सणांची राजाराणी दीपावली

0
379

– प्रा. रमेश सप्रे

 

अनेक छोट्यामोठ्या सणांचा समूह म्हणजे दिवाळी. एका दिव्याची दीपावली होत नाही. ‘आवली’ म्हणजे ओळ किंवा रांग. यासाठी अनेक दिवे पेटवावे लागतात. तसेच हे एकामागून एक येणारे सण. निरनिराळ्या राज्यांतले लोक निरनिराळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. पद्धती विविध पण सण एकच. हीच आपल्या संस्कृतीची विशेषतः आहे. विविधतेतील एकता… अनेकतेतली एकता!अनेक छोट्यामोठ्या सणांचा समूह म्हणजे दिवाळी. एका दिव्याची दीपावली होत नाही. ‘आवली’ म्हणजे ओळ किंवा रांग. यासाठी अनेक दिवे पेटवावे लागतात. तसेच हे एकामागून एक येणारे सण. निरनिराळ्या राज्यांतले लोक निरनिराळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. पद्धती विविध पण सण एकच. हीच आपल्या संस्कृतीची विशेषतः आहे. विविधतेतील एकता… अनेकतेतली एकता!

तेजस-तेजश्रीचा संवाद आजोबा कौतुकानं ऐकत होते. ही तशी जुळी भावंडं. अनेक गोष्टी दोघांच्या शरीर-मनात अगदी समान. पण विचार-भावना-कल्पना बर्‍याच वेळी एकच असल्या तरी त्यांना व्यक्त करताना काहीसा फरक जाणवतो. पण हा फरक अनेकदा हृदयस्पर्शी असतो. त्या दिवशी तसाच अनुभव त्यांचा वाद (की भांडण?) ऐकताना इतरांना आला. ‘दिवाळी हा सणांचा राजा’ हे तेजसचं म्हणणं, तर ‘दिवाळी ही सणांची राणी’ हे तेजश्रीचं मत. मग दिवाळी बाजूलाच राहिली नि ‘राजा-राणी’वरूनच वाद सुरू झाला. शेवटी आजोबा मध्ये पडलेच. नेहमीप्रमाणे. दोघांनाही जवळ बोलावून विचारलं, ‘‘तेजस, तू दिवाळीला सणांचा राजा का म्हणतोस?’’ ‘‘आजोबा, ‘तो’ सण म्हणून तो राजा!’’ यावर उसळून तेजू म्हणाली, ‘‘आजोबा, दिवाळी ‘ती’ ना? म्हणून सणांची राणी!’’

आजोबा मनातल्या मनात खूश झाले. यांना तो-ती, म्हणजे पुल्लिंग-स्त्रीलिंग एवढी तरी व्याकरणाची ओळख आहे म्हणून. नेहमीप्रमाणे आजोबांनी त्यांना जवळ बसवले. पाठीवरून हात फिरवत म्हणाले, ‘‘चला, आज दिवाळीसंबंधी गोष्टीरूप माहिती देतो तुम्हाला.’’ आजोबांच्या हाताच्या त्या वत्सल स्पर्शाने दोघंही ऐकायला अगदी अवधानपूर्वक तयार झाली. आजोबांचं सांगणं सुरू झालं ः तुमचं दोघांचंही बरोबर आहे. दिवाळी सण हा सणराज तर दिवाळी ही सणांची राणी. पण अशी ही दिवाळी राजाराणीच्या पदाला कशी पोचली?पहिलं उत्तर आहे, अनेक छोट्यामोठ्या सणांचा समूह म्हणजे दिवाळी. एका दिव्याची दीपावली होत नाही. ‘आवली’ म्हणजे ओळ किंवा रांग. यासाठी अनेक दिवे पेटवावे लागतात. तसेच हे एकामागून एक येणारे सण. निरनिराळ्या राज्यांतले लोक निरनिराळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. पद्धती विविध पण सण एकच. हीच आपल्या संस्कृतीची विशेषतः आहे. विविधतेतील एकता… अनेकतेतली एकता!नुसते अनेक सण म्हणजे दिवाळी नाही, तर आपल्या व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनातील सर्व घटकांना स्पर्श करणारी दिवाळी.

