समाजवादी दंगल!

0
105

आमीर खानचा ‘दंगल’ देशातील समस्त चित्रपटगृहांमध्ये धडाक्यात चालला असताना उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर समाजवादी पक्षामध्ये नवी दंगल उसळली आहे. गेले अनेक महिने सुरू असलेला समाजवादी पक्षातील हा वाद काल संध्याकाळी शिखराला पोहोचला. मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्रिपदावर असलेले आपले पुत्र अखिलेश यांना पक्षविरोधी कारवायांचे कारण देऊन पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करणारे जे पाऊल उचलले, ती समाजवादी पक्षातील दुफळीची निखळलेली शेवटची कडी ठरू शकते. काका शिवपाल आणि अखिलेश यांच्यातील संघर्ष आता खुद्द मुलायम – अखिलेश असे रूप धारण करून निर्वाणीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. समाजवादी पक्ष आपण घडवला आहे आणि त्यावर अंतिम निर्णयाधिकार आपलाच आहे हा मुलायम यांचा अहंकार आणि मुख्यमंत्री अखिलेश यांचा पक्षाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न यातून हा संघर्ष उफाळलेला आहे. जुन्या धेंडांशी पंगा घेत अखिलेश यांनी पक्षाची नवी प्रतिमा घडवण्याचा प्रयत्न चालवला. त्यांना साथ मिळाली काका रामगोपाल यांची. दुसरीकडे शिवपाल यांनी बंधू मुलायम यांची साथसंगत केली. या दोन्ही गटांमधील शह – काटशहाचे राजकारण गेले अनेक महिने रंग भरते आहे. अन्सारी बंधूंच्या कौमी एकता दलाला सामावून घेण्यात अखिलेश यांनी खोडा घातला होता. त्यानंतर गायत्री प्रजापती आणि राजकिशोरसिंह या दोघा शिवपाल समर्थक मंत्र्यांची अखिलेश यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. शिवपाल यांचे निकटवर्ती असलेले राज्याचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर अखिलेश यांनी खुद्द शिवपाल यांच्यावरच घाव घातला. शिवपाल यांची महत्त्वाची खाती त्यांनी काढून घेतली. दुखावलेले शिवपाल मुलायम यांच्या आसर्‍याला गेले, तेव्हा मुलायम यांनी अखिलेश यांना काटशह देत त्यांच्याकडे असलेले समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्षपद काढून घेत ते बंधू शिवपाल यांना बहाल केले. पक्षावरील मुलायम व शिवपाल यांची पकड त्यातून अधिक घट्ट झाली, कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे उमेदवार निवडीचा हक्क त्यातून त्यांच्या हाती एकवटला. अखिलेश आणि पिता मुलायम यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचण्याचे हे खरे कारण आहे. दोन्ही गटांनी ज्या प्रकारे एकमेकांवर कुरघोडी करीत उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीसाठी आपापले उमेदवार जाहीर केले, ते पाहिल्यास हा संघर्ष आता विकोपाला पोहोचला आहे याची अटकळ बांधता येत होती. अखिलेश बुंदेलखंडाच्या दौर्‍यावर असताना त्यांना विश्वासात न घेताच मुलायम यांनी पक्षाचे उमेदवार जाहीर केले. या उमेदवारांच्या नावांना अखिलेश गटाचा आक्षेप आहे. यापैकी अनेक उमेदवारांपाशी जिंकून येण्याची क्षमताच नाही असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे अखिलेश यांनी आपली उमेदवारी यादी स्वतंत्रपणे जाहीर करून टाकली. त्याला पाठबळ मिळवण्यासाठी अखिलेश यांचे मार्गदर्शक असलेल्या रामगोपाल यांनी पक्षाचे विशेष अधिवेशन बोलावल्याने मुलायम यांनी शिवपाल यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन काल अखिलेश आणि रामगोपाल या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्याचे उत्तर येण्यापूर्वीच त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टीही करून टाकली. उत्तर प्रदेशसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा राज्यात निवडणुकीची घोषणा आता आठवड्याभरात होणार असताना समाजवादी पक्षात जवळजवळ पडलेली ही फूट सांधली गेली नाही, तर काय घडणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवल्याचा दावा करणार्‍या अखिलेश या घरच्या आव्हानाला कसे सामोरे जातात त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील.