सत्य उजेडात

0
100

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्याच असल्याच्या निष्कर्षाप्रत येण्यास दिल्ली पोलिसांना एक वर्ष लागले. गेल्या वर्षी सतरा जानेवारीला सुनंदा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या आधल्याच दिवशी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि सुनंदा यांच्यात ट्वीटरयुद्ध झडले होते. आपले पती शशी थरूर यांनी मेहरशी सुत जुळवले असल्याचा संशय सुनंदा यांना होता. त्यातून त्यांचे वैवाहिक संबंध बिघडले होते. मृत्यूच्या आधल्या रात्री पुष्कर व थरूर यांचे हॉटेलातच कडाक्याचे भांडण झाले होते. पुष्कर यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यावर चौदा – पंधरा जखमा होत्या. त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर चावा घेतल्याची खूण होती. एवढे सगळे परिस्थितीजन्य पुरावे असूनही तेव्हा शशी थरूर हे फार बडे प्रस्थ असल्याने त्यांच्याकडे संशयाचे बोटही पोलिसांकडून दाखवले गेले नाही. सुनंदा निधन पावल्या त्याच दुपारी त्यांनी स्वतःहून ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंग यांना फोन करून आपली वैवाहिक व्यथा मांडली होती. त्यांचे एकंदर व्यक्तिमत्त्व पाहिले तर आत्महत्या करण्याएवढ्या त्या दुबळ्या मनाच्या नव्हत्या असे नलिनी सिंग सांगत आल्या, परंतु तरीही गेल्या सरकारच्या काळात पोलिसांनी या तपासकामाला आत्महत्येचाच रंग दिला. या प्रकरणात काळेबेरे असल्याच्या अनुषंगाने तपास झाला नाही. शेवटी सरकार बदलले आणि परिस्थिती पालटली. ज्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानामध्ये सुनंदा यांची शवचिकित्सा झाली, तेथील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुनंदा यांच्या मृत्यूचा अहवाल बदलण्यासाठी आपल्यावर फार मोठा दबाव आणला गेला होता असे यावर्षी स्पष्ट सांगितले. मात्र, शशी थरूर मोदी सरकारची तारीफ करीत राहिले. पण नव्या सरकारने सुनंदा पुष्कर प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले आणि आणि त्यातून त्यांची हत्याच झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. या सर्व प्रकरणात आता संशयाची सुई पहिल्यांदा थरूर यांच्याकडे वळेल. मेहर तरार यांच्यामुळे सुनंदा आणि त्यांचे विकोपाला गेलेले वैवाहिक संबंध, घराच्या रंगरंगोटीच्या मिशाने हॉटेलमध्ये राहायला जाणे, तेथे आधल्या रात्री झालेले कडाक्याचे भांडण, सुनंदा यांच्या अंगावरील जखमांच्या खुणा या सार्‍यांबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येते. पुष्कर यांच्या मृत्यूच्या घटनेला आता येत्या १७ जानेवारीस वर्ष पूर्ण होईल. या दरम्यानच्या काळात अनेक महत्त्वाचे पुरावे कायमचे पडद्याआड गेले असतील. त्यामुळे या हत्या प्रकरणातील दोषींपर्यंत पोहोचणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करणे हे पोलिसांसाठी अत्यंत अवघड बनलेले आहे. या प्रकरणाच्या तपासकामाला केवळ आत्महत्येचे जे वळण सुरवातीपासून दिले गेले, त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न खरे तर व्हायला हवा. अत्यंत संशयास्पद परिस्थितीत सुनंदा यांचा मृतदेह आढळूनही आत्महत्या मानून त्यावर पडदा ओढण्याचे काम ज्या पोलीस अधिकार्‍यांनी केले, त्यांच्यावर कोणाचा वरून दबाव होता का, कोणी राजकीय दडपण आणले का या गोष्टीची चौकशी व्हायला हवी. या देशामध्ये सर्वसामान्यांना एक न्याय आणि अतिमहनीय व्यक्तींना मात्र दुसरा न्याय हीच परिस्थिती सर्रास दिसते. त्यामुळे सुनंदा पुष्कर प्रकरणातील सत्य बाहेर येणे आजही कठीणच आहे. परंतु निदान त्यांनी आत्महत्या केली नव्हती, तर त्यांची अतिशय पद्धतशीरपणे हत्या केली गेली एवढे सिद्ध झाले हेही नसे थोडके. सुनंदा यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांचे कुटुंबीय अगदी सुरूवातीपासून तत्कालीन सरकारच्या कानीकपाळी ओरडून सांगत आले होते. परंतु त्या अनुषंगाने जी चौकशी व्हायला हवी होती ती केली गेली नाही. या सार्‍या प्रकरणावर घाईघाईने पडदा ओढण्यात आला. परंतु सत्य कधी लपत नसते. खुनाला वाचा फुटल्यावाचून राहात नसते असे म्हणतात. सुनंदा यांच्या मृत्यूची कारणे हळूहळू का होईना उलगडू लागलेली आहेत. मात्र, ज्या व्यक्तीने एवढ्या पद्धतशीरपणे त्यांचा काटा काढला ती व्यक्ती कोण हे शोधण्याची नैतिक जबाबदारी आता तपास यंत्रणेवर आहे. कोणत्याही राजकीय दबाव, दडपणाला मध्ये न येऊ देता आता या प्रकरणाच्या अधिक खोलात जायला हवे. शेवटी खुनी हा खुनीच असतो. मग तो कोणी का असेना!