सत्ताकांक्षी मगो

0
111

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची गेली पावणे पाच वर्षे सत्तेत साथसोबत करीत आलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच आज भाजप विरोधात सर्वांत आक्रमकपणे येत्या निवडणुकीत उभा ठाकलेला दिसत आहे. हो, नाही करता करता गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेसारख्या समविचारी मंडळींना आपले पाठबळ देत मगोने या निवडणुकीत प्रथमच आपला राजकीय विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मगो पक्षाची गेली अनेक वर्षे ढवळीकर बंधू प्रा. लि. अशी हेटाळणी होत आली, परंतु यावेळी निवडणूक जाहीर होईपर्यंत भाजपाला गाफील ठेवून ऐनवेळी आपले पत्ते मगोने खोलले. अर्थात, याचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीवर किती होईल हा भाग अलाहिदा, परंतु गेल्या अनेक वर्षांत मगोने प्रथमच एवढा विस्तारवाद दाखवलेला दिसतो आहे. आजवर दोन – तीन मतदारसंघांपुरताच सीमित राहिलेला आणि त्यातच समाधानी राहणारा मगो पक्ष आज राज्यात सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहतो आहे आणि त्यासाठी नरेश सावळ, बाबू आजगावकर आदींना पक्षात घेऊन पक्षाने आपले सामर्थ्य वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालवला आहे. आजवरच्या निवडणुकांत प्रत्येकवेळी उगवत्या सूर्याची दिशा हेरून मगो आपली रणनीती आखत आला. कॉंग्रेसच्या बाजूने जनमत होते, तेव्हा मगोने कॉंग्रेसची साथ केली आणि सत्तासोबतही. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले तेव्हा मगोनेही वाहत्या वार्‍याचा पदर धरून भाजपाची साथसंगत केली आणि सत्तेत महत्त्वाची खाती स्वतःकडे कायम राखली. ही वाटचाल सुरळीतपणे चालली आहे असे वाटत असतानाच दोन्ही पक्षांनी एकमेकांना शह – काटशह देण्याचे अंतस्थ राजकारणही चालवले होते. या शीतयुद्धाचा स्फोटही अधूनमधून होत असे. दीपक ढवळीकर यांचे सहकार खाते काढून घेतले गेले तेव्हापासून तर या शीतयुद्धाला अधूनमधून जाहीर उकळ्याही फुटत होत्या. सत्तेत सहभागी असूनही एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी मगो नेत्यांनी दवडली नाही. विशेषतः फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यात अधिक मुखर होते. परंतु पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी आपले मौन सोडलेले नसल्याने उभय पक्षांतील हे मतभेद एका मर्यादेपर्यंतच राहतील असे वाटत होते, परंतु शेवटी फोंड्याच्या सभेत सुदिन यांनीही तोफ डागली आणि ताणलेले संबंध जवळजवळ संपुष्टात आले. दरम्यानच्या काळात सुभाष वेलिंगकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंड घडवून आणले आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. मगोने या सगळ्या वातावरणाचा अंदाज घेत सावधपणे पावले टाकली. एकीकडे भाजपाशी युतीची बोलणी लांबवत ठेवीत, दुसरीकडे अन्य पक्षांतील बंडखोरांना आकृष्ट करीत आणि तिसरीकडे वेलिंगकरांशीही नेत्रपल्लवी करीत मगोने आपली एकंदर भूमिका सतत संदिग्ध ठेवली. निवडणूक जाहीर झाल्यावरच आम्ही आमची भूमिका मांडू असे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर सांगत राहिले. त्यानुसार ऐन निवडणुकीच्या तोंडावर मगोने आता आपले पत्ते खोलले आहेत. राजकारण यालाच म्हणत असल्याने त्यात मगो नेत्यांना दोष देता येणार नाही, परंतु या सार्‍या घडामोडीचा परिणाम गोव्याच्या राजकारणावर कसा होईल हा मात्र चिंतेचा विषय आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष निवडणुकीत झोकात पुनरागमन करणार की मगो – गोसुमं युती त्यात पाय अडकवणार, या परिस्थितीचा फायदा कॉंग्रेस फायदा उपटणार की आम आदमी पक्ष आपले अस्तित्व दाखवणार. की इतर पक्ष संधी साधणार? प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरे अर्थातच मतदानयंत्रात दडलेली आहेत. परंतु आगामी राजकीय घडामोडींमध्ये मगो आपले महत्त्व प्रस्थापित करण्यामागे लागला आहे एवढे मात्र निश्‍चित आहे.