समरांगण

0
167

कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदी अखेर शनिवारी राहुल गांधी यांची रीतसर प्रस्थापना झाली. मावळत्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे भावपूर्ण भाषण आणि अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतानाचे राहुल यांचे भाषण या दोन्हींमधून सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र होते. तो पक्ष कसा देश तोडणारा आहे आणि कॉंग्रेस कसा जोडणारा पक्ष आहे यावर दोघांनीही भर दिलेला दिसला. कॉंग्रेस पक्ष कालबाह्य झालेला नाही, उलट देशाला आज त्याच्यासारख्या सर्वसमावेशक पक्षाची गरज आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न त्यातून दिसला. राहुल गांधी यांच्यासमोर पक्षाध्यक्ष म्हणून सर्वांत मोठे आव्हान कुठले असेल तर ते हेच आहे. ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ची घोषणा देत निघालेल्या मोदींच्या झंझावाताने त्या पक्षाची आजवर एवढी वाताहत केली की आज केवळ पाच राज्यांपुरती त्या पक्षाची सत्ता उरली आणि त्यातही केवळ कर्नाटक हे महत्त्वाचे राज्य राहिले. हा पक्ष आता प्रमुख राजकीय पक्ष राहिलेला नाही, तो पुरता निकालात निघाला आहे आणि तो काही पुन्हा डोके वर काढणे शक्य नाही हे जे नकारात्मक चित्र देशात निर्माण झालेले आहे, ते पुसून काढत पक्षाला नवसंजीवनी देण्याचे आणि त्यासाठी ऊर्जा पुरविण्याचे काम आता राहुल गांधी यांचे आहे. आजवर आई सोनियांच्या पदराआडून केलेले पक्षकार्य आणि आता प्रत्यक्ष रणांगणावर एकट्याने सामोरे येऊन पेललेली जबाबदारी यामध्ये मोठा फरक राहणार आहे. पक्षाच्या यशापयशाचे श्रेय – अपश्रेय आता स्वतःलाच मिळणार आहे. त्यामुळे आजचा गुजरातचा निकाल हा राहुल यांच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे. गुजरात पिंजून काढत त्यांनी तेथे केलेला प्रचार, पटिदार, ओबीसी, दलित यांना सोबत घेत तेथील सत्ताधारी भाजपला आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले आव्हान कितपत प्रभावी ठरले ते आजचा गुजरातचा निकाल सांगणार आहे. त्यामुळे गुजरात ही राहुल यांच्या भावी वाटचालीसाठीची पहिली कसोटी आहे. आपली आजवरची कमकुवत, पळपुट्या नेत्याची छबी पुसून काढून एवढ्या मोठ्या देशव्यापी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंतच्या मनात विश्वास आणि ऊर्जा निर्माण करण्याचे काम राहुल यांना करावे लागणार आहे. त्यासाठी पक्षसंघटना नव्याने बांधावी लागेल. कॉंग्रेस पक्षाची स्थिती आज अशी आहे की तेथे कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेले आहेत. त्यामुळे भोवतीच्या लाळघोट्यांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडून तळमळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना पोहोचावे लागेल. जुन्या नेत्यांच्या फळीचे ‘मार्गदर्शन’ कितपत घ्यायचे आणि स्वतःची वाट कितपत चोखाळायची त्याचे तारतम्य त्यांना साधावे लागणार आहे. त्यासाठी प्रसंगी पक्षातील बड्या धेंडांना दूरही सारावे लागेल. येत्या वर्षी मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगढ या बड्या राज्यांच्या महत्त्वपूर्ण निवडणुका व्हायच्या आहेत. त्याच्या पुढच्या वर्षी तर लोकसभेचीच निवडणूक आहे. त्यामुळे राहुल यांना वेळ थोडा आहे. येणारा काळ धकाधकीचाच राहणार आहे. एकीकडे पक्षाच्या प्रचाराची धुरा वाहायची दुसरीकडे पक्षसंघटना बांधायची, तिसरीकडे पक्षामध्ये नवी ऊर्जा पेरायची, सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरात कार्यरत असलेल्या छोट्या – मोठ्या पक्षांना सोबत घ्यायचे आणि हे सगळे करीत असताना विरोधकांकडून येणारी टीकास्त्रे सोसत अन्य प्रादेशिक नेत्यांमधून वाट काढत स्वतःला पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत नरेंद्र मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आणायचे या सगळ्या आघाडींवर काम करणे तसे सोपे नसेल. पक्षाची पारंपरिक मतपेढी असलेल्या ‘आम आदमी’ बद्दलचा कळवळा ते अधूनमधून नाट्यमयरीत्या दाखवीत आले, परंतु ह्या असल्या नाट्यछटा फार काळ चालत नाहीत. हा खरोखरच आपल्यासाठी झटणारा नेता आहे आणि त्याची नाळ या देशाशी घट्ट जुळलेली आहे हा विश्‍वास त्या सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला पाहिजे. मोदी सरकारप्रती काही घटकांत असलेली नाराजी आणि असंतोष यावर स्वार होत त्या असंतोषाची सूत्रे आपल्या हाती घेता आली तरच यापुढे सत्तेची वाट चालता येईल, अन्यथा पक्षाचा अधिक विद्ध्वंस अटळ आहे. केवळ नेहरू – गांधी घराण्याचा वारसा, वडिलांनी, आजीने देशासाठी दिलेले बलिदान ही पुण्याई चालणार नाही. राहुल गांधींनी आजच्या संदर्भामध्ये समकालीन वास्तवाला समर्थपणे भिडण्याची खरी जरूरी आहे. नुसत्या ट्टीटरवरील पढवलेल्या शेरेबाजीतून हे होणारे नाही. देश समजून घ्यावा लागेल, देशाचे प्रश्न समजून घ्यावे लागतील, सत्ताधारी पक्षाची कमकुवत बाजू, जनतेची नस समजून घ्यावी लागेल. राजकारणात आल्यापासून आजवर त्यासाठीचा पूर्वाभ्यास झाला असेलच, परंतु आता प्रयोगांना जागा नाही आणि तेवढा वेळही नाही. आता प्रत्यक्ष रणमैदान समोर आहे आणि ‘जिंकू किंवा मरू’ हाच कोणत्याही समरांगणातील निर्वाणीचा मंत्र असतो.