समयसूचक धोनी ठरला फायदेशीर

0
149

>> उथप्पाने सांगितले ‘बॉल आऊट’मधील यशाचे रहस्य

महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणामुळेच १३ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ सामन्यात ‘बॉल आऊट’ मध्ये विजय मिळवणे शक्य झाले होते, असे त्या सामन्यात खेळलेल्या व बॉल आऊटमध्ये गोलंदाजी करताना यष्ट्यांचा अचूक वेध घेतलेल्या रॉबिन उथप्पा याने काल गुरुवारी सांगितले. राजस्थान रॉयल्सच्या पोडकास्टमध्ये न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधी याच्या बोलताना उथप्पाने त्या विजयामधील धोनीचे योगदान कथन केले.

‘त्यावेळी धोनीने सर्वांत चांगली गोष्ट केली ती म्हणजे तो यष्ट्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलला ते समजले नाही, ज्यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांची संधी होती त्यावेळी तो यष्टीरक्षकाच्या नियमित जागेवर उभा राहिला. पण धोनीने आपला समयोचितपणा दाखवला, त्यामुळे आमचे काम अधिक सोपे झाले. आम्हाला फक्त धोनीच्या दिशेने चेंडू टाकायचा होता आणि आम्ही ते केले.’ धोनीच्या याच कल्पनेने भारताला पाकिस्तानवर मात करणे शक्य झाले होेते, असे उथप्पा म्हणला.

२००७ साली झालेल्या या पहिल्यावहिल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील गट फेरीतील लढतीत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ९ बाद १४१ धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानला शेवटच्या सहा चेंडूंत १२ धावांची आवश्यकता होती. डावातील शेवटच्या चेंडूवर अजित आगरकर व श्रीसंत यांनी मिळून मिसबाह उल हक याला धावबाद केले होेते. त्यामुळे आयसीसीच्या तत्कालीन नियमानुसार सामना बॉल आउटपर्यंत लांबला होता. यामध्ये भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला पराभूत केले होते.