सनरायझर्सकडून केकेआरचा ९ गड्यांनी पराभव

0
69

>> खलिलचा भेदक मारा

>> वॉर्नर- बॅअरस्टोव जोडी चमकली

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर काल रविवारी एकतर्फी मात केली. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले १६० धावांचे लक्ष्य हैदराबादने १५ षटकांत केवळ १ गडी गमावून गाठले. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफच्या शर्यतीतीत आपले आव्हान कायम राखले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ३८वा सामना उप्पल हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला.

डेव्हिड-जॉनी जोडीने पहिल्या यष्टीसाठी १३१ धावांची भागीदारी रचली. या खेळीदरम्यान उभय खेळाडूंनी आपापली अर्धशतके साजरी केली. डेव्हिड वॉर्नर ६७ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यंदाच्या आयपीएलमधील त्याचे हे सहावे व एकूण ४२वे आयपीएल अर्धशतक ठरले. बॅअरस्टोवने नाबाद ८० धावांची खेळी केली. आपला पहिलाच आयपीएल मोसम खेळत असलेल्या बॅअरस्टोवचे हे दुसरे आयपीएल अर्धशतक आहे. त्याच्या नावावर एक शतकही आहे. कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र क्षेत्ररक्षकांनी गचाळ कामगिरी करत गोलंदाजांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचे काम केले. कोलकात्याच्या खेळाडूंनी हैदराबादच्या सलामी जोडीला बाद करण्याच्या अनेक सोप्या संधी वाया घालविल्या. कोलकात्याकडून पृथ्वीराजने एकमेव बळी घेतला.
तत्पूर्वी, ख्रिस लिनचे संयमी अर्धशतक (५१) आणि सुनील नारायण (२५) व रिंकू सिंग (३०) यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकात ८ बाद १५९ धावा फलकावर लगावल्या. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. तडाखेबाज सुरुवात केलेला कोलकाताचा सलामीवीर सुनील नरायण
याला खलिल अहमदने अत्यंत चतुराईने त्रिफळाचीत केले. फटकेबाजी करण्याच्या नादात नारायणला खलिलचा ‘स्लोअर वन’ समजला नाही व त्याची डावी यष्टी वाकली. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत २५ धावा केल्या. केवळ २.४ षटकांत ४२ धावांची सलामी मिळूनही कोलकाताची मधली फळी याचा लाभ घेऊ शकली नाही.
यानंतर, फलंदाजी क्रमवारीत बढती मिळालेला शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. खलिलच्या चेंडूवर बेजबाबदार फटका खेळून त्याने विजय शंकरला सोपा झेल दिला. त्याने केवळ ३ धावांचे योगदिन दिले. गेल्या सामन्यात तुफानी खेळी करणारा नितीश राणा या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला. भुवनेश्‍वर कुमारचा एक अतिरिक्त उसळी मिळालेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्याच्या पतनास कारणीभूत ठरला. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हा चोरटी धाव घेताना धावचीत झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. त्याने ४ चेंडूत केवळ ६ धावा केल्या. रॉबिन उथप्पाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिंकू सिंगने ३० धावांची छोटेखानी खेळी केली. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर राशिदने खानने त्याची खेळी संपवली.

दुसर्‍या बाजूला सलामीला आलेला ख्रिस लिन संयमी अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसेलला प्रथमच अपयशाचा सामना करावा लागला. त्याला केवळ १५ धावांचीच भर घालता आली. दोन षटकार ठोकून त्याने सुरुवात चांगली केली होती. परंतु, मोठा फटता खेळण्याच्या नादात ‘डीप स्क्वेअर लेग’ला सीमारेषेवर राशिद खान याने त्याचा झेल घेतला. पीयुष चावलादेखील चांगली खेळी करू शकला नाही. अखेर करिअप्पाने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत कोलकाताला १५९ धावांचा टप्पा गाठून दिला.

कोलकाताने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल करताना अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा, चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव व वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांना वगळताना मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंग, मिस्टरी स्पिनर केसी करिअप्पा व आंध्र प्रदेशचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आर. पृथ्वी राज यांना संधी दिली. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्सवर धमाकेदार विजय मिळविलेल्या आपल्या संघात सनरायझर्स हैदराबादने कोणताही बदल केला नाही.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन झे. विल्यमसन गो. खलिल ५१, सुनील नारायण त्रि. गो. खलिल २५, शुभमन गिल झे. शंकर गो. खलिल ३, नितीश राणा झे. बॅअरस्टोव गो. भुवनेश्‍वर ११, दिनेश कार्तिक धावबाद ६, रिंकू सिंग झे. राशिद गो. संदीप ३०, आंद्रे रसेल झे. राशिद गो. भुवनेश्‍वर १५, पीयुष चावला झे. बॅअरस्टोव गो. राशिद ४, पृथ्वी राज नाबाद ०, कोंगाडा करिअप्पा नाबाद ९, अवांतर ५, एकूण २० षटकांत ८ बाद १५९
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-३५-२, शहाबाज नदीम ४-०-३०-०, खलिल अहमद ४-०-३३-३, संदीप शर्मा ४-०-३७-१, राशिद खान ४-०-२३-१
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. पृथ्वी राज ६७, जॉनी बॅअरस्टोव नाबाद ८०, केन विल्यमसन नाबाद ८, अवांतर ६, एकूण १५ षटकांत १ बाद १६१
गोलंदाजी ः हॅरी गर्नी २-०-१६-०, पृथ्वी राज ३-०-२९-१, पीयुष चावला ३-०-३८-०, सुनील नारायण ४-०-३४-०, कोंगाडा करिअप्पा २-०-३४-०, आंद्रे रसेल १-०-८-०