सत्तरीच्या जंगलात आम्ही वाघ पाहिला…

0
118

– जयदेव वि. जाधव, नागवे – सत्तरी
दिल्लीतील अभयारण्यात विजय नामक एका पांढर्‍या वाघाने नुकतीच एका युवकाची हत्या केली. खरे तर वाघ माणसांवर कधी हल्ला करीत नसतो. वाघ मुळात नरभक्षक नसतो, असे सांगतात. ते कदाचित खरे असावे, कारण याचा प्रत्यय हल्लीच मला आणि माझ्यासोबत सत्तरीच्या जंगलात पदभ्रमणास गेलेल्या काही युवकांना आला.गेल्या १७ ऑगस्टच्या रविवारी नागवे – सत्तरी येथील आम्ही काही युवक नागवे गावातील डोंगराळ भाग चढून गेलो होतो. नागवेच्या या डोंगरावर एक अद्भुत असे दगडी आसन निर्माण झाल्याचे अनेक युवकांनी आम्हाला सांगितले होते. ते स्वतः ते पाहून आले होते. ते दगडी आसन पाहायला इतके भयानक दिसते की सांगता सोय नाही, शिवाय ते स्थळ शोधूनही सापडत नाही असे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे मला ते ठिकाण पाहण्याची इच्छा होती, म्हणून आम्ही त्या दिवशी डोंगरावर गेलो होतो. मी, प्रदीप केरकर (नागवे), दिलीप केरकर (नागवे), दिनेश केरकर (नागवे), आयुष केरकर (केरी), राजन केरकर (केरी), दशरथ हरिजन (सावर्डे) आणि मी त्या ठिकाणी जाण्यास निघालो. परंतु वर डोंगरावर चढून गेल्यावर त्या अद्भुत आसनास भेट देण्यापूर्वीच काहींनी परत फिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्हाला परत येण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यामुळे आम्ही तेथून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास निघालो. नागवेच्या डोंगराळ प्रदेशातून एक ओहोळ वाहत गावात येतो. अनेक कडे कपारींतून त्याचे पाणी कोसळत असते. ते नैसर्गिक धबधबे पाहावेत म्हणून आम्ही बराच काळ चालत जाऊन जिथे वाट नाही तेथून डोंगराच्या कडे कपार्‍यांतून उतरत त्या ओहोळाच्या पाण्यात उतरलो. तो शुभ्र पाण्याचा खळखळाट पाहून आम्हाला त्यात आंघोळ करण्याचा मोह झाला. नंतर हळूहळू त्या ओहोळाच्याच पाण्यातून आम्ही खाली येण्यास निघालो. एके ठिकाणी वाटेत एक पाषाणी मूर्ती व घोड्याच्या तोंडाच्या मातीच्या मूर्ती त्या पाषाणी मूर्तीला अर्पण केल्याचे दिसले. त्या ठिकाणी कोणी तरी येऊन पूजा केली होती, तसेच डाळ, भात, भाजीचा नैवेद्यही दाखवला होता. त्यापूर्वीच होऊन गेलेल्या रक्षाबंधनाला (सुता पुनव) हा नैवेद्य दाखवला गेला असावा. पावसाळ्याचे दिवस असूनही एवढ्या डोंगरमाथ्यावर येऊन कोणी ही पूजा केली होती.
डोंगरात धड रस्ता नाहीच, पण साधी वाटही नव्हती. शिवाय पूर्वी कुमेरी शेतीमुळे डोंगर उजाड होत असत. त्यामुळे डोंगरावर येण्याजाण्यास वाट मिळत असे, पण आता संपूर्ण डोंगर झाडाझुडपांनी वेढल्याने पूर्वीच्या वाटा नाहिशा झाल्या.
शेवटी संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही माळरानावर येऊन पोहोचलो. आणखी अर्ध्या तासाने घरी येऊन पोहोचलो असतो इतके अंतर राहिले होते. एकामागून एक चालत येत असताना अचानक ओहोळाच्या बाजूलाच एका झुडुपातून एक वाघ अचानक उठला आणि ओहोळाच्या बाजूच्या दगडी कुंपणावरून उडी मारून ओहोळात उतरून आमच्या समोरून ऐटीत निघून गेला. वाघ तसा फार मोठा नव्हता. कदाचित तो वाघाचा बछडा असावा. पण साधारण कुत्र्याएवढ्या आकाराचा होता. आमच्या पुढे गेलेल्या युवकांना बघूनही त्याने हालचाल केली नाही. त्या मागोमाग आम्ही होतो. आम्हाला पाहून तो उठला आणि ओहोळात उडी घेतली. पुढे गेलेल्या युवकांना तो दिसला नाही. आम्हीही त्याला पाहिले नसते. तो झुडुपातून बाहेर आल्यामुळे आम्ही त्याला पाहिले. तो आमच्या समोरून जाताना त्याला अगदी दहा – वीस मीटर अंतरावरून पाहिले.
