सन्मान रसिक व्यक्तिमत्त्वाचा

0
130

– पद्मजा फेणाणी-जोगळेकर, ज्येष्ठ गायिका
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं जाहीर झालं आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू! त्यांचा वाढदिवस साजरा होण्याला एक दिवस शिल्लक असताना त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस आधी त्यांना मिळालेली ही अमूल्य भेट आहे, असं मी मानते. वाजपेयीजी खरोखरच भारतरत्न या बहुमानास पात्र आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या रूपाने भारताला एक रत्नच मिळालं आहे, असं म्हणावं लागेल. अत्यंत मृदू स्वभाव, संवेदनशील कवी असणार्‍या त्याचबरोबर युद्धविहिन विश्वाचं स्वप्न पाहणार्‍या अटलजींसारख्या थोर माणसाला हा सन्मान प्राप्त होणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या, त्यांची भक्ती करणार्‍या, त्यांच्याविषयी आदर असणार्‍या प्रत्येकाला या गोष्टीमुळे आनंद होणं स्वाभाविक आहे. वाजपेयी यांच्या ‘मेरी इकावन्न कविताए’मधील कवितांचं गायन मी केलं हे माझं ङ्गार मोठं भाग्य आहे. यातील ‘गीत नया गाता हू’ या कवितेतील काही शब्दांनी मला वेड लावलं, त्या शब्दांनी माझ्यावर मोहिनी केली. ते शब्द असे आहेत…हार नही मानुंगा
रार नही ठानुंगा
काल के कपालपर लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ
त्यांचे हे शब्द पुढच्या पिढीला विश्वास, प्रेरणा देणारे आहेत. अशा शब्दांमुळे पुढच्या पिढीतील लोकांमध्ये आशावाद निर्माण होईल. काही झालं तरी मी हार मानणार नाही, असं या कवितेच्या ओळींमधून वाजपेयी सुचवतात. त्यांच्या या आशावादाला, त्यांच्यातील ऊर्जेला, तडफदारपणाला सलाम! आणखी एका कवितेत वाजपेयी म्हणतात,
जंग न होने देंगे
रुसी बम हो या अमेरिकी
खुन एक बहना है
जो हम पर गुजरी
बच्चो के संग न होने देंगे
अशा ओळींमधून मानवतावादी दृष्टीकोन ठेवणारा हा माणूस आहे हे दिसून येते. अशा माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला हे योग्यच झालं. किंबहुना त्यामुळे या पुरस्काराचाही गौरव झाला आहे. वाजपेयी हे अशाच उंचीचे आहेत. त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांचा आचार या सार्‍याला वंदन करावं असं आहे. भारतरत्न बहुमानामुळे त्यांच्या अशा गुणांचाही गौरव झाला आहे. त्यांना जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार प्रत्येक भारतीयाला आनंद व्हावा असा आहे.
वाजपेयी यांच्या अनेक कविता गाण्याचं भाग्य मला लाभलं याचा नेहमीच अभिमान वाटतो. संगीत, साहित्य यांची उत्तम जाण असणार्‍या या व्यक्तीबरोबर छान गप्पा मारण्याचाही योग अनेकदा आला. त्यांंचं प्रेम, आशीर्वाद मला लाभले ही फार भाग्याची गोष्ट आहे. त्यांची आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच मी त्यांना भेटून आले. त्या वेळी त्यांनाही आनंद झाला होता. माझ्यासाठीही तो आनंदाचा दिवस होता.
त्यांना भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर, त्यांच्या डोळ्यांमध्ये जो आनंद दिसला त्यामुळे मलाही भरुन आलं. त्यांच्या जवळ असणारे लोक मला म्हणाले की, ‘आज हमारे साब खुश हुए|’ मलाही ते ऐकून खूप बरं वाटलं. वाजपेयी यांच्याविषयीच्या अनेक आठवणी माझ्या मनात रेंगाळत आहेत. त्यातील प्रत्येक आठवण मोलाची आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात नऊ तारखेला क्रांतीदिन साजरा केला जातो. १९९७ मध्ये या दिवशी वाजपेयी हे मुंबईत आले होते. त्यावेळी ते तत्कालीन उपमुख्यमंत्री असणार्‍या गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी राहिले होते. त्यावेळी मी त्यांना भेटले. तेव्हा त्यांच्या काही कविता मी त्यांना गाऊन ऐकवल्या. ते ऐकून वाजपेयी यांना अपार आनंद झाला. ते म्हणाले, ‘मैं मुक्तछंद में लिखता हू| फीर भी तुमने वो गाया है| मैं बहुत खुश हुआ|’ असं म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या नंतर ते म्हणाले, ‘ये तालियॉं कविता के लिए नही, बल्की तुम्हारे सुरोें के लिए है|’ असा हा विनम्र स्वभावाचा, दुसर्‍यांना दाद देणारा माणूस आहे. दिल्लीला कार्यक्रमाच्या किंवा इतर काही कामानिमित्ताने गेले की वाजपेयी यांची भेट मी आवर्जून घेते. त्यामुळे आमच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. त्या प्रत्येक भेटीत त्यांच्यातील रसिक, संवेदनाशील माणूस मला जाणवत राहिला.
अतिशय डाऊन टू अर्थ असा हा माणूस आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘मेरे प्रभु, मुझे इतनी उँचाइया मत देना के गैरोंको गले लगा ना सकू, इतनी रुखाई कभी मत देना|’
माणसाचे पाय किती धरतीवर असावेत याचं वाजपेयी हे सुंदर उदाहरण आहेत. असं व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवण्याचा योग आला ही फार भाग्याची गोष्ट आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी सुमित्रा महाजन केंद्रीय मंत्रीपदावर होत्या. त्यावेळी व्हीडिओ कॉन्ङ्गरन्सद्वारे त्यांना माझ्या गाण्याची सीडी ऐकवली होती. वाजपेयी यांनी ती ऐकली आणि ते म्हणाले, ‘ऐसी शरारत पद्मजाही कर सकती है|’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, रसिकतेने आणि गुणांनी मी नेहमीच भारावून गेले.
त्यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, गुणांविषयी बोलायचं झालं तर शब्दही कमी पडतील. त्यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याचं ऐकलं आणि त्यांचा सारा जीवनपट माझ्या डोळ्यासमोरुन सरकायला लागला. या माणसाने आपल्या आयुष्यात जे केलं त्याला तोड नाही. केवळ स्वत:चा विचार न करता त्यांनी जनसामान्यांचा विचार केला. भारतरत्नच्या निमित्ताने त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देता आला हे मी माझं भाग्य समजते.