सप्टेंबरपासून राज्यातील ड्रायव्हींग स्कुलांची तपासणी

0
98

वाहतूक खात्याकडून सप्टेंबरपासून राज्यातील १३५ मोटर ड्रायव्हींग स्कुलांची इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) गुडगाव, हरयाणा या संस्थेकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.

वाहतूक खात्याने राज्यातील वाहन चालविण्याचा परवाना घेणार्‍या नागरिकांना दर्जात्मक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना वाहतूक नियमांबाबत योग्य माहिती दिल्यास बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण येऊ शकते असा दावा वाहतूक खात्याने केला आहे.

रस्ता सुरक्षा संकल्पनेची प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी मोटर ड्रायव्हींग स्कुलांची तपासणी केली जाणार आहे. मोटर वाहन कायदा व नियमांची सर्व ड्रायव्हींग स्कुलांकडून पूर्ततेसंबंधी आढावा घेतला जाणार आहे. आवश्यक नियमांची पूर्तता न करणार्‍या स्कुलांवर कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी ड्रायव्हींग स्कुलाची मान्यता रद्द केली जाऊ शकते.

काही ड्रायव्हींग स्कुलांकडून योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जात नसल्याचे आढळून आले आहे. कमी दर्जाच्या वाहन प्रशिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घेतली जाणार आहे. नागरिकांना दर्जात्मक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. या तपासणीनंतर ड्रायव्हींग स्कुलांचा दर्जा वाढविण्याची सूचना केली जाण्याची शक्यता आहे. तसेच दर्जात्मक प्रशिक्षण देणार्‍या स्कुलांची योग्य दखल घेतली जाणार आहे.