सभापतींहस्ते ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

0
105

पणजी (सां. प्र.)
गोवा शासनाच्या समाज कल्याण खात्यातर्फे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन येथील फिदाल्गो हॉटेल सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर खात्याचे सचिव रमणमूर्ती, संचालक एस. व्ही. नाईक, उपसंचालक सांतान फर्नांडिस, साहाय्यक संचालक संजय गावडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनावर परिसंवादात उत्कृष्ट नारळ बागायतदार (शेतकरी) म्हणून पुरस्कार मिळालेले श्री हरी एस. एन. कुराडे (सांवरकट्टा-कुंकळ्ळी), तियात्रिस कॉज्मे रॉड्रीगीस उर्फ बाटू रॉड्रीगीस (चिंबल), इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठातर्फे गोवा प्रदेशासाठी सर्व शिक्षा अभियानासंदर्भात समुपदेशक म्हणून निवड झालेले सुरेश शिवराम कामत (गोवा वेल्हा), फादर आग्नेल निकेतन (अनाथाश्रम), पिलारसाठी काळजीवाहू म्हणून सेवा बजावलेले आंतोनिओ फ्रान्सिस्को झेवियर दा कुन्हा (आगशी), टेबल टेनिल, कॅरममध्ये चॅम्पियनशीप मिळविलेले व लेखा खात्यातून संयुक्त संचालक म्हणून निवृत्त झालेले रामचंद्र एस. एस. वागळे (पणजी), समाजसेविका इस्पेरन्स रॉड्रीगीस (चोडण), निवृत्त सरकारी कर्मचारी लुईस जोज दॉर रेमिडियस मोंतेरो (पर्रा, राष्ट्रपतींकडून पुरस्कार लाभलेले उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त शिक्षक विलास सुर्लकर (काणका-म्हापसा), निवृत्त बँक मॅनेजर व कला गौरव पुरस्कार प्राप्त नाट्य कलाकार प्रमोद हरी पै धुंगट (वेरे-बार्देस), निवृत्त सरकारी कर्मचारी व समाज कार्यकर्ता बाबला टी गावकर (धुळेर-म्हापसा), शेतकरी, समाजसेविका नलिनी पांडुरंग नाईक (मडकई), निवृत्त परिचारिका तथा नर्सिंग टिचर म्हणून सेवा बजावलेल्या सविता बोडके (कवळे), निवृत्त शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक, नाट्यकलाकार श्रीधर गोकुळदास वेरेकर (फोंडा), वनौषधींचे ज्ञान असलेले शेतकरी शांताराम कृष्णा परब (मोपा-पेडणे), निवृत्त शिक्षक मधुकर यशवंत मठकर (पणसुले-धारबांदोडा), मोटर मॅकॅनिक तथा माजी सरपंच सुहास बी. नाईक (आमोणा) व फोर्कलिफ्ट ऑपरेटर व नाट्य कलाकार पांडुरंग अर्जुन कामत (विर्डी-साखळी) यांचा डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींच्यावतीने मनोगत व्यक्त करताना रामचंद्र वागळे यांनी सांगितले, की उतारवयात अशा प्रकारचे सन्मान ज्येष्ठ नागरिकांना राहिलेले आयुष्य जगायला स्फूर्ती देतील. सरकारने दीनदयाळ सारखी उत्तम आरोग्य विषयक योजना सुरू केली आहे. परंतु आपले प्रतिनिधी आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ देत नाहीत. डॉ. सावंत म्हणाले, वृद्धांना अनेकवेळा मुले, नातेवाईक उतारवयात आधार देत नाहीत अशावेळी वृद्धाश्रमाचाच आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर काही करता येईल का, याचा विचार केला जाईल.