वाघ जिथे होता तेथून अगदी पन्नास मीटरवर पै. रशीद शेख यांच्या रबर प्लांटमध्ये फार्महाऊस आहे. याच फार्महाऊसमध्ये रघू नावाचा एक नोकर आपल्या बायको मुलांसह राहतो. मध्यरात्री उठून तो रबराच्या झाडांचा चीक काढायला सुरूवात करतो. ओहोळाच्या डाव्या बाजूला धनगर लोकांची वस्ती आहे. अशा या नागरी वस्तीच्या परिसरात वाघाने वास्तव्य करावे हे खरे तर गावात राहणार्‍या लोकांना धोकादायक आहे.
आमच्या वाटेच्या अगदी पाच दहा पावले दूर तो झुडपात जनावरांसाठी दबा धरून बसला होता. त्याने मनात आणले असते, तर आमच्यापैकी कोणा एकावर झडप घालून त्याने आमचा घात केला असता, पण वाघ सहसा माणसावर हल्ला करीत नाही.
आम्हाला त्याला जास्तवेळ निरखून पाहता आले नाही, कारण तो ओहोळातून चालत पलीकडे जाईपर्यंतच त्याला आम्ही पाहू शकलो. ही घटना एवढ्या गतीने घडली की त्या वाघाचा फोटो काढण्यासही कोणाला वेळ मिळाला नाही. तो आमच्यासमोरून निघून गेला, पण पळून गेला नाही. ऐटीत गेला. तो भीतीने पळून गेल्याचे आम्हाला जाणवले नाही. त्याचे शरीरही रुबाबदार वाटत होते.
माझ्या ५२ वर्षांच्या आयुष्यात मी कधी वाघ, सिंह, अस्वल किंवा गवारेडा जंगलात मोकळ्या जागेत संचार करीत असताना पाहिले नव्हते. केवळ सर्कशीत वा बोंडलासारख्या संग्रहालयात पाहिले होते. अगदी बालपणापासून मी केरीच्या जंगल परिसरात फिरलो आहेे. नागवे गावात आल्यानंतर येथील डोंगराळ परिसरातही येण्याजाण्याचा सराव आहे. पण कधी या जंगलात हिंस्र श्वापदे पाहिली नव्हती. पण नागवे गावचे लोक सांगतात की अलीकडे या गावात वाघाचा संचार वाढला आहे. त्याचे अस्तित्व अनेकांना दिसून येत आहे.
म्हावशी गावच्या काही लोकांची गुरे वाघाने मारून खाल्ल्याच्या बातम्या कानी येतात. म्हावशीच्या काही महिला नागवेच्या डोंगरात काही कामाला आल्या असता वाघाची डरकाळी ऐकून त्यांची गाळण उडाली होती. एकीची तर शुद्धच हरपली होती. कृष्णा केरकर याला त्याच्या जमिनीच्या परिसरात वाघाचे दोन बछडे दिसले होते. बाजूला वाघीण असेल याचे भान न राहता तो त्यांच्या हालचाली पाहण्यात दंग झाला. त्याच्या घरच्यांनी त्याला हाका मारून बोलवून घेतल्यावर तो भानावर आला.
काही वर्षांपूर्वी विष्णू जाधव यांच्या जमिनीच्या परिसरात वाघांचा संचार होत असल्याचे आढळले होते. त्यांच्या जुन्या घराच्या शेजारी रात्री एक वाघ दिसल्याचे त्यांची पत्नी नयन हिने सांगितले होते. अविनाश जाधव हा रात्री मोटारसायकलने नागवे गावात येत असता विष्णू जाधव यांच्या घरासमोर रस्त्यावर त्याला वाघ आढळला होता. मोटारसायकलच्या उजेडामुळे त्याने विष्णू जाधवच्या काजू बागायतीत उडी घेतली होती. असेच एकदा आम्हाला रस्त्यात दोन गवेरेडे दिसले होते.
हे सर्व सांगण्याचा मुद्दा म्हणजे नागवे येथे जेव्हा आमच्या समोरून वाघ गेला तेव्हा आम्हाला त्याची भीती वाटली नाही. एक जंगली श्वापद समोरून गेले एवढाच विचार आम्ही त्यावेळी केला. दिल्लीतील अभयारण्यातील २३ सप्टेंबरच्या ‘त्या’ घटनेने मात्र सारा देश हादरला. आम्ही ते दृश्य टीव्हीवर पाहिले आणि हादरलोच! १७ ऑगस्टला तसा प्रसंग आमच्यापैकी कोणावर आला असता तर?
वाघ माणसावर उगाच हल्ला नाही करत. पण त्याला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोठे धाडस करून कोणी वाघासमोर राहण्याचा प्रयत्न करू नये. तसे धाडस केल्यास काय घडते हे दिल्लीतील त्या अभयारण्यात दिसले. दिल्लीतील त्या युवकाने नको ते साहस करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा जीव गमावून बसला.