सत्तरीत गव्या रेड्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0
167

कणकीरे-सत्तरी येथे गव्या रेड्याच्या हल्यात काल सकाळी १०.३० वा. जयंती आनंद गांवकर (वय ४४) हिचा मृत्यू झाला. काजू बागायतीत काजूची रोपे लावण्यासाठी गेली असता गव्या रेड्याने हल्ला केला. तिच्याबरोबर काजू रोपे लावण्यासाठी गेलेल्या गोमती गावडे हिने दिलेल्या माहितीनुसार जयंती आणि आपण सकाळी दहा वाजता काजूची रोपे लावण्यासाठी गावाजवळच असलेल्या बागायतीत गेलो होतो. ती पुढे आणि आपण मागे डोक्यावर काजुची रोपे घेउन जात असताना समोरच गवा रेडा दिसला म्हणून जीव वाचविण्यासाठी जयंती पळत असताना गव्या रेड्याने तिच्यावर हल्ला केला. गव्या रेड्याने तिच्या पोटावर शिंगाने हल्ला केला व तिला उचलून फेकले व तेथून पळाला. त्यानंतर आपण तिला जखमी अवस्थेत नदीवर नेले व पाणी पाजले. नदीवर कपडे धुत असलेल्या महिलांना बोलावले. गावातील लोकांनी तिला उचलून नेत असताना तिचा मृत्यू झाला. वाळपई पोलीस निरिक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शना खाली पंचनामा केला.

गावात वातावरण तंग
जयंती हिच्या मृत्यूनंतर गावात वातावरण तंग झाले. गावातील लोकांनी वन अधिकार्‍याकडे गव्या रेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी गावातील लोकांच्या बागायती आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. लोक बागायतीत जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे गावातील लोकांनी गव्या रेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

गरीब कुटुंबावर आघात
जयंती हिच्या नवर्‍याचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर ती आपल्या ऐशी वर्षाची सासु व मुलांचा सांभाळ रोजंदारीवर काम करून करीत होती. आजही ती कामावर गेली होती. मोठा मुलगा अकरावीत. दुसरा आयटीआयत तर लहानाने मधेच शाळा सोडली. अत्यंत गरीबीत ती त्या तिघांना शिक्षण देत होती. पण जयंतीवर काळाने घाला घातला व त्या तिघांवरचे छत्रच हरवले. त्या तिघांना आता आधारच राहिला नसून आई वडीलांचे छत्र नसल्याने त्या तिघांच्या भवितव्या विषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

दिड लाखांपर्यत मदत
करणार ः दीपक बेतकेकर
कणकीरेतील घटना दुर्दैवी असून पुढील चार दिवस गावातील लोकांनी जंगलात जाऊ नये असा सल्ला फोंडाचे विभागीय वन अधिकारी दिपक बेतकेकर यांनी दिला. गव्या रेड्याचा ताबडतोब बंदोबस्त करणे कठीण आहे. पण त्यावर उपाय करण्यात येईल असे आश्वासन त्यानी दिले. अभयारण्य कायद्याप्रमाणे मयत जयंतीच्या कुटुंबाला दिड लाख रुपयांची मदत सरकारतर्फे देण्याचे आश्वासन बेतकेकर यांनी लोकांना दिले.
गव्या रेड्याचे दर्शन
गावातील लोक, वन अधिकारी, पोलीस व पत्रकार ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जात असताना हल्ला केलेल्या गव्या रेड्याने दर्शन दिले. त्यामुळे त्या रस्त्याने जाणार्‍या कोणावरही हल्ला करु शकतो अशी स्थिती आहे.