सत्तरीत बंद पडणार्‍या १९ मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी शाळा संरक्षण अभियान

0
96

>> मराठी शाळांच्या रक्षणासाठी गोवा मराठी अकादमीचा पुढाकार

गोव्याच्या गावोगावी मराठी शाळा बंद पडत चालल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता या बंद पडणार्‍या सरकारी मराठी प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी गोवा सरकारच्याच गोवा मराठी अकादमीने प्रयत्न सुरू केले असून पहिल्या टप्प्यात सत्तरी तालुक्यातील यंदा बंद पडणार्‍या १९ मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘मराठी शाळा संरक्षण अभियान’ सुरू केले आहे.

सत्तरी तालुक्यातील जवळजवळ १९ मराठी प्राथमिक शाळा येत्या शैक्षणिक वर्षात पटसंख्येअभावी बंद पडणार आहेत. यासंबंधी पालकांनी गोवा मराठी अकादमीच्या सत्तरी तालुका समितीशी संपर्क साधताच समितीने त्यादृष्टीने पावले उचलली. या शाळा सुरू राहाव्यात, त्या बंद पडू नयेत यासाठी पालकांसाठी प्रबोधन मेळावे घेणे, शाळांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्यांच्या शिक्षकांसंबंधीच्या तक्रारींचे निवारण करणे, तसेच या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मुलांसाठी उपक्रम राबवणे अशी कामे मराठी अकादमीतर्फे हाती घेण्यात येणार आहेत.

मराठी शाळा संरक्षण अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षकांची एक बैठक नुकतीच वाळपईत घेण्यात आली. तालुक्यातील भागशिक्षणाधिकारी श्रीरंग बर्वे यांचेही या अभियानास सहकार्य लाभले आहे. जीआरपीएसएसचे अध्यक्ष प्रकाश गावकर, मराठी अकादमीच्या सत्तरी तालुका समितीचे उपाध्यक्ष प्रकाश गाडगीळ यांचीही या बैठकीस उपस्थिती होती. आपल्या मुलाला पाचवीत चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालक आपल्या मुलांना पूर्वप्राथमिक स्तरावरच इंग्रजी शाळेत घालतात असे अकादमीला दिसून आले आहे. त्यामुळे यासंदर्भात पालक जागृती करण्यासाठी अकादमी हे अभियान राबवणार आहे. यासाठी सत्तरी तालुक्यात एक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर पुढील उपाययोजना हाती घेतल्या जातील अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी दिली.