आश्‍विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया अशी सहा दिवसांची दिवाळी असते.वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी ः या दिवशी सुवासिनी गायी-वासरांची पूजा करतात. त्याचप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशीही बैल व इतर पाळीव जनावरांची पूजा करतात. एक लोकगीत पूर्वी मुलं खेळताना गुणगुणायची-दिन दिन दिवाळी! गायी-म्हशी ओवाळीगाई म्हशी कुणाच्या? -लक्ष्मणाच्याएकूण काय तर पूर्वीपासून आपल्या जीवनाचा, आरोग्याचा मूळ आधार जो दूध, अन्नधान्य, फळं-भाज्या आहेत, त्यांच्या मुळाशी या पशूंचं योगदान आहे. म्हणून त्यांच्या पूजेचा हा दिवस. आज अनेक गावांतून- शहरांतून वसुबारस साजरी केल्याची वृत्तं-चित्रं माध्यमातून आपल्याला दिसतात. टॅक्सी-रिक्षा यांचे जसे थांबे (स्टँड्‌स) असतात, तसे गाई-वासरं यांच्यासाठी ठरवून दिलेल्या जागा असतात. तिथं जाऊन अनेक सुवासिनी पूजा करतात. हल्ली तर पूजा करतानाचे फोटो (सेल्फी) सर्वांना पाठवण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. यात सणाच्या मूळ उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होतं हे दुर्दैव!पशू-पक्षी-वनस्पती हे आजही आपल्या दैनंदिन जीवनाचे घटक आहेत. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सेवा आपण घेतो. मग त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला नको? त्यासाठी पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत अनेकानेक सण-समारंभ, व्रतंवैकल्ये साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. आज या सार्‍यातला उद्देश, संस्कार विसरला जाऊन उरलेयत फक्त सांगाडे. पण त्यांना मात्र सजवून, नटवून, वाजवून, गाजवून साजरं करण्याची परंपरा होऊ लागलीय. संस्कारांशिवाय सण म्हणजे केवळ तमाशा! केवळ दिखावा!धनत्रयोदशी ः आश्‍विन वद्य त्रयोदशीला सायंकाळी धनाची पूजा करतात; पैशांची नव्हे! केवळ पैशाला फार महत्त्व नसतं. मर्यादित महत्त्व जरूर आहे. जसं पैशानं पुस्तकं (आता पदवीसुद्धा!) विकत घेता येतात, पण ज्ञान विकत घेता येत नाही; अन्न विकत घेता येतं, पण भूक नाही; औषधं विकत घेता येतात, पण आरोग्य नाही… इ. इ.
धन मात्र पैशापेक्षा निराळं असतं. कल्याण करतं, धन्य बनवतं ते धन. आपल्या जीवनातलं सर्वात मौल्यवान धन म्हणजे आपलं आरोग्य किंवा स्वास्थ्य. ‘आरोग्यं धन संपदा’ म्हणजे ‘हेल्थ इज वेल्थ!’ या धनाची पूजा करण्याचा म्हणजे धनसंपत्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग. विशेष म्हणजे या दिवशी देवांचा वैद्य, आरोग्यदाता जो धन्वंतरी त्याचा जन्मदिवस असतो. अमृताचा कुंभ जो समुद्रमंथनातून निघतो ही कथाच मुळी किती अर्थपूर्ण आहे! जीवनाला, प्रपंचाला भवसागर म्हटलं जातं. त्यात सदैव विचार, कृती, चिंता यांची घुसळण (मंथन) सुरू असते. यातून विषाची म्हणजे मनावरचा ताण, द्वेष, मत्सर, क्रोधादी दोष, दुःख, अस्वस्थता यांची निर्मिती होण्याऐवजी शांती- तृप्ती- समाधान- आनंद यांचं अमृत उसळावं हाच संदेश धनपूजनाचा- धनत्रयोदशीचा- आहे.

