सत्तरीत सापडला मृतावस्थेत वाघ

0
160

>> हत्या झाल्याचा संशय

गोळावली सत्तरी येथे काल कुजलेल्या अवस्थेत पट्टेर वाघ सापडला. गोळावली गावापासून सुमारे दीड किमी अंतरावर सिद्धेश्‍वर देवस्थानकडे म्हादई अभयारण्य क्षेत्रात हा वाघ सापडला. सापडलेला वाघ हा चार वर्षे वयाचा होता. त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

त्याचा मुत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काल रविवारी सकाळी जेव्हा गोळावली गावातील लोक सिद्धेेश्वर देवाची वार्षिक भुगत घालण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना सदर वाघ दिसून आला. त्यानंतर त्याची माहिती वन विभागाला मिळताच डीसीएफ विकास देसाई व आरएफओ विलास गावस हे आपल्या पथकासह त्या ठिकाणी गेले असता त्यांना पट्टेरी वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. वन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तो आठ दिवसांपूर्वी मृत झालेला असावा. वाघाचा कशामुळे मुत्यु झाला यावर चिकित्सा आज करण्यात येणार आहे. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे.

म्हादई अभयारण्यात पाच वाघाचे अस्तित्व
म्हादई अभयारण्यात पाच वाघ असल्याचे वेळोवेऴी पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. पण पट्टेरी वाघ मारण्यात येत असल्याने वाघाची संख्या कमी होताना दिसत आहे.
दुर्दैवी घटना
सत्तरीत म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे. तरीही वाघ मरण्याची घटना ही दुर्देवी असल्याचे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

वाघ हत्येची दुसरी घटना

२००९ सालात एप्रिल महिन्यात केरी सत्तरी येथील वाड येर या डोगरात पट्टेरी वाघाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर साधारणपणे जुलै महिन्यात याचे अनेक पुरावे वन अधिकार्‍यांना सापडले होते. बंदुकीतील काडतुसे अधिकार्‍यांना सापडली होती. तसेच वाघाचे अनेक अवशेष व हाडेही सापडली होती. या प्रकरणी वन खात्याने कसून तपास करून काहींना त्यावेळी ताब्यातही घेतले होते. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.