सफर चोर्ला घाटाची!

0
96

– रश्मिता राजेंद्र सातोडकर (शिरोडवाडी-मुळगाव)

क्षणभर डोळे बंद केले आणि पूर्ण निसर्ग आपल्याला आयुष्याचा प्रवास करायला शिकवतो, याची जाणीव झाली. माझ्या बंद डोळ्यांना गरज होती ती भावनिक सुखाची. उघड्या डोळ्यांना वरवरचं दिसतं, पण… बंद डोळ्यांना भावना समजतात. ते क्षण अवर्णनीयच राहतील आणि या गोड आठवणी बंद डोळे आयुष्यभर अनुभवतील!!

आपला गोवा भौगोलिकदृष्ट्या आकाराने जरी लहान असला तरी आपल्या गोमंतभूमीला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेला आपला गोवा बारमाही पर्यटकांना खुणावत असतो. पण खरे-खुरे सौंदर्य खुलून येते ते पावसाळ्याच्या दिवसांतच! निसर्गाचा विचार केला की चटकन् डोळ्यासमोर चित्र येते ते म्हणजे हिरव्या रंगाची शाल ओढून, रंगीत फुलांच्या नक्षी काढून, निळे नभ डोक्यावर छत्रीसारखे घेऊन मोठ्या थाटात उभे असणारे घनदाट जंगल! मानवी मनाला तृप्त करणारा हा निसर्गरम्य चोर्ला घाट आणि चोर्ला घाटातील प्रत्येक वेळीची सफर काही वेगळीच मजा देत असते. चांदण्यांच्या प्रकाशात संपूर्ण जंगलाचे पदभ्रमण करण्याची एक वेगळीच मजा असते. अंधारात पावलांवर पावले टाकून धीटपणे, कोणतीही भीती न बाळगता प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत-करत पुढे जाणे याहून आनंददायी दुसरी कुठलीच गोष्ट नसेल!
हवेत मस्त गारवा पसरलेला, अंधुकसं धुकं होतं. अंधार पसरला होता आणि या अशा रमणीय ठिकाणी नेहमीच जाऊन थोडे क्षण घालवावेत असा मोह! गेली चार वर्षे मी राजेंद्र केरकर सरांसोबत आणि समृद्धीसोबत जाऊन तिथला निसर्ग अनुभवीत आहे. उष्ण-उन्हाच्या झळा लागून संपूर्ण निसर्ग स्वतःचं तेजच जणु हरवून बसला होता. पावसाचा स्पर्श अद्यापही धरतीला झाला नव्हता. पण त्यादिवशी काळे ढग एकत्र आले नि कोरड्या धरतीचा लवलेशही मागे न ठेवता सर्वत्र हिरवळ पसरली. या सुमुहूर्तावर आम्ही सह्याद्रीच्या रांगेत प्रवास करत होतो. चांदण्यांचा मंद मंद प्रकाश, ते थंडगार वातावरण, शांत… बेधुंद… अगदी गाण्यातील संगीत वाजावे तसे! या सर्वांचा मिलाफ एवढा मोहविणारा होता की निसर्ग सोडून आणि कसलाच विचार मनात डोकावत नव्हता. सह्याद्रीच्या निसर्गाला स्वतःच्या कवेत आपलंसं करून हृदयाच्या खोल कुपीत हा निसर्ग लपवून ठेवावा असा तो प्रसंग होता!
निसर्ग ही दैवाधीन देणगी आहे आणि सह्याद्रीचा पर्वत हा गोमंतकियांना लाभलेलं व निसर्गाने बहाल केलेलं एक नवलच आहे, असं म्हणावं लागेल. तसेच या संपत्तीत आढळणारे जीव-जंतू, पक्षी-झाडे-प्राणी हा तर लाभलेला खजिनाच आहे. पश्‍चिम घाटात सापडणारे ‘मलाबार ग्लाईडिंग फ्रॉग’ हे बेडूक या भागातील महत्त्वाचा घटक मानलेला आहे. हे बेडूक आपलं स्वतःचं घरटं सात ते आठ फुटाच्या अंतरावर पाण्याच्या फेसाच्या सहाय्याने तयार करत असतात. ते घरटं एवढं प्रभावीपणे ते बनवत असतात की बघणारे बघतच राहतात. कारण घरट्यापेक्षा फेसच लोंबकळत असतो. हिरव्यागार बेडकाला शोधावंच लागतं कारण हिरव्या पानांमध्ये आणि त्याच्यात काही फरकच दिसत नाही. त्याचबरोबर ‘टेरन्टू’ला स्पाईडरचं विलोभनीय दर्शन झालं. बघायला अतिशय सुंदर.. अंगावर लुसलुशीत बारीक मऊ केस.. अगदी शोभेसाठी ठेवलेला जसा! लक्ष वेधून घेणारे हे दोन वेगवेगळे घटक! किती श्रीमंत आहोत आम्ही असंच वाटत राहतं मनाला. आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं सुख यापेक्षा आणखीन कोणतं असेल..!
हिरवीगर्द वनराई आसुसलेल्या मनाला भुरळ घालते. वाट चालत असतानाच मागे वळून पाहिलं तर सह्याद्रीच्या रांगा पाहून मन तृप्त झालं. क्षणभर डोळे बंद केले आणि पूर्ण निसर्ग आपल्याला आयुष्याचा प्रवास करायला शिकवतो, याची जाणीव झाली. माझ्या बंद डोळ्यांना गरज होती ती भावनिक सुखाची. उघड्या डोळ्यांना वरवरचं दिसतं, पण… बंद डोळ्यांना भावना समजतात. ते क्षण अवर्णनीयच राहतील आणि या गोड आठवणी बंद डोळे आयुष्यभर अनुभवतील!!