हा फक्त हिशेबाच्या वह्या-पैसे यांच्या पूजनाचा म्हणजे व्यापार्‍यांचा सण नाही, तर सर्वसामान्यांचा उत्सव आहे. पूजेत इतर फुलं- हळद- कुंकू- गंध- अक्षता अशा द्रव्यांबरोबर आणखी एक वस्तू वापरली जाते. धणे (सुकी कोथिंबीर) वापरले जातात. हे घरात असलेल्या जिरे, मिरे, सुंठ, हळद इ. आरोग्यदायी वस्तूंचं प्रतीक आहे. आजीबाईचा बटवा किंवा स्वयंपाकघरातील फार्मसी ती हीच!नरकचतुर्दशी ः नरकासुराचा वध या दिवशी पहाटे श्रीकृष्णानं केला. त्यावेळी त्यानं आपली पत्नी सत्यभामा हिला बरोबर नेलं होतं. एका अर्थी आजूबाजूच्या घाणीवर, कचर्‍यावर विजय मिळवणं ही स्त्री-पुरुष दोघांची संयुक्त जबाबदारी आहे, हाही एक संदेश नरकचतुर्दशी देऊन जाते.दुर्दैवानं हल्ली कृष्णापेक्षा नरकासुराला महत्त्व आलंय. अक्राळविक्राळ, अजस्र अशा नरकासुरांच्या प्रतिमा बनवल्या जातात. त्यात कल्पकताही दिसून येते. अनेक ठिकाणी स्पर्धा होतात नरकासुर दहनाच्या निमित्तानं. पण हल्ली नरकासुराचं प्रदर्शनच अधिक व्हायरल होतंय. जसं रावणाचं. राम-कृष्ण बिचारे कुठंतरी कोपर्‍यात उरतात. गंमत म्हणजे नरकासुराचे दहन (म्हणजे वधच) करणारी आपल्यासारखी माणसं त्याला जाळल्यानंतर होणारा जळिताचा कचरा तिथंच टाकून पसार होतात. म्हणजे नवा नरक निर्माण करतात. हे कसं झालं माहीत आहे? ‘नरकासुर इज डेड, लॉंग लिव्ह नरकासुर.’सध्याच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत अखंड नरकासुरवध अपेक्षित आहे. कृष्णाचा नुसता पराक्रमच नाही, तर दूरदृष्टी या प्रसंगातून दिसून येते.

नरकासुराची आई भूमी म्हणून त्याला ‘भौमासुर’ असंही म्हणतात. माता भूदेवीकडून पुत्राला वैष्णवास्त्र नावाचं एक अमोघ अस्त्र प्राप्त झालं होतं. याचा प्रयोग करून भौमासुरानं अनेक राजांना जिंकून बंदिवासात डांबलं नि सोळा हजार युवतींनाही कारावासात कोंबलं. त्यानं निर्माण केलेला नरक तो हाच. एरव्ही त्याच्या राजधानीचं नाव होतं प्राग्ज्योतिषपूर. आसाम, मेघालय अशा पूर्वोत्तर प्रांतात ही राजधानी होती. या स्थानाचं वैशिष्ट हे की, संपूर्ण भारतात इथल्या भूमीला उगवत्या सूर्याचा पहिला किरण स्पर्श करतो. प्राक म्हणजे पूर्व, ज्योती म्हणजे प्रकाश नि पुर म्हणजे स्थान किंवा गाव. अशी राजधानी असलेल्या राजाचं राज्य कसं असायला हवं? पूर्ण प्रकाशित, प्रगत नि प्रसन्न! पण नरकासुराचे अत्याचार वाढत गेले. अदितीची (देवांची माता) कुंडलं, वरुणाचं छत्र अशा गोष्टी त्यानं बळाच्या जोरावर हिसकावून घेतल्या होत्या. शिवाय लोकांवरचे अत्याचार. एका अर्थी अन्यायाचा अंधार दूर करून न्यायनीतीच्या प्रकाशाचा उदय साजरा करण्याचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. श्रीकृष्ण नरकासुराच्या बंदिवासातून सोडवलेल्या सोळा हजार युवतींचा स्वतः पती बनला. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. नरकचतुर्दशीचा हा संदेश सध्याच्या काळात आदर्श असाच आहे.
धनत्रयोदशीला पुजलं जाणारं धन म्हणजे आरोग्य प्राप्त करण्यासाठी सगळीकडची, सर्वप्रकारची घाण, अस्वच्छता दूर करायला हवी. अगदी मनातलीसुद्धा- अंधश्रद्धा, अज्ञान, विषमतेची भावना, उच्च-नीचतेचा विचार या सार्‍या गोष्टी दूर करायचा संकल्प करायला हवा.

