सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे डिचोलीतील ४५ उद्योग संकटात

0
69

डिचोली (न. प्र.)
डिचालीतील औद्योगिक वसाहतीतील सुमारे ४५ उद्योजक व त्यांची आस्थापने सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे संकटात सापडली आहेत. गेल अनेक महिन्यांपासून रोज सातत्याने दिवसातून १२ ते १५ वेळा वीज गायब होते. त्यामुळे कारखाने तसेच उद्योजकांना बिकट संकटांचा सामना कारावा लागत आहे.
काल शनिवारी सुमारे २५ उद्योजकांनी डिचोली वीज कार्यालयात धडक देऊन वीज समस्येबाबत अभियंते दीपक गावस यांना या खंडित वीजेचे नेमके कारण विचारले.
दर दिवशी वीज अनेक वेळा गायब होत असल्याने आमचे उद्योग संकटात आले असून तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करा अशी मागणी राजेंद्र नाईक, अरुण नाईक, भगवान हरमलकर, मिलिंद मराठे, निखिल दीक्षित, जगदीश बांदिवडेकर, साहिल कामत, हार्दिक कार्या, बनमाळी कोरणी, आनंद कुलकर्णी व इतर उद्योजकांनी केली.
दरम्यान, या याप्रश्नी वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याशी भगवान हरमलकर यांनी संपर्क साधून व्यथा मांडली, यावेळी वीजमंत्र्यांनी या प्रश्‍नावर सोमवारी चर्चा करण्यासाठी पणजीत बोलावले आहे. यावेळी तोडगा काढू असे सांगितल्याचे श्री. हरमलकर यांनी सांगितले.
दरम्यान अभियंते गावास यांनी उद्योजकांच्या समस्या शांतपणे समजून घेतल्या व वीज खात्याचे वरिष्ठ अभियंत्यांना याबाबत फोन करून कल्पना दिली. सदर प्रश्नी गुरुवारी संयुक्त बैठक घेऊन समस्येबाबत चर्चा करण्याचे ठरवण्यात आले.
यापूर्वी उद्योगमंत्री पांडुरंग मंडकईकर यांनी या ठिकाणी भेट देऊन खूप मोठी आश्वासने दिली होती. मात्र एक टक्काही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार केवळ पोकळ आश्वासने देत असल्याचे सिद्ध झाले असून आता गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्योजकांनी घेतला. याबाबत लवकरच नवे वीजमंत्री काब्राल यांची भेट घेऊन वीज खात्यातील या कारभाराची माहिती देणार असल्याचे भगवान हरमलकर यांनी सांगितले.