन धर्मांतरित केले गेलेल्या जनजाती समाजाची घरवापसी करणार्‍या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या माओवाद्यांनी घडवून आणली होती हे लक्षात ठेवावे लागेल.

फुटून निघण्याची मागणी कुणी केली?
भारत देशाचे संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या कारणांमुळे मागे पडलेल्यांना समानतेची पातळी गाठण्यासाठी त्यात उपाययोजना केलेली आहे. संविधानातील समानतेचा अधिकार देणार्‍या १६ ते १७ या धारा अतिशय सुस्पष्ट आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वांच्या धारा ४६ नुुसार अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्या हितसंबंधांचे रक्षण करून त्यांच्या मागे राहिलेल्या विकासाचा अनुपात भरून काढणे याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय शिक्षण, सरकारी नोकर्‍या, पदोन्नती, स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार्‍यांसाठी कमी व्याजावर कर्ज व धनपुरवठा करणे अशा व्यवस्था आपल्या संविधानानुसार व वेळोवेळी संसदेत कायदे बनवून बनवलेल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या मागणीपत्रात ज्या शेहेचाळीस मागण्यांचा अंतर्भाव आहे त्यांतील एक सोडून सर्व मागण्या रास्त आहेत. परंतु त्यातील तथाकथित मूळ निवासींना स्वयंनिर्णयाचा हक्क असावा ही मागणी भारताच्या बाबतीत गैरलागू आहे. यापूर्वीही भारत सरकारच्या प्रतिनिधीने या मागणीवर हस्ताक्षर करण्यास नकार दिलेला होता. तरीही आपल्या देशाला घातक असलेल्या व फुटीरतेला प्रोत्साहन देणार्‍या या मागणीवरच काही लोक भर देताना दिसतात.
आपल्या देशामध्ये देशातून फुटून निघण्याची मागणी सर्वप्रथम नागा जनजातीमधील काही मंडळीकडून पुढे आली. त्यानंतर ती लुशाय पर्वतराजीमधील मिझो जनजातीतूनही पुढे आली. मणिपूर व मेघालयमधूनही अधूनमधून ‘स्वयंनिर्णय’ नावाच्या गोंडस नावाखाली देशातून फुटून निघण्याची मागणी केली जाते. झारखंड व छत्तीसगढमध्येही काही क्षेत्रांतून अशी मागणी पुढे येते.

मिझोराममध्ये ९५ टक्के व नागालँडमध्ये ९० टक्के प्रजा ख्रिस्ती आहे, एवढेच सूचित केल्यास समस्या लक्षात येते. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे जनजाती समाजाचा विकास होतो असे एका बाजूस म्हणायचे व दुसर्‍या बाजूस आमचा मागासलेपणा घालवण्यासाठी स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र पाहिजे असा प्रचार करायचा असा हा दुटप्पी प्रकार आहे.

९ ऑगस्ट हा दिवस देशाच्या मुळावर उठण्यासाठी साजरा केला जात नाही. भारतातील जनजातींचा स्वाभिमान व पराक्रमाचे प्रतीक असलेला १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आहे. आणि हाच खर्‍या अर्थाने भारत देशातील जनजातींचा अस्मिता दिन आहे व म्हणूनच देशविरोधात चाललेल्या षड्‌यंत्रापासून संपूर्ण समाजाने सावध राहिले पाहिजे.