पं. महादेवशास्त्री जोशी हे गोमंतकाचे सुपुत्र. त्यांनी संपादित केलेल्या भारतीय संस्कृतिकोशात गोव्यातील दिवाळी म्हणून केलेला उल्लेख-गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारीपाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या (अनेक प्रकारच्या) पोह्यांचा फराळ करतात. आज आपण साजरी करतो त्या दीपावलीत हा आतिथ्याचा, एकत्र येण्याचा, जिवाभावाच्या गप्पा मारण्याचा, एकत्र खेळ खेळण्याचा आनंद कितपत उरलाय. प्रत्येकजण आपल्याच विश्‍वात (सेल्फी वर्ल्ड) रमलेला असतो. सारं बोलणं फेस-टू-फेस असं प्रत्यक्ष समोरासमोर येऊन नव्हे तर फेसबुकवरून. खेळणंसुद्धा पडद्यावर (व्हिडिओगेम्स)… एकूण आनंदाचा प्रत्यक्ष प्रत्यय जाऊन त्याची जागा आभासी अनुभव घेऊ लागलाय. ‘कालाय तस्मै नमः|’ म्हणून गप्प बसून मुकट्यानं घडतंय ते स्वीकारायचं की आपल्याकडून होईल तेवढा बदल आपण आपल्या नि संबंधित व्यक्तीच्या जीवनात घडवायचा? -आपणच ठरवूया काय करायचं? नरकासुर करताना, नाचवताना, जाळताना काहीसा ‘आसुरी’ आनंद मिळवायचा की कृष्णसत्यभामेसह नरकासुराला मारून आनंदाचा दीपोत्सव साजरा करायचा?लक्ष्मीपूजन ः एक गोष्ट आपल्या कधी लक्षात आलीय का? लक्ष्मीची पूजा, व्रतं ही सायंकाळी साजरी करतात. लक्ष्मीपूजन तर अमावस्येला. आपण कमळात उभी किंवा बसलेली लक्ष्मी पुजतो. पण तिचं स्वतःचं वाहन आहे दिवाभीत घुबड! यात कोणता संकेत, संदेश किंवा संस्कार आहे?लक्ष्मीपूजन आश्‍विन अमावस्येला सायंकाळी करतात. लक्ष्मीची प्रतिमा, याबरोबरच नाणी-दागिने अशा मौल्यवान वस्तूंचीही पूजा करतात. हे सारं योग्यच आहे. पण इतर पूजाद्रव्यांबरोबर तिला लाह्या वाहतात. व्यापारी लोक सर्वांना चुरमुरे वाटतात. याला एक अर्थ आहे. रामरक्षा स्तोत्रात उपासनेच्या दृष्टीनं आनंदी जीवनासाठी मार्गदर्शन करणार्‍या श्‍लोकात हा अर्थ दडलाय.भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदाम्‌|तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्‌|लाह्या-चुरमुरे-चणे हे पदार्थ मूळ धान्यरूपात नसतात. तांदूळ-मका-हरबरे यांचे दाणे (बीजं) भट्टीत भाजून हे पदार्थ तयार होतात. लाह्या वगैरे पेरल्या तर पुन्हा उगवत नाहीत. आपली कर्मं अशी रामनामाच्या भट्टीत भाजून केली तर त्यांच्यापासून अनर्थ कर्मफलांची परंपरा सुरू होत नाही.

