सत्यार्थींच्या पुरस्कार चोरट्यांना अटक

0
86

बाल हक्क कार्यकर्ते तथा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरातून नोबेल स्मृती चिन्हासह मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून नोबेल पुरस्काराची प्रतीकृती व अन्य वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र नोबेल स्मृती चिन्ह अद्याप सापडलेले नाही. गेल्या ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या येथील एका इमारतीतील फ्लॅटमधून वरील वस्तूंची चोरी झाली होती.

अटक करण्यात आलेले संशयित भाऊ असून त्यांची नावे राजन ऊर्फ नट्टा (२५), विनोद (३५) व सुनील (२८) अशी आहेत. घरफोडी, दरोडा अशा प्रकरणात याआधी ते गुंतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वेगवान हालचाली करून वस्तू ताब्यात घेतल्याबद्दल सत्यार्थी यांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांनी सत्यार्थी यांच्या या वस्तू प्रतिष्ठेच्या असल्याने आपल्याला चिंता होती असे सांगितले. या वस्तू थोड्याच अवधीत सापडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या दृष्टीने देशाची प्रतिष्ठा होते. त्यामुळे या शोध मोहीमेसाठी दहा तुकड्या गुंतविण्यात आल्याचे पटनाईक यांनी सांगितले.
चोरीची घटना घडली त्यावेळी सत्यार्थी हे अमेरिकेत होते. त्यांचे घर कुलुपबंद होते. चोरी झाल्याची माहिती त्यांचे सहकारी राकेश सेनगर यांनी पोलिसांना ७ रोजी सकाळी ९ वा. दिली. संशयितांनी दार फोडून आतील नोबेल पुरस्कारासह घरातील मौल्यवान दागिने चोरले.
संशयित मूळ उत्तर प्रदेशमधील असून सत्यार्थी राहत असलेल्या इमारतीनजीक झोपडपट्टीत ते राहत असत. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.