सचिन पायलटना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले

0
122

>> प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदही काढले

अखेर कॉंग्रेस पक्षाने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांना हटवले आहे. तसेच त्यांचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे. राजस्थानमध्ये पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंड केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी सांगितले. पायलट यांच्यासह त्यांच्या गोटात असणार्‍या दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, काल जयपूरच्या फेअरमॉंट हॉटेलमध्ये कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला उपस्थित राहण्याचे सचिन पायलट यांना वारंवार आवाहन करण्यात आले होते मात्र सचिन पायलट अनुपस्थित होते. बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला उपस्थित असणार्‍या आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली होती.

दरम्यान, सचिन पायलट यांनी त्यांना २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेसचे १०७, भाजपचे ७२ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा अशोक गेहलोत यांचा दावा आहे.
राजस्थानात २०१८ मध्ये कॉंग्रेस सत्तेवर आली, तेव्हापासूनच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजस्थानात कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यात आपला प्रमुख वाटा आहे, असे पायलट यांचे म्हणणे आहे.