लक्ष्मीला लाह्या वाहताना, तिच्या पूजनानंतर चुरमुरे वाटताना हाच संस्कार मनावर घडवला पाहिजे. लक्ष्मीचा उपयोग फळाची आस न धरता निरपेक्ष भावानं केला पाहिजे. दान करताना आपलं नाव, आपल्याला होणारा फायदा याचा विचार नको. त्यागभावनेनं दान करण्याचा संदेश लक्ष्मीपूजन देते. तिचा उपयोग करून स्वतःच्या व इतरांच्या जीवनात आनंदाची पौर्णिमा फुलवली पाहिजे. ही अंधाराची स्वामिनी आहे. म्हणून पूजा अमावस्येला संध्याकाळी व वाहन अंधार आवडणारं नि प्रकाश नावडणारं घुबड. लक्ष्मीपूजनाच्या वेळी तिची बहीण दरिद्री अवदसा हिलाही घराच्या मागच्या दारातून आत घ्यायचं असतं. लक्ष्मीबरोबर तिचीही पूजा करायची असते. लक्ष्मीला नैवेद्य, श्रीखंड तर अवदसेला पिठलं; लक्ष्मीच्या आरतीला घंटानाद तर अवदसेला बडवलेल्या थाळ्या. तिची प्रार्थना करताना म्हणायचं असतं- ‘आता जाशील ती पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत परत येऊ नकोस.’
हा प्रकार किंवा उपचार साधाच वाटेल, पण मोठा अर्थ आहे याच्यात. लक्ष्मी म्हणजे समृद्धी तर अवदसा म्हणजे दारिद्य्र. आजची श्रीमंती जाऊन उद्या गरिबी आली तरी आनंदानं तिचा स्वीकार करण्याचा संदेश यातून मिळतो. आपल्या सणांपासून हेच तर खरं शिकायचं.
दिवाळीतला पाडवा ः याला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. याच दिवशी पुराणकाली बळीराजाचा यज्ञ, वामनानं मागितलेलं त्रिपाद भूमी दान, दोन पावलांत सारं विश्‍व व्यापल्यावर तिसरं पाऊल बळीनं पुढे केलेल्या मस्तकावर ठेवून त्याला खाली दाबून पाताळाचं राज्य दिलं. त्याला चिरंजीव बनवून स्वतः त्याच्या राज्यरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. पाताळाचं राज्य म्हणजे जमिनीत पिकं उगवणार्‍या, झाडं वाढवणार्‍या कृषिवलांचे म्हणजे शेतकर्‍यांचे राज्य. त्यांच्यासाठी हा दिवस फार पवित्र असतो.

याच दिवशी नवं वर्ष सुरू होतं. त्याला ‘विक्रमसंवत्’ म्हणतात. राजा विक्रमादित्यांनी ही कालगणना सुरू केली. उत्तर भारतात हिचा वापर अधिक होतो. दक्षिण भारतात मात्र शालिवाहन शक मानला जातो, जो विक्रमसंवत्सरानंतर सुरू झाला. नववर्षाचं स्वागत उत्साहानं केलं जातं.
शंकर-पार्वती नेहमी सारिपाट खेळत असतात. हा एक प्रकारचा सोंगट्यांचा खेळ आहे. पार्वतीनं शंकराला या दिवशी हरवलं. त्याप्रीत्यर्थ विशेषतः उत्तर भारत, गुजरात या प्रदेशांत द्यूत खेळायची पद्धत आहे. सध्या त्यातला खेेळ जाऊन त्याला जुगाराचं स्वरूप आलंय. सणाच्या दिवसातला हा भयंकर प्रकार आहे. कारण पैसे लावून खेळलेल्या जुगारातून प्रेम कमी नि द्वेष अधिक निर्माण होतो. अन् हे काही दिवाळीसारख्या महासणाचं उद्दिष्ट नाही. यावर जरूर विचार करायला हवा.

पाडव्याचं आणखी एक महत्त्व म्हणजे पती-पत्नी यांच्यातलं भावपूर्ण नातं. पतीला स्नान घालून, प्रेमानं जेवू घालून ओवाळणं हा या पाडव्याचा एक विधी असतो. पूर्वीच्या काळी स्त्रिया मिळवत्या नसल्यामुळे पतीवर सर्वच गोष्टींसाठी अवलंबून असत. त्याही त्यांच्या परीनं पतीची सेवा, घरकाम इ. करून संसाराला हातभार लावत. हे प्रेमाचं नातं घट्ट करून त्याच्यातली नव्हाळी टिकवण्यासाठी असले सण-समारंभ उपयोगी पडत.आज स्त्री ही बर्‍याच प्रमाणात स्वावलंबी होऊन कुटुंबाची बरीच जबाबदारी उचलू लागलीय. इतकी की कधीकधी स्त्री नि पुरुष किंवा पती नि पत्नी यांचे कार्यक्षमतेच्या दृष्टीने मूल्यांकन केले तर अनेकवेळा ‘गृहप्रमुख’ या स्त्रियाच दिसून येतील. अनेक आघाड्यांवर त्या कार्यरत असतात. तरीही दिवाळीतल्या पाडव्यासारख्या सणांना आजही साजरे करायला हरकत नाही. आजकाल पितृदिन, मातृदिन, कन्यादिन, कुटुंबदिन साजरे केले जातात. ते फारच औपचारिक नि उथळ वाटतात. यासंदर्भात जी ‘कार्डसंस्कृती’ म्हणजे शुभेच्छापत्र (ग्रीटिंग कार्डस्) अस्तित्वात आलीत ती किंवा मोबाईलवरचे संदेश इ. फार कृत्रिम वाटावेत अशी परिस्थिती आहे. प्रेमाचा ओला स्पर्श अभावानेच जाणवतो. म्हणून आपल्या सणांच्या व्यवहारात जी प्रतीकात्मकता नि जिव्हाळा आहे त्यांचं जतन केलं पाहिजे. आधुनिक जीवनशैलीला अनुरूप असा या प्रेमाचा आविष्कार केला गेला तरी चालेल, पण मूळ भावना, संस्कार किंवा प्रतीकात्मक व्यवहार कायम राहिला पाहिजे. तपशील बदलला तरी चालेल, पण तत्त्व टिकलं पाहिजे.

भाऊबीज ः हा दीपावली सणाचा कळसबिंदू आहे. भाऊ-बहीण हे फारच मधुर नातं असतं. भावाला या दिवशी बहिणीनं स्नान घालून ओवाळणं, गोडधोड खाऊ घालणं नि भावानं योग्य अशी भेट देणं. त्यावेळी बहीणही लग्नापूर्वी भावावर व नंतर पतीवर अवलंबून असायची. आज हे चित्र दोन तर्‍हांनी बदललंय. बहिणीही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या. वाईट गोष्ट म्हणजे आज कुटुंबात बहिणीला भाऊ किंवा भावाला बहीण उरलेलीच नाही. तरीही इतर बहिणींकडे भाऊबीजेसाठी जातात. पण तिथंही सेल्फी, फोटोऑप (म्हणजे फोटो काढण्याची संधी) या दृष्टिकोनातून सारा प्रकार संपन्न होतो म्हणजे संपतो. आज घरात राखी बांधायला मनगटं नि ओवाळायला मुख (चेहरे) उरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

‘अशी ही दीपावली,’ असे म्हणून आजोबांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. तो का हे तेजस-तेजश्रीला कळलं नाही. कदाचित कधीही कळणार नाही. याच विचारानं आजोबा काहीसे अस्वस्थ झाले. नातवंडांना ‘माहिती’ मिळाली होती. आजोबांना त्यांना ‘ज्ञान’ही द्यायचं होतं म्हणून त्यांनी दीपावलीचा संदेश सारांशानं सांगायला सुरुवात केली…* एका दिव्याची दिवाळी नाही बनत. अनेक दिवे एकत्र आले पाहिजेत. एकमेकांची शोभा त्यांनी वाढवायला हवी. पण एकाच दिव्यावर हजारो दिवे पेटवता येतात नि पणत्या, वाती, ज्योती जरी असंख्य असल्या तरी प्रकाश एकच असतो. तो महाप्रकाश असतो एवढंच.* दीपावली उपयुक्त पशू नि माणूस (वसुबारस नि बलिप्रतिपदा); आपली साधन-सामग्री नि आपण (धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन); जीवनातील निकटची नाती (पाडव्याला पती-पत्नी, भाऊबीजेला बहीण-भाऊ) यातील स्नेहसंबंध- भावबंध आटू लागलेयत.* एकमेकांशी समरस होऊन साजरी करायची दिवाळी. एकत्र येऊन असंख्य कृती करून (किल्ले बांधणे, आकाशदिवे बनवणे, रांगोळ्या-दिव्यांची आरास करणे) आनंद लुटणे म्हणजे दिवाळी.अशी दिवाळी उरलीय ती स्मृतीत… आजही उत्साह आहे, उमेद आहे, उन्मेष आहे, पण तो ‘दिवाळी एक इव्हेंट’ म्हणून; एक सण म्हणून कमी आहे. तरीही दिवाळी आजही सणांचा राजा आहे नि राणीही!