सगुणच्या शतकामुळे जीनो सुस्थितीत

0
120

>> प्रीमियर डिव्हीजन क्रिकेट

डावखुरा सलामीवीर सगुण कामतच्या (३ षट्‌कार व १४ चौकारांसह १२२ चेंडूत १०० धावा) दमदार शतकाच्या जोरावर जीनो क्रिकेट क्लबने ७ गडी गमावत ३२९ अशी धावसंख्या उभारत साळगावकर स्पोटर्‌‌स क्लबविरुद्ध सुरू असलेल्या गोवा क्रिकेट संघटना आयोजित तीन दिवशीय प्रीमियर डिव्हिजन लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी मजबूत सुस्थिती गाठली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर संग्राम अतितकरने (१ षट्‌कार व ६ चौकारांसह६८ चेंडूत ५३ धावा) प्रथमेश गावसच्या (२१ धावा) जीनो स्पोटर्‌‌स क्लबला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सगुण कामतने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत दमदार शतकी खेळी साकारतानाच तिसर्‍या विकेटसाठी जलाज सक्सेनाच्या साथीत ९८ धावांची भर घातली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मंथन खुटकर व गौरव देसाई खेळपट्टीवर नाबाद खेळत होते. साळगावकर स्पोटर्‌‌स क्लबतर्फे उमर नझिर सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४८ धावांत ३ बळी मिळविले.

दरम्यान, सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात धेंपो क्रिकेट क्लबने चौगुले स्पोटर्‌‌स क्लबचा डाव २१० धावांवर संपुष्टात आणत पहिल्या दिवसअखेर २ गड्यांच्या मोबदल्यात ४० अशी धावा बनविल्या होत्या. चौगुलेतर्फे समर दुभाषीने ४ चौकारांच्या सहाय्याने १२९ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली असून तो खेळपट्टीवर नाबाद खेळत आहे. धेंपोतर्फे दर्शन मिसाळ सर्वांत यशस्वी गोलंदाजी ठरला. त्याने ५१ धावांत ५ बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः जीनो क्रिकेट क्लब, पहिला डाव, ९० षट्‌कांत ७ बाद ३२९, (संग्राम अतितकर ५३, प्रथमेश गावस २१, सगुण कामत १००, जलाज सक्सेना २६, राहुल केणी ४५, सौरभ बांदेकर २५, मंथन खुटकर खेळत आहे २६, गौरव देसाई खेळत आहे १४ धावा. उमर नाझिर ३-४८, अमित यादव २-७५, वैभव माळी व अमोघ देसाई प्रत्येकी १ बळी).

चौगुले स्पोटर्‌‌स क्लब, ७२.१ षट्‌कांत सर्वबाद २१०, वैभव गोवेकर २१, समर दुभाषी ५३, विश्वंभर कहलोन ३५, सुनिलकुमार दलाल २४, दीपराज गावकर १६, मुकुंद बांदोडकर १०, फेलिक्स आलेमाव खेळत आहे १२, विजेश प्रभुदेसाई १५ धावा. दर्शन मिसाळ ५-५१, लक्षय गर्ग २-४१, निनय चौधरी २-५१ बळी), धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव १५ षट्‌कांत २ बाद ४०, (अचित शिगवन खेळत आहे १८, हर्षद गडेकर खेळत आहे ४ धावा. अल-अमिन व सुनिलकुमार दलाल प्रत्येकी १ बळी).