सनरायझर्स हैदराबादसमोर आज चेन्नईचे आव्हान

0
110

>> आयपीएल क्वॉलिफायर-१

इंडियन प्रीमियर लीगच्या क्वॉलिफायर व एलिमिनेटर लढती कोणा-कोणामध्ये होणार आहे हे आता निश्‍चित झालेले आहे. त्यात आज पहिल्या दोन स्थानांवर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढ्य संघात क्वॉलिफायर-१ सामना होणार आहे.

सनरायझर्स हैदाराबाद संघाने यंदा गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविलेले असून चेन्नई सुपर किंग्ज संघ दुसर्‍या स्थानी राहिला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी १८ गुण मिळविले आहेत. परंतु सरस धावसरासरीमुळे हैदराबाद संघ अव्वल स्थानी राहिला आहे. आज होणार्‍या सामन्यांत विजय मिळविणारा संघ थेट २७ मे रोजी होणार्‍या मुबईच्या वानखेडे स्टेडियमवरील अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघ क्वॉलिफायर-२ मध्ये २५ मे रोजी कोलकातामध्ये लढणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद सध्या कर्णधार केन विल्यमसनवर अवलंबून आहे. केनने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी केली असून त्याने आतापर्यंत ६६१ धावा बनविल्या आहेत. त्यानंतर शिखर धवनने आपली लय राखताना ४३७ धावा बनविल्या आहेत. परंतु मध्य फळतील खेळाडूंनीही आपली जबाबदारी ओळखून खेळी केली पाहिजे. विशेषतः मनीष पांडेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीच्या विभागात भुवनेश्वर कुमार. सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा या दु्रतगती गोलंदाजांना अफगाणि फिरकीपटू रशिद खान व बांगलादेशी शाकिब अल हसन यांची चांगली साथ मिळाली तर हैदराबादी संघ चेन्नईवर भारी पडू शकतो.

दुसर्‍या बाजूने महेंद्रसिंह धोनीच्या कल्पक नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई संघाने अपेक्षेप्रमाणे क्वॉलिफायर १मध्ये प्रवेश मिळविला आहे. गेल्या सहा सामन्यांत त्यांच्यासाठी एक विशेष बाब ठरलीय ती म्हणजे हा संघ कोणत्या एकट्या-दुकट्या खेळाडूवर अवलंबून नाही हे दिसून आले आहे. सध्या त्यांचा अंबाती रायडू चांगल्या लयीत आहे. आतापर्यंत त्याने ५८६ धावा बनविल्या असून सर्वाधिक धावा बनविणार्‍यांच्या यादीत तो अव्वल ५ फलंदाजांत आहे. ऑस्ट्रेलियन निवत्त खेळाडू शेन वॉटसननेही (४३८ धावा) चमकदार कामगिरी केलेली आहे. कर्णधार धोनी बरोबरच सुरेश रैनाही उपयुक्त खेळी करीत आहे. रैनाने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या गेल्या लढतीत नाबाद ६१ धावा केल्या होत्या.

गोलंदाजीचा विचार केल्यास युवा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज लुंगी एन्गिडीने सूर मिळविलेला असून गेल्या सामन्यात केवळ १० धावा देत ४ बळी मिळवित सामनावीर पुरस्कार प्राप्त केला होता. शार्दुल ठाकुर, दीपर चहर व ड्‌वायन ब्राव्हो या द्रुतगती गोलंदाजांना हरभजन सिंग आणि रविंद्र जडेजा यांची चांगली साथ लाभत आहे.
या सामन्यापूर्वी महिला संघांमध्ये दु. २ वा. प्रदर्शनीय सामना हाणार आहे.
संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः चेन्नई सुपर किंग्ज ः महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ डु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वायन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायडू, दीपक चहर, के. एम. आसिफ, कनिश सेथ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरी, मुरली विजय, सॅब बिलिंग्स, मार्क वूड, क्षतिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिस्नोई, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकुर, एन जगदीशन, डेव्हिड विली.
सनरायझर्स हैदाराबाद ः केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृध्दिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बाझिल थंपी, टी नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अग्रवाल